मनोहर पर्रीकरांच्या स्मारकावरून उफाळला नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 08:10 PM2019-09-13T20:10:57+5:302019-09-13T20:11:49+5:30
मनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथे उभारल्या जाणा-या स्मारकावरून गोव्यात नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
- राजू नायक
मनोहर पर्रीकर यांच्या मिरामार येथे उभारल्या जाणा-या स्मारकावरून गोव्यात नव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
‘स्मृतिस्थळ’ या नावाने हे स्मारक मिरामार किना-यावर- जेथे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचेही स्मारक आहे- उभारले जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईस्थित यूसीजे आर्किटेर अॅँड एन्वायरोन्मेंट या संस्थेचे डिझाइन या प्रकल्पासाठी निवडण्यात आले आहे.
या प्रकल्पाचा खर्च अद्याप सरकारने जाहीर केलेला नाही; परंतु राज्य सरकारच्याच पायाभूत सुविधा विकास महामंडळातर्फे ते बांधले जाणार आहे.
सूत्रांच्या मते, प्रकल्पाचा खर्च नऊ कोटींपेक्षा जादा असेल. तो पर्रीकरांच्या जीवनासंदर्भात एका संग्रहालयाच्या स्वरूपातच असण्याची शक्यता असेल. सरकारच्या मते, ते जनतेसाठी स्फूर्तिदायी ठरावे अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, पर्रीकरांचे एकेकाळचे सहकारी व त्यानंतरचे राजकीय वैरी सुभाष वेलिंगकर यांनी स्व. बांदोडकरांच्या स्मारकाचे नूतनीकरण सर्वात आधी हाती घेण्याची सूचना करताना पर्रीकरांच्या स्मारकापूर्वी हे काम हाती घेण्याचे आवाहन केलेय. वेलिंगकरांना पर्रीकरांसाठी एवढे मोठे स्मारक असावे, हा निर्णय फारसा रुचलेला दिसला नाही. स्वाभाविक आहे, पर्रीकर सरकारच्या भाषा माध्यम प्रश्नावरूनच रा. स्व. संघाशी फारकत घेऊन वेलिंगकरांनी आपली वेगळी चूल मांडली होती. पर्रीकरांचे स्मारक उभारल्यावर बांदोडकरांचे स्मारक दुर्लक्षित वाटू नये, तेही अद्ययावत बनविण्यात यावे, असे वेलिंगकरांनी म्हटले आहे.
दुसरीही काही मते आहेत, जी या खर्चासंदर्भात कटू प्रतिक्रिया व्यक्त करतात. भाजपाने स्वत:च्या हिकमतीवर पैसा उभारून हे स्मारक निर्माण करावे, अशा असंख्य प्रतिक्रिया समाज माध्यमांतून व्यक्त झाल्या आहेत.
एक गोष्ट खरी आहे की राज्यात जी काही स्मारके आहेत, त्यांच्यावर खर्च बराच होतो; परंतु कालांतराने त्यांची हेळसांड होते. बांदोडकरांच्या स्मारकाकडेही दुर्लक्ष झाले आहे. ते वर्षभर बंद असते व बांदोडकरांच्या स्मृतिदिनीच खुले केले जाते. वेलिंगकर यांनी म्हटले आहे, पर्रीकरांनंतर मिरामार येथे आणखी कोणाचेही स्मारक उभारले जाणार नाही याची तरतूद करावी. मिरामार किना-यावर सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून नवी बांधकामे उभी केली जाऊ नयेत, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.
पर्रीकरांनी आपल्या शेवटच्या कारकिर्दीत बरेच वाद ओढवून घेतले होते. त्यामुळे त्यांच्यावर सध्याचे भाजपा नेतेही नाखुश होते. त्यांचे अनेक निर्णय सध्या फिरवले जात आहेत. त्यांच्या शेवटच्या कारकिर्दीत भाजपावर अन्याय झाला व त्यांनी स्वत:ची ‘कोटरी’ निर्माण केली होती, असा आरोप होतो. एक गोष्ट राजकीय निरीक्षक मान्य करतात की पर्रीकरांमुळेच गोव्यात भाजपा सत्तेवर येऊ शकली. परंतु सध्या त्यांच्या बाबतीत त्यांचे सहकारीच नाखुश असता स्मारक उभारून त्यांना विस्मृतीत ढकलण्याचा तर सरकारचा प्रय} नाही ना, असा सवाल केला जातो. सरकारने त्यांचे कुटुंबीय व हितचिंतकांची सतावणूक चालविल्याचा आरोप माजी अॅडव्होकेट जनरल व पर्रीकरांचे जवळचे स्नेही आत्माराम नाडकर्णी यांनी अलीकडेच केला आहे.
(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत.)