नव्या पृथ्वीचा शोध आणि मानवी प्रवृत्ती
By admin | Published: June 5, 2017 12:16 AM2017-06-05T00:16:37+5:302017-06-05T00:16:37+5:30
या जगाचा अंत होणार की नाही आणि होणार असेल तर केव्हा? हे सांगणे कठीण आहे.
या जगाचा अंत होणार की नाही आणि होणार असेल तर केव्हा? हे सांगणे कठीण आहे. परंतु निर्माण होणारी प्रत्येक वस्तू आणि जिवाचा कधी ना कधी अंत अटळ असतो, यावर बहुतेकांचा विश्वास आहे. जगाचा महाविनाश अथवा महाप्रलयाची भविष्यवाणी अनेक वेळा अनेकांनी केली आहे. २०१२ साली या जगाचा अंत होणार अशी एक भविष्यवाणी मेक्सिकोमधील माया सभ्यतेच्या कॅलेंडरमध्येही करण्यात आली होती. गंमत म्हणजे या भविष्यवाणीने भारतीय लोकांमध्ये एवढा हाहाकार माजला होता तरीही काही लोक मृत्यूपूर्वी आपली शेवटची इच्छा पूर्ण करण्याच्या मागे लागले होते. पण ती भविष्यवाणी खोटी ठरली आणि या पृथ्वीतलावरील समस्त मानवजातीने सुटकेचा नि:श्वास सोडला.
या भविष्यवाण्यांमध्ये काही तथ्य नसते असा समज करून घेत लोकांनी पूर्वीसारखीच नित्यनेमाने पृथ्वीची लयलूट चालूच ठेवली. त्याचे भीषण परिणाम आज आपल्यासमक्ष आहेत. जागतिक तपमानवाढ, हवामानात होत असलेले बदल, लघुग्रहांचे धडकणे आणि वाढत्या लोकसंख्येचा धोका लक्षात घेता येणाऱ्या १०० वर्षांत मानवाला निवासासाठी नव्या पृथ्वीचा शोध घ्यावा लागेल, असा इशारा ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी दिला आहे. आमचा ग्रह एवढा कमकुवत होत चालला आहे की जीवन सांभाळण्याची क्षमता त्यात राहणार नाही, असे हॉकिंग यांचे म्हणणे आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की पृथ्वीवर राहणाऱ्या माणसाचे आयुष्य आता संपत आहे आणि त्याला जिवंत राहायचे असल्यास ही पृथ्वी सोडावी लागणार आहे.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने तर इ.स. २००९ पासूनच अंतराळात पृथ्वीसारखा ग्रह शोधण्याची मोहीम सुरू केली आहे आणि मानवाच्या राहण्याचा विचार केला जाऊ शकतो असे एकदोन नव्हे तर तब्बल ४६०० ग्रह अंतराळात असल्याचे संशोधन केले आहे. पण मूळ प्रश्न हा आहे की, माणूस अशा कुठल्याही आणि कितीही ग्रहांवर राहण्यास गेला तरी त्याची खोड काही मोडणार नाही आणि त्या ग्रहांचीही स्थिती कालांतराने पृथ्वीसारखीच होईल.
आज मानवाने स्वत:च्या फायद्यासाठी सारे निसर्गचक्रच बदलून टाकले आहे. जंगलाचे स्वास्थ्य पार बिघडवले आहे. एवढेच काय पण त्याला श्वासोच्छ्वासासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायूचाही त्याने विचार केला नाही. विकासाच्या नावावर नैसर्गिक स्रोतांची एवढी उधळपट्टी केली की, त्याचे मानवी जीवनावर आणि निसर्गावर काय परिणाम होतील याचे भानही त्याला राखता आले नाही. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जगातील दहापैकी नऊ लोकांना अशुद्ध हवेचे श्वसन करावे लागत असून, ही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. केवळ वायुप्रदूषणाने जगभरात गेल्या वर्षी ४२ लाख लोकांचा अकाली मृत्यू झाला. यापैकी निम्म्याहून अधिक मृत्यू केवळ भारत आणि चीनमध्ये झाले आहेत.
एरवी मोफत मिळणारा प्राणवायू आता विकत घेण्याची वेळ आली आहे. याशिवाय प्रदूषणाने वातावरणातील ओझोनचा थर विरळ झाल्याने सूर्याची अतिनील किरणे थेट पृथ्वीवर येत आहेत. त्यामुळे वृक्ष, मानव आणि सजीवसृष्टीचा जीव धोक्यात आला आहे. पाण्याच्या बाबतीतही हीच स्थिती आहे. भूजल साठे कमी होत आहेत.
केवळ भारताचा विचार केल्यास भूजलाचा ७२ टक्के उपसा आपण यापूर्वीच केला आहे. अनेक नद्या मृतप्राय अवस्थेत आहेत. भारतातील नद्यांचा विचार केल्यास देशातील सर्व प्रमुख १४ नद्या आणि त्यांच्या २०० उपनद्या प्रदूषणग्रस्त असल्याचे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात नमूद आहे. त्यात महाराष्ट्रातील २८ नद्यांचा समावेश आहे. बेसुमार वृक्षतोडीने जंगले नष्ट होत असल्याने वन्यजीव धोक्यात आले आहेत. डब्ल्यूडब्ल्यूएफच्या एका अहवालानुसार २०२० पर्यंत दोन तृतीयांशपेक्षाही जास्त वन्यजीव नष्ट होणार आहेत. साऱ्या जगातच वन्यजिवांची संख्या वेगाने कमी होत आहे. १९८० पासून आतापर्यंत आशियात वाघांची संख्या ७० टक्क्यांनी कमी झाली, यातूनच परिस्थितीची भीषणता स्पष्ट व्हावी.
१९०० मध्ये जगाची लोकसंख्या १ अब्ज ६० कोटी होती. आज ती वाढून ७ अब्ज ३० कोटी एवढी झाली आहे. लोकसंख्या वाढीसोबतच आपल्या सुखसोयी प्राप्त करण्याच्या नादात ही पृथ्वी केवळ आमची नाही हे आम्ही विसरूनच गेलो आहोत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारतवासीयांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या अंधानुकरणाबाबत फार पूर्वीच सतर्क केले होते. गांधीजी असे मानत की पृथ्वी, वायू, जल आणि भूमी ही आम्हाला आमच्या पूर्वजांकडून मिळालेली संपत्ती नाही, तर ती आमची मुले आणि पुढील पिढ्यांचा वारसा आहे. आम्ही केवळ त्याचे विश्वस्त आहोत. आम्हाला पृथ्वी जशी मिळाली तशीच ती आम्ही भावी पिढीला सोपविली पाहिजे. लोकांनी आतातरी याचा विचार करावा आणि पृथ्वीच्या संरक्षणाची प्रतिज्ञा घ्यावी.
- सविता देव हरकरे