बंधुभावाचे नवे पर्व, लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा गौरव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 11:25 PM2020-08-04T23:25:10+5:302020-08-04T23:26:09+5:30
धार्मिकतेचा मुद्दा घ्याल, तर राम हा विष्णूचा सातवा अवतार. या रामाने आपल्या आचरणाद्वारे आदर्शाचा वास्तुपाठ घालून दिला.
पाचशे वर्षांपासूनची लोकभावना आज प्रत्यक्ष साकार होणार आहे. अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनाच्या सोहळ्याचे साक्षीदार आपण सगळेच असणार आहोत. पाचशे वर्षांतील आंदोलने, कायदेशीर लढाईनंतर लोकशाहीच्या चौकटीतच या प्रश्नाचे उत्तर आपल्याला शोधता आले, हाच देशाच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष तत्त्वांचा गौरव म्हटला पाहिजे. कोणतीही कटुता न येऊ देता, हा क्षण साकारला हेच भारतीय बंधुभावाचे बलस्थान समजले पाहिजे. आता हा बंधुभाव असाच जागता ठेवण्याची जबाबदारी एका अर्थाने आपल्या सर्वांवर येऊन पडली आहे. बंधुभावाची ही भावना जपताना आजच्या कार्यक्रमाचे पहिले निमंत्रण बाबरी मशिदीचे पाठीराखे राहिलेले इक्बाल अन्सारी यांना देण्यात आले. याला वैचारिक परिपक्वताच म्हटली पाहिजे. अन्सारी यांनीसुद्धा खुल्या दिलाने या निमंत्रणाचा स्वीकार केला. हा समजूतदारपणा म्हणता येईल. या देशाचे स्वातंत्र्य आणि एकात्मता अशीच बळकट ठेवण्यासाठी अशाच परिपक्वतेची आणि शहाणपणाच्या वर्तनाची प्रत्येक भारतीयाकडून अपेक्षा आहे. एकमेकांच्या भावनांचा सन्मान राखत आपण वाटचाल केली तर काय घडू शकते, याचे हे उदाहरण मानता येईल. रामायण आणि महाभारत हे दोन विषय प्रत्येक भारतीयाच्या आस्थेचे आहेत. रामायणातील राम हा तर आदर्श पुरुष. कर्तव्यकठोर आणि तितकाच स्वत:शी प्रामाणिक. राम देवत्वाच्या पलीकडे गेलेली आणि प्रत्येकाच्या हृदयात विराजमान झालेली प्रतिमा म्हणून ‘राम राम’ हे दोनच शब्द देशभरात कोणाही अनोळखी व्यक्तींना आपसूक जोडतात. ही केवळ धार्मिक श्रद्धा नाही, तर परस्पर विश्वास व्यक्त करणारी मानसिकता आहे.
धार्मिकतेचा मुद्दा घ्याल, तर राम हा विष्णूचा सातवा अवतार. या रामाने आपल्या आचरणाद्वारे आदर्शाचा वास्तुपाठ घालून दिला. राज्याभिषेकासाठी तयार असणारा राम त्याच तयारीने तत्काळ वनात जाण्याची तयारी करतो, हा सत्य आणि प्रामाणिकपणाची कसोटी पाहणारा क्षण; पण आज्ञाधारकपणा येथे दिसतो. राजसत्तेपेक्षा पित्याची आज्ञा परमोच्च, ही शिकवण सांगून जातो. सामान्य माणसाच्या मनात आजही आदर्श राज्याची कल्पना ही केवळ आणि केवळ ‘रामराज्य’ आहे. त्यांच्या कल्पनेतील हे रामराज्य गेली दोन-चार हजार वर्षे तरी पृथ्वीवर अस्तित्वात नाही; पण हजारो वर्षांची त्याची कल्पना मात्र अबाधित आहे आणि ही शक्ती म्हणजे आम लोकांच्या मनातील रामाचे स्थान जे-जे पाप किंवा अनैतिक, त्याला रामराज्यात थारा नाही, ही सामान्य माणसाची समजूत म्हणून आजही कोणीतरी रामराज्य घेऊन येईल, ही त्याची भावना हजारो वर्षांपासून दृढ आहे. एक सामान्य नागरिक राजाच्या पत्नीच्या चारित्र्याविषयी जाहीर संशय रामराज्यात घेऊ शकतो आणि म्हणून राजा पत्नीचा त्याग करतो, ही कर्तव्यकठोरता रामराज्यातीलच. या कथेबद्दल मतमतांतरे जरूर असतील; परंतु निकोप लोकशाही या अर्थाने रामराज्यातच सामान्य माणूस असे धारिष्ट्य करू शकतो. आदर्श शासक कसा असावा याचा वस्तुपाठ रामाने आपल्या वर्तनातून घालून दिला आहे. ‘रामायण’ हा ग्रंथ म्हणजे एक इतिहास आहे. तो स्वीकारणे अगर नाकारणे हा जसा वेगळा प्रश्न आहे, तद्वतच इतिहासाच्या विवेचन पद्धतीवरही अशीच मतमतांतरे असू शकतात; पण राम हा इतिहासापलीकडे श्रद्धेचा विषय आहे व राम आणि रामायण यांचा विचार करताना आपण इतिहासाची शिस्त पाळताना लोकभावनेचाही आदर राखला पाहिजे. राम हा श्रद्धेचा विषय आहे, म्हणूनच रामाचे ज्या परिसरात वास्तव्य झाले, त्या दंडकारण्यापासून ते थेट रामेश्वरपर्यंत त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आपण पिढ्यान्पिढ्या जतन केल्या, इतका तो सामान्य जनांशी एकरूप आहे. म्हणूनच २१व्या शतकातील सामान्य भारतीय आजही रामराज्याची आस घेऊन बसतो. अयोध्येतील राम मंदिर हे रामाच्या आदर्शाची सतत जाणीव करून देणारे असेल, अशी अपेक्षा आपण करूया. अधर्माचा नाश म्हणजेच राम आणि आपल्याला तेच पाहिजे आहे. गुण्यागोविंदाने राहण्यासाठी राम हा सर्वांचाच आधार आहे. आजपासून देशात बंधुभावाचे पर्व सुरू होईल, हा विश्वास वाटतो.
राम तो घर घर में हैं, राम हर आंगन में हैं,
मनसे रावण जो निकाले, राम उसके मन में हैं।
‘राम राम’ या दोन शब्दांमध्ये सारे भारतीयत्व एकवटले आहे. हा श्रद्धेच्या पलीकडचा व भारतीयांच्या मनातला विषय आहे. रामाचे रामराज्य सामान्य माणसाला आस लावून बसले. त्याचा शोध हा माणूस या दोन शब्दांतून घेत असतो.