सांस्कृतिक चळवळीला नवे धुमार
By admin | Published: January 2, 2016 08:37 AM2016-01-02T08:37:10+5:302016-01-02T08:37:10+5:30
मुंबई, पुणे, नाशकात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. कलारसिकांची भूक भागविली जाते. तसे वातावरण खान्देशात नसते, असा तक्रारीचा सूर नेहमी लावला जातो.
- मिलिंद कुलकर्णी
मुंबई, पुणे, नाशकात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. कलारसिकांची भूक भागविली जाते. तसे वातावरण खान्देशात नसते, असा तक्रारीचा सूर नेहमी लावला जातो. परंतु अलीकडे सांस्कृतिक चळवळीला नवे धुमारे फुटले आहेत. नव्या दमाचे कलावंत पुढे आल्याने हा बदल घडू लागला आहे.
चार-पाच वर्षांपूर्वी राज्य नाट्य स्पर्धेचे जळगावात असलेले केंद्र रंगकर्मींच्या प्रतिसादाअभावी बंद पडण्याच्या मार्गावर होते. ते वाचविण्यासाठी ज्येष्ठ रंगकर्र्मींनी पुढाकार घेऊन तालुका पातळीवर बैठका घेतल्या. नाट्यसंस्थांना प्रोत्साहन दिले. यंदा तब्बल १७ नाटके सादर झाली. डॉ.गिरीश कर्नाड यांच्या ‘हयवदन’पासून तर राहुल बनसोडे या नव्या दमाच्या लेखकाचे ‘अॅनॉनिमस कंटेट’ या नाटकापर्यंत विविध प्रकारातील नाटके सादर झाली. रंजनासह प्रबोधनदेखील झाले. तब्बल सहा नाटके हाऊसफुल्ल झाली. प्रयोग पाडणे, नेपथ्यासह अन्य कामांमध्ये असहकार्य हे प्रकार बंद होऊन सहभागी नाट्यसंस्थांनी एकमेकाना सहकार्य केल्याचे चित्र या स्पर्धेच्या माध्यमातून दिसून आले. धुळे-नंदुरबारला स्वतंत्र केंद्र नाही. परंतु धुळ्याच्या चार संघांनी नाशिक केंद्रावर सहभाग नोंदविला. चांगली कामगिरी बजावली. यंदाच्या या स्पर्धेमुळे नाट्यचळवळीला नवा आयाम मिळाला.
या स्पर्धेपाठोपाठ जळगावात तीन दिवसीय पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा झाली. परिवर्तन आणि पुण्याची महाराष्ट्रीय कलोपासक या संस्था सलग पाच वर्षांपासून ही स्पर्धा घेत आहेत. खान्देश आणि मराठवाड्यातील महाविद्यालयीन तरुणांना या स्पर्धेने नवा रंगमंच उपलब्ध करून दिला आहे. २३ संघ या स्पर्धेत सहभागी झाले, त्यात बहुतांश ग्रामीण भागातील युवक होते, हे विशेष आहे. एकांकिकांसोबतच चित्रप्रदर्शन, कलावंतांच्या मुलाखती असे उपक्रमदेखील रंगले.
विवेकानंद प्रतिष्ठान या शिक्षणसंस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त कुमार साहित्य संमेलन आणि दोन दिवसीय कलामहोत्सव उत्साहात झाले. विद्यार्थीच उद्घाटक आणि विद्यार्थीच संमेलनाध्यक्ष असल्याने विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी भरविलेले संमेलन असे त्याचे स्वरूप राहिले. विश्वकोष मंडळाच्या अध्यक्ष डॉ.विजया वाड यांची मुलाखतदेखील विद्यार्थ्यांनीच घेतली.
संगीत, नृत्य कलाविष्काराचा सलग १४ वर्षांपासून सुरू असलेला ‘बालगंधर्व संगीत महोत्सव’ यंदा ८ ते १० जानेवारी दरम्यान जळगावात होणार आहे. यंदा पंडिता कलापिनी कोमकली, अमेरिकेतील मनू श्रीवास्तव, पंडिता रेखा नाडगौडा हे कलाविष्कार सादर करणार आहेत. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठान दरवर्षी या महोत्सवात वैविध्य ठेवण्याचा प्रयत्न करीत असते. त्याचाच भाग म्हणून यंदा ‘संगीत स्वयंवर’ नाटकाला १०० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल मास्टर दीनानाथांच्या गायन शैलीवर आाधारित ‘दिव्य संगीत रवी’ हा कार्यक्रम होणार आहे.
नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी आणि आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी या दोन संस्था गेल्या पाच वर्षांपासून नंदुरबारात जिल्हा साहित्य संमेलन अखंडितपणे घेत आहेत. यंदा हे संमेलन २४ जानेवारी रोजी होत आहे. ना.धों. महानोर, इंद्रजित भालेराव, उत्तम कांबळे, प्रा.वसंत आबाजी डहाके, डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार आहेत.
या महिन्यात पारोळा येथील उपेक्षित हस्तशिल्पकार छोटू जडे यांना केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या हस्तशिल्प विभागातर्फे राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. जडे यांच्या देवतेच्या शिल्पाला हा पुरस्कार मिळाला असून हा पुरस्कार मिळविणारे राज्यातील ते एकमेव हस्तशिल्पकार आहेत, हे विशेष. हस्तशिल्पकला जोपासणारी जडे यांची ही सहावी पिढी आहे. ही कला जपण्याची त्यांची धडपड आहे.