नथुरामविरुद्ध नवा लढा

By admin | Published: January 31, 2017 04:57 AM2017-01-31T04:57:48+5:302017-01-31T04:57:48+5:30

महात्मा गांधींच्या हत्त्येचे समर्थन करीत माथेफिरू नथुराम गोडसेच्या पापावर पांघरुण घालणाऱ्या ‘हे राम... नथुराम’ या नाटकावर नागपूरकरांनी घातलेला बहिष्कार हा नथुरामभक्तांनी समजावा

New fight against Nathuram | नथुरामविरुद्ध नवा लढा

नथुरामविरुद्ध नवा लढा

Next

- गजानन जानभोर

परवा नागपूरकरांनी ‘हे राम... नथुराम’कडे फिरवलेली पाठ गांधींनीच सांगितलेल्या सत्याग्रहाच्या मार्गाने नेणारी आहे.

महात्मा गांधींच्या हत्त्येचे समर्थन करीत माथेफिरू नथुराम गोडसेच्या पापावर पांघरुण घालणाऱ्या ‘हे राम... नथुराम’ या नाटकावर नागपूरकरांनी घातलेला बहिष्कार हा नथुरामभक्तांनी समजावा असा अहिंसक धडा आहे. शरद पोंक्षे नावाचा हा कलावंत (?) नथुरामच्या नावावर नाटके करून त्या माथेफिरूच्या क्रूरपणाचे उदात्तीकरण करीत असतो आणि त्याचे सगे-सोयरे महात्म्याच्या हत्त्येचा असुरी आनंद उपभोगत असतात. गांधीजींची हत्त्या हा जसा एका पूर्वनियोजित आणि प्रदीर्घ कटाचा भाग होता तसेच या नाटकाच्या निर्मितीमागे एक भयानक षड्यंत्र दडलेले आहे. गांधींच्या हत्त्येची असत्य आणि देशभक्तिपर कारणे समाजमनावर घट्टपणे बिंबवणे, त्यांच्या नेतृत्वात उभ्या राहिलेल्या स्वातंत्र्यलढ्याची आठवण पुसून काढणे, ही विखारी मानसिकता त्यामागे आहे. या नाटकाला होणारी गर्दी आणि तेवढाच होत असलेला प्रखर विरोध नथुरामी उन्माद वाढविण्यास कारणीभूत ठरीत आहे. पण परवा नागपूरकरांनी ‘हे राम... नथुराम’कडे फिरवलेली पाठ गांधींनीच सांगितलेल्या सत्याग्रहाच्या मार्गाने नेणारी आहे.
नथुराम गोडसे हा या देशाचा व हिंदूंचाही प्रतिनिधी नाही. त्याच्याएवढी हिंदूंची व भारताची बदनामी आजवर कुणीही केलेली नाही. पोंक्षेसारखी माणसे ही गोडसेच्या कलेच्या क्षेत्रातील अस्तित्वाचे व उपजीविकेचे प्रतीक आहेत. सामान्य माणसाला ‘नथुराम’ या शब्दाचीही घृणा वाटते. कुठलेही आई-वडील आपल्या मुलाचे नाव नथुराम ठेवत नाहीत. नथुराम भक्तांच्या कुटुंबातही त्याचे नाव ऐकायला मिळत नाही. कारण, महात्मा गांधी हा भारतीयांच्या लोकजीवनाचा भाग आहे. पोंक्षेंच्या नाटकातील नथुरामच्या तोंडी घातलेले संवाद विखारी आहेत. गोळ्या घालूनही हा महात्मा मेला नाही, याचे वैफल्य म्हणजेच हे नाटक होय. सामान्य माणूस रोजच गांधींचा जयघोष करीत नाही, आपण त्याचे कट्टर अनुयायी असल्याचेही तो सांगत नाही. पण, त्याने गांधींना कधीचेच स्वीकारले असते, म्हणूनच कुठल्यातरी कारणाने गांधी सावलीसारखा त्याच्यासोबत असतो. गांधींची हत्त्या करण्यामागे नथुरामची एक उदात्त भूमिका होती, असे पोंक्षे सांगतात. त्या भूमिकेतूनच त्याने गांधींना मारले, असाही त्यांचा दावा आहे. पोंक्षे सांगत असलेली गोडसेची ही भूमिका योग्य असती तर तिला समाजमान्यता कधीचीच मिळाली असती. परंतु गांधी हत्त्येच्या ७० वर्षांनंतरही कलाकृतीच्या कुबड्या घेऊन खुनी द्वेषाचे वारंवार समर्थन का करावे लागत आहे, या प्रश्नाचे उत्तर पोंक्षेंकडे नाही. गांधींना मारल्यानंतरही गोडसेभक्तांना विखारी हिंदुत्व जनमानसात रुजवता आले नाही, हा देश बहुसंख्य हिंदूंचा असूनही हे हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही? गांधी अजूनही मरत का नाही? गोडसेच्या वंशजांना हे वैफल्य सतत डाचत असते. या नैराश्यातूनच मग ते गोडसेला ‘महात्मा’ संबोधतात, त्याची जयंती-पुण्यतिथी साजरी करतात. एखाद्या हस्तकाला हाताशी धरून सुरुवातीला ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ आणि त्यातून काही साध्य झाले नाही तर ‘हे राम... नथुराम’सारखे विकृत खेळही सुरू करतात. हा हाडकुळा म्हातारा देहरूपाने अस्तित्वात नसूनही नथुराम भक्तांना त्याची अशी सतत भीती वाटत असते.
या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल्ल होत असल्याने पोंक्षे आणि प्रवृत्ती चेकाळली आहे. एरवी पत्रकारांशी बोलत असतानाही पोंक्षेंमध्ये नथुराम संचारलेला असतो आणि त्यांची नजर गर्दीतल्या गांधीला शोधत असल्याचे सारखे जाणवत असते. प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याने पोंक्षेंना नागपुरातील दुसऱ्या दिवशीचा प्रयोग रद्द करावा लागला, हे वास्तव आहे. हा देश गांधींचा आहे, गोडसेचा नाही, हा धडा पोंक्षेंनी आतातरी घ्यायला हवा. कलेच्या क्षेत्रातील या विकृतीविरुद्ध अंहिसक लढ्याचे नवे शस्त्र नागपूरकरांनी साऱ्यांना दिले आहे. गांधींनीच एकदा सांगितले होते, ‘एखादा राक्षस तुमच्या समोर उभा असेल तर हातात दगड किंवा बंदूक घेऊ नका, त्याच्याकडे पाठ फिरवा आणि दुर्लक्ष करा, तो आपोआप पराभूत होईल.’ नागपूरकरांनी नथुरामच्या प्रयोगाला पाठ दाखवून महात्म्याचाच मार्ग निवडला. यापुढे ‘नथुराम’चे विकृत प्रयोग जिथे होतील तिथे हा सत्याग्रह करून बघा. मग माथेफिरू नथुराम कायमचा फासावर लटकलेला दिसेल.

 

Web Title: New fight against Nathuram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.