तरुणाईचे नवे विचारच नवी उंची गाठून देतील
By विजय दर्डा | Published: January 1, 2018 01:36 AM2018-01-01T01:36:13+5:302018-01-01T01:43:09+5:30
नववर्षाच्या स्वागतासाठी कालची रात्र संपूर्ण जगभर उजळून निघाली. तुम्हीही रोषणाईचा झगमगाट केला असेल. दिव्यांच्या माळा लावल्या असतील, आनंदोत्सव केला असेल आणि काही नवे संकल्पही केले असतील! आजच्या या स्तंभात मला संकल्पांबद्दलच सांगायचे आहे. पण त्याआधी सुमारे १६० वर्षांपूर्वीची एक सत्यघटना सांगतो.
नववर्षाच्या स्वागतासाठी कालची रात्र संपूर्ण जगभर उजळून निघाली. तुम्हीही रोषणाईचा झगमगाट केला असेल. दिव्यांच्या माळा लावल्या असतील, आनंदोत्सव केला असेल आणि काही नवे संकल्पही केले असतील! आजच्या या स्तंभात मला संकल्पांबद्दलच सांगायचे आहे. पण त्याआधी सुमारे १६० वर्षांपूर्वीची एक सत्यघटना सांगतो. आपल्या जगात कधीही अंधार असू नये यासाठी ज्याने विजेच्या दिव्याचा शोध लावला त्या व्यक्तीची ही कहाणी आहे. त्याचे नाव होते थॉमस अल्वा एडिसन!
एडिसनचा जन्म ११ फेब्रुवारी १८४७ रोजी अमेरिकेत झाला. थोडे मोठे झाल्यावर ते शाळेत जाऊ लागले. एकदा ते शाळेतून येताना हातात एक लिफाफा घेऊन आले. शिक्षकाने त्यांच्या आईला देण्यासाठी तो दिला होता. एडिसनची आई नॅन्सी मॅथ्यु यांनी तो लिफाफा उघडला व त्यात जे लिहिले होते ते वाचून तिला एकदम रडू फुटले. आई, रडायला काय झाले, असे एडिसनने विचारले. मुलाला प्रेमाने गोंजारत आई म्हणाली, तुमचा मुलगा खूप हुशार आहे, हुन्नरी आहे. आमची शाळा खूप लहान आहे व ती त्याच्या लायकीची नाही, असे मास्तरांनी लिहिले आहे. यानंतर अनेक वर्षे एडिसन शाळेत गेले नाहीत. आईने त्यांना घरीच शिकविले. आणखी काही काळ गेला आणि त्यांची प्रतिभा समोर येऊ लागली. त्यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला, फोनोग्राम बनविला, मूव्ही कॅमेरे तयार केले. त्यांनी शंभराहून अधिक नवनवीन वस्तू तयार केल्या. तोपर्यंत त्यांची आई इहलोकाची यात्रा संपवून गेलेली होती. एक दिवस जुन्या वस्तूंची उचलठेव करताना एडिसनना तो लिफाफा मिळाला. शाळेतून आईला पाठविलेली ती चिठ्ठी त्यांनी वाचली आणि त्यांना अश्रू आवरले नाहीत. कारण त्या चिठ्ठीत खरं तर असे लिहिले होते की, तुमचा मुलगा बौद्धिकदृष्ट्या अगदीच कमजोर आहे. त्याला आम्ही शाळेत ठेवू शकत नाही. त्याला शाळेतून काढून टाकले आहे! आईच्या आठवणीने एडिसन यांचा गळा दाटून आला. शाळेच्या मुख्याध्यापकांनी ज्या मुलाला मंदबुद्धी म्हटले होते त्याच मुलाला आईने जगातील एक महान वैज्ञानिक म्हणून आकार दिला होता!
खरं तर ही गोष्ट भरपूर आश्वासक आहे. एडिसन रूढ मार्गाने जाणारे नव्हते त्यामुळे शाळेला ते मंद बुद्धीचे वाटले. पण मुलाच्या चौकसबुद्धीवर आईचा दुर्दम्य विश्वास होता. त्यामुळे त्या माऊलीने त्यांना शक्ती दिली. आपल्या मुलांनीही नव्या वाटेने जावे असे वाटत असेल तर तुम्हीही तुमच्या मुलांना समजून घ्या. त्यांच्या विचारांना चालना द्या. कल्पनांना मूर्त रूप देण्यासाठी त्यांना बळ द्या. मुख्य म्हणजे त्यांच्यावर पूर्ण भरवसा ठेवा. आपण आपल्या नव्या पिढ्यांना योग्य मार्गावर नेण्यात यशस्वी झालो तर भारत विश्वगुरू होणार हे नक्कीच!
त्यामुळे नववर्षाच्या आजच्या पहिल्या दिवशी आपण सर्वांनी युवाशक्तीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचा संकल्प करू या. त्यांच्या नवविचारांना, नव्या कल्पनांना व नवउन्मेषाला शक्य तेवढे सहकार्य करण्याचा निर्धार करू या. ‘तरुण पिढी ही आपली सर्वात मोठी शक्ती आहे,’ असे स्वामी विवेकानंदांनी फार पूर्वीच सांगितले होते. त्यांचे हे कथन पूर्वी जेवढे सत्य होते त्याहूनही आज अधिक समर्पक आहे. कारण भारताची सुमारे ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांहून कमी वयाची आहे. सन २०२० पर्यंत आपण जगातील सर्वात तरुण देश ठरू, असे दिसते. या युवाशक्तीच्या पंखांना बळ देण्यासाठी सरकार त्यांच्या परीने प्रयत्न करते आहेच. सन २०१४ मध्ये राष्ट्रीय युवा धोरण जाहीर करताना सरकारने म्हटले होते की, युवापिढीच्या क्षमता ओळखणे, त्यानुसार त्यांना संधी उपलब्ध करून देणे आणि त्या माध्यमातून त्यांना जगात योग्य स्थान मिळवून देणे हा या धोरणाचा मुख्य उद्देश आहे.
पण युवाशक्तीच्या बाबतीत आपला समाज सध्या योग्य मार्गाने जात आहे का, हा खरा प्रश्न आहे. दिशा ठीक आहे, पण गती कमी आहे, असे मला वाटते. आपल्या युवाशक्तीने भरपूर प्रतिभा दाखविली आहे. परंतु अनेक युवकांना नानाविध कारणांनी प्रतिभा असूनही संधी उपलब्ध होत नाही. ज्यांना संधी मिळते ते आपल्या आवडीनुसार रस्ता निवडू शकत नाहीत, कारण आई-वडिलांची त्यांच्याविषयी काही वेगळीच महत्त्वाकांक्षा असते. मुलात वेगळेपण काय आहे व त्याला आयुष्यात नेमके कोण व्हायचे आहे, हे समजून घेण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न आपल्याकडे व्हावे तेवढे होत नाहीत. लाखो मुले पदवी घेऊन बाहेर पडतात. पण पुढे काय, हा प्रश्न त्यांच्यापुढे आवासून उभा असतो. जगातील विकसित देशांमध्ये याच्या नेमकी उलट स्थिती आहे. तेथे माध्यमिक शाळेच्या स्तरावरच मुलांचा कल काय आहे व ते कशात सर्वोत्तम ठरू शकतात, याचे मूल्यमापन केले जाते. त्यानुसार त्याचे पुढचे शिक्षण होते.
मला असे वाटते की, संधी उपलब्ध करून देण्याचे सर्व प्रयत्न सरकारच्या पातळीवर व्हायला हवेतच. पण कुटुंबांनीही यात महत्त्वाची भूमिका बजवायला हवी. मुलगा चांगली चित्रे काढतो किंवा त्याला संगीतात रुची आहे तरी त्याला मारून-मुटकून डॉक्टर-इंजिनियर करण्याचे प्रयत्न होण्याची अनेक उदाहरणे मला माहीत आहेत. परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीकडेच फक्त आई-वडिलांचे लक्ष असते. मुलांची जिज्ञासा वाढावी याकडे फारच कमी लक्ष दिले जाते.
शालेय पुस्तकांच्या बाहेर जाऊन काही तरी नवे जाणून घेण्याची त्याला इच्छा व्हावी, यासाठी आपण काही करत नाही. भारतीय कुटुंबांनी हे केले तर आपणही जास्तीत जास्त मुलांना प्रतिभावंत करू शकू. जगातील महान वैज्ञानिकांच्या मांदियाळीत आपलीही मुले-मुली चमकतील. हे कायम लक्षात ठेवा की, नवविचारांना प्रोत्साहन दिले तरच नवा पडाव गाठता येईल...!
हे लिखाण संपविण्यापूर्वी...
नव्या वर्षाच्या सुरुवातीला मला खूप आवडणारी एक नितांत सुंदर कविता तुमच्यासोबत शेअर करतो. कवी आहेत योगेंद्र दत्त शर्मा:
अंधेरी रात नभ से छंट गई है
हठीली धुंध सारी हट गई है,
नई रौनक उषा के साथ आई,
नए विश्वास की सौगात आई,
नया उत्साह है ठंडी हवा मे
नई आशा अचानक हाथ आई.