क्षमतांचा नव्याने परिचय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 01:52 AM2020-04-04T01:52:48+5:302020-04-04T01:53:47+5:30

कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तसा अशा महामारीचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या पूर्वतयारीचा अभाव निदर्शनास येऊ लागला.

A new introduction to capabilities | क्षमतांचा नव्याने परिचय

क्षमतांचा नव्याने परिचय

googlenewsNext

गरज ही शोधाची जननी आहे, हा वाक्प्रचार प्रत्येक मराठी माणूस लहानपणापासून ऐकत असतो. ‘कोरोना’मुळे त्या वाक्प्रचाराची प्रचितीही येऊ लागली आहे. कोरोनाचे संकट आपला देश या वैश्विक महामारीचा सामना करूच शकणार नाही आणि कोट्यवधी बळी जातील, अशी आशंका अनेकांच्या मनात डोकावली होती. हे संकट टळले नसले, तरी कोरोनामुळे बाधित आणि मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या, या दोन्ही निकषांवर भारताची कामगिरी पुढारलेल्या देशांच्या तुलनेत खूप उजवी ठरली आहे. त्याचे श्रेय निश्चितपणे तोकड्या साधनसामग्रीनिशी उपचारार्थ जुंपून घेतलेले डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे!

कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तसा अशा महामारीचा सामना करण्यासाठी आवश्यक त्या पूर्वतयारीचा अभाव निदर्शनास येऊ लागला. चाचणी किट, पीपीई किट, व्हेंटिलेटर्स, एवढेच नव्हे तर साध्या मास्क व ग्लोव्हजचाही अत्यंत अपुरा साठा असल्याचे समोर आले. काही भारतीय कंपन्या आणि वैज्ञानिकांनी हे आव्हान पेलले आणि अत्यंत अल्प कालावधीत उत्कृष्ट दर्जाचे किट, व्हेंटिलेटर्स व इतरही आवश्यक सामग्री विकसित केली. एवढेच नव्हे तर कोरोना प्रतिबंधक लस व औषध तयार करण्याचे कामही वेगाने सुरू आहे. पुणेस्थित मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स या खासगी क्षेत्रातील संस्थेने कोरोना चाचणीसाठी आवश्यक किट अवघ्या सहा आठवड्यात विकसित केली.

महिन्द्र अ‍ॅण्ड महिन्द्र या वाहन उद्योगातील कंपनीने व्हेंटिलेटर्सचा तुटवडा लक्षात घेऊन अत्यल्प कालावधीत व्हेंटिलेटर विकसित केले आणि ते अवघ्या साडेसात हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. दुसरीकडे सिरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया, झायडस कॅडिला व भारत बायोटेक या कंपन्यांनी कोरोना प्रतिबंधक लस तयार करण्याच्या कामी जुंपून घेतले आहे. सिपला ही औषध उत्पादन क्षेत्रातील बडी कंपनी लवकरच कोरोनावरील औषध बाजारात आणण्याच्या तयारीत आहे.

कोरोनाचा सामना करण्याच्या उद्देशाने भारतात सुरू असलेले संशोधन केवळ प्रतिबंध व उपचार या अंगानेच सुरू आहे असे नव्हे, तर इतर आनुषंगिक बाबींचाही विचार केला जात आहे. आयआयटी आणि एआयआयएमएस या जागतिक कीर्तीच्या भारतीय शिक्षण संस्थांचे माजी विद्यार्थी असलेल्या देबयान साहा व डॉ. शशी रंजन यांनी तयार केलेला प्रचंड आकाराचा यंत्रमानव संपूर्ण शहरात संचार करून रस्ते, बसस्थानक, रेल्वेस्थानक, मॉल, रुग्णालये व तत्सम स्थळांचे निर्जंतुकीकरण करण्यास सक्षम आहे. चेन्नईस्थित गरुडा एअरोस्पेस या ड्रोन उत्पादक कंपनीचे ड्रोन छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये निर्जंतुकीकरणाचे काम करीत आहेत.

तमाम भारतीयांना अभिमान वाटावी अशीच या सर्व कंपन्या आणि वैज्ञानिकांची कामगिरी आहे. त्यांचे कौतुक झालेच पाहिजे; मात्र आम्ही तहान लागल्यावरच विहीर का खोदतो, याचाही विचार यानिमित्ताने झाला पाहिजे. भारतीय नक्कल करण्यात अव्वल आहेत; मात्र अभिजात संशोधन करण्यात अथवा अभिनव तंत्रज्ञान शोधण्यात कमी पडतात, हा आरोप नेहमीच होतो. त्यामध्ये निश्चितच तथ्य आहे. सुंदर पिचाई, सत्या नाडेला, लक्ष्मण नरसिम्हन, राजीव सुरी, शंतनू नारायण आदी भारतीय गुगल, मायक्रोसॉफ्ट, नोकियासारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचे नेतृत्व करीत आहेत. मात्र, अशी एकही कंपनी भारतीयाने सुरू केलेली नाही. अनेक भारतीय संगणक अभियंते जगभरातील कंपन्यांमध्ये सेवा देत आहेत. मात्र, नावाजलेली एकही संगणकप्रणाली विकसित करण्याचे श्रेय भारतीय तंत्रज्ञांच्या नावे नाही!

उपलब्ध साधनसामग्रीतून अत्यल्प वेळात कामचलाऊ उत्तर शोधण्याचे भारतीयांचे कसब एव्हाना ‘जुगाड’ नावाने जगात ख्यात झाले आहे. त्यामुळे भारतीयांमध्ये कल्पकता नाही, असे म्हणता येणार नाही. ही कल्पकता केवळ नक्कल करण्यासाठी न वापरता, अभिनव, अभिजात शोधकार्यासाठी वापरल्यास आम्ही जगाला नवे तंत्रज्ञान, उपकरणांची देणगी देऊ शकू ! ‘कोरोना’च्या निमित्ताने आमच्या व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या हे खरे; पण सोबतच अत्यल्प वेळात उपलब्ध साधनसामग्रीतून मार्ग काढण्याच्या क्षमतांचाही नव्याने परिचय झाला. ही सुसंधी मानून, भविष्यात अशी आपदा उभी ठाकल्यास आधीच तयारीत असू, अशी व्यवस्था निर्माण करण्यास प्राधान्य द्यायला हवे!

भारतीयांमध्ये कल्पकता नाही असे नाही. ती केवळ नक्कल करण्यासाठी न वापरता, अभिनव, अभिजात शोधकार्यांसाठी वापरल्यास, आम्ही जगाला नवे तंत्रज्ञान, उपकरणांची देणगी निश्चितपणे देऊ शकू!

Web Title: A new introduction to capabilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.