आपल्या मुलांच्या वाटेतील नवे अडथळे : शिक्षा, स्पर्धा आणि धर्म !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2023 06:05 AM2023-04-29T06:05:38+5:302023-04-29T06:05:52+5:30

आपल्या मुलांनी त्यांच्या जीवनातील ताण शक्य तेवढा सैल करून निर्मितीचा नवानंद घेत सुखानं जगावं, एवढंच तर आपल्याला हवं असतं ना?

New obstacles in the way of our children: punishment, competition and religion of education | आपल्या मुलांच्या वाटेतील नवे अडथळे : शिक्षा, स्पर्धा आणि धर्म !

आपल्या मुलांच्या वाटेतील नवे अडथळे : शिक्षा, स्पर्धा आणि धर्म !

googlenewsNext

प्रत्येक मुलाच्या मेंदूच्या वाढ-विकासाचा एक प्रवास असतो. कुठलीही अडचण नसली तर तो  वेगात सुरू असतो. वाटेत अचानक स्पीडब्रेकर आला तर बाळाचं वाढ-वाहन अडतं, उडतं किंवा पडतं. आजच्या सुधारित, तंत्रशास्त्र निपुण जगातही पालकत्वाच्या रस्त्यावरचे काही स्पीडब्रेकर बाळाच्या वाढीचा वेग तर कमी करतातच, पण  कायमची कमतरताही निर्माण करू शकतात असे अनेक स्पीडब्रेकर आहेत. त्यातील एकाचं नाव आहे शिक्षा ! 

‘छडी लागे छम छम विद्या येई घम घम’ असं पूर्वी म्हणत. आजकाल शहरी शाळांमध्ये अगदी असं म्हणत नसतील पण कुठल्या ना कुठल्या प्रकारच्या शिक्षा करतातच. छडी लागल्यावर कोणती विद्या घमघमून येते आणि ‘काय केलं की ही छडी मला पुन्हा शक्यतो लागणार नाही’ हे मुलाला कळू लागतं. काही वेळा आपल्याला छडी लागू नये म्हणून आपण ते विषय अभ्यासावेत असं मुलांना वाटू शकतं, आणि ती मुलं मोठी झाल्यावर मला सरांनी फटके मारले म्हणून मला गणित आलं, असं म्हणतात. पण काहीजण ‘मला शिक्षा केल्यामुळे गणिताची भीती बसली, मला गणित आलंच नाही’ असंही म्हणतात. त्यातून गणित, भाषा समाजशास्त्र येतं की नाही हा मुद्दा फारसा महत्त्वाचा उरतच नाही, तर ‘शिक्षेला घाबरायचं’ हा भयंकर धडा मुलं शिकतात. यामुळे मुलाचा मेंदू पूर्ण क्षमतेने काम करू शकत नाही. मूल त्याच्या वृत्तीनुसार एकतर घाबरून ऐकायला किंवा ऐकल्यासारखं खोटं दाखवायला लागतं. 
आपलं काम व्हावं म्हणून आमिष दाखवणं, ते न केल्यास मार पडण्याची भीती दाखवणं ही गोष्ट मानवी मेंदूची असीम ताकद न ओळखता तिला पशुपातळीवर मर्यादित ठेवणं आहे. हा गंभीर गुन्हा पालक, शिक्षकांकडून वारंवार घडतो. त्याचे परिणाम पुढे भीतीला घाबरण्यात किंवा स्वत: भीती निर्माण करण्यात होतात, तेव्हा हे आपलं पाप आहे याची त्या पालक-शिक्षकांना जाणीवही नसते.

मानवी मेंदूची ताकद लक्षात न घेता तिला आमिष आणि शिक्षा यांच्या वर्तुळात फिरवत राहाणं यातूनच स्पर्धा कल्पनेला  पुष्टी मिळते. हा असतो दुसरा स्पीडब्रेकर. स्पर्धा मनाची अपरिमित हानी करते. माणसांना एकमेकांपासून दूर नेते, तोडते. स्पर्धेपेक्षा सहकार्याने खूप चांगलं काम होतं. पण आजच्या जगातून स्पर्धा दूर करणं आता आपल्या हाती राहिलेलं नाही. मग काय करता येईल? मुलांना स्पर्धा म्हणजे नक्की काय आहे याची जाणीव करून देणं, त्याचा उपयोग व्हावा पण अपाय मात्र होऊ नये, यासाठी स्पर्धेच्या आहारी न जाता, स्पर्धा आपल्या नियंत्रणाने वापरणं हे मुलांना शिकवणं शक्य आहे. अधिकाधिक वेगवान, दर्जेदार, कुशल जग होत जाणं ही चांगलीच गोष्ट, त्यातला मीपणा कमी ठेवायला आपण शिकलो तर जग निश्चित अधिक भद्र होईल.
हा मीपणा आपल्याला संकुचित करतो आहे. मानवी बुद्धीची असिम ताकद खुरटून टाकतो आहे. त्यातून एक प्रचंड मोठा स्पीडब्रेकर समोर येतो, तो म्हणजे धर्म ! माणसानेच निर्माण केलेले धर्म आज माणसाहून मोठे, जगड्व्याळ होऊन बसले आहेत. भारताच्या संविधानात धर्म ही प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक बाब मानलेली आहे. त्यामुळे घरात जरी बालकांना त्या कुटुंबाचा धर्म मानावा लागला तरी कोणत्याही जाहीर ठिकाणी कोणत्याही विशेष धर्माची डिंडिम चालवली जाऊ नये. 

मूल वाढवण्यामागची आपली धारणा आणि धोरण काय असतं? - आपल्या मुलांनी मोकळेपणानं जीवनातले ताण शक्य तेवढे सैल करून निर्मितीचा नवानंद घेत सुखानं जगावं !  आज वेगवेगळ्या प्रदूषणांनी, वातावरणातल्या बदलांनी अवघड केलेल्या जीवनाला भिडणं मुलांना भागच आहे, अशावेळी निदान त्यांचा वेग अडवणारे हे स्पीडब्रेकर त्यांच्या वाढीविकासाच्या आड येऊ नयेत, त्यांची वाढ निर्धोक आणि प्रसन्नपणे होत राहावी. याहून वेगळं आपल्याला काय हवं असणार, होय ना?
-संजीवनी कुलकर्णी, विश्वस्त, प्रयास व पालकनीती

sanjeevani@prayaspune.org
 

 

Web Title: New obstacles in the way of our children: punishment, competition and religion of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.