नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर नव्या संधी आणि नवी आव्हाने!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 08:23 AM2023-12-18T08:23:44+5:302023-12-18T08:24:57+5:30

सरत्या वर्षात काही काही निराश करणाऱ्या घटना आपण पाहिल्या. नव्या वर्षात काही आशेचे किरणही दिसत आहेत. ते आपल्याला बळ देतील.

New opportunities and new challenges on the threshold of a new year! | नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर नव्या संधी आणि नवी आव्हाने!

नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर नव्या संधी आणि नवी आव्हाने!

- साधना शंकर, निवृत्त केंद्रीय राजस्व अधिकारी

सन २०२३ हे वर्ष संपत आले असताना आणि दुर्दैवी, निराश करणाऱ्या घटना घडत आहेत; तरीही दरवर्षीप्रमाणे आशेचे किरणही दिसत आहेत. ही आशाच व्यक्तीं आणि समुदायांना धैर्य आणि शक्ती देत असते. आपल्या अवतीभवती तंत्रज्ञान आणि नवनवीन गोष्टी झपाट्याने वाढत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, यंत्राचे अध्ययन, स्टार्टअप्स आणि नवे शोध या सगळ्यांचा जोरदार बोलबाला झालेला आहे. आजूबाजूला अखिल भवतालाला व्यापणारे बदल मोठ्या वेगाने होत आहेत आणि तेच आशेचे अग्रदूत होत. आपण जीवनाच्या दुसऱ्या कक्षात प्रवेश करत असून अनेक नव्या संधी आणि आव्हाने त्यात आहेत.

वातावरणाच्या आघाडीवर आशादायी गोष्टी आहेत. हरितऊर्जा आपले जगणे बदलून टाकणार आहे. सौर आणि पवनऊर्जेसारख्या पुन्हा वापरता येतील अशा ऊर्जेच्या स्रोतांकडे जग चालले आहे. दुबईत ‘कॉप २८’ नुकतीच झाली. कोळशाचा इंधन म्हणून वापर टप्प्याटप्प्याने कमी करून इतर ऊर्जास्रोतांकडे जाण्यावर यासंबंधी त्या ठिकाणी करार झाले. २०५० पर्यंत शून्य उत्सर्जन उद्दिष्ट ठेवण्यात आले. या परिषदेचे दुसरे फलित म्हणजे नुकसान निधीला समृद्ध राष्ट्रांनी मदत करावी, असे पहिल्यांदाच ठरले. आता हा निधी ६.५ कोटी डॉलर्स इतका होईल.

स्त्री आणि पुरुषांच्या संख्येतील तफावतीबाबत जागतिक आर्थिक मंचाने २०२३ चा अहवाल प्रसिद्ध केला. त्यानुसार स्त्रियांच्या संख्येबाबत काळजी वाटावी अशी स्थिती आहे. हा अहवाल म्हणतो ‘२००६ ते २०२३ या कालावधीत झालेल्या प्रगतीचा दर पाहता स्त्री-पुरुषांची राजकीय सक्षमीकरण तफावत भरून यायला १६२ वर्षे लागतील. आर्थिक सहभाग आणि संधी यांतील तफावत भरायला १६९ वर्षे तर शैक्षणिक तफावत दूर व्हायला १६ वर्षे लागतील. आरोग्य आणि आयुर्मानविषयक तफावतीसंबंधी काहीच निर्देश अहवालात नाही. मात्र जगभरात आपण ३० ठिकाणी स्त्रिया सरकारच्या प्रमुख झालेल्या आपण पाहतो आहोत, ही आशादायी गोष्ट आहे.

नवनव्या क्षेत्रात महिला नेतृत्व करत आहेत. टेलर स्विफ्ट या गायिकेने त्या उद्योगातील संकल्पना बदलून टाकल्या. यंदाचा तिचा आर्थिक प्रभाव लक्षणीय होता. तिच्या एरास दौऱ्यात विक्रमी पंचाऐंशी कोटी डॉलर्स इतकी कमाई झाली. अमेरिकन अर्थव्यवस्थेला त्यातून बळ मिळाले. मेक्सिकोतील निवडणुका २०२४ मध्ये होत असून, सर्वोच्च पदासाठी दोन महिला स्पर्धेत उतरल्या आहेत. अवकाश संशोधनात २०२४ साली अनेक मैलांचे दगड स्थापित होतील, असे दिसते.

‘नासा’च्या आर्टेमिस कार्यक्रमानुसार २०२४ मध्ये पहिल्यांदा स्त्रीला चंद्रावर उतरवले जाईल. ‘इस्रो’ची गगनयान एक, मंगलयान दोन आणि शुक्रयान एक २०२४ मध्ये अवकाशात पाठविण्यासाठी तयारी सुरू आहे. मंगळ आणि शुक्राच्या दिशेनेही मोहिमा आखण्यात येत आहेत. पुढच्या वर्षी समनुष्य अवकाश मोहिमा राबवल्या जातील, ही आनंदाची आणि उत्साहाची गोष्ट आहे.

प्राणिजगतातही २०२४ साल आशा घेऊन येत आहे. संयुक्त राष्ट्रांनी आगामी वर्ष हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष म्हणून जाहीर केले आहे. आयमास, अल्पाकस, विसुनास आणि ग्वानाको अशा सगळ्या प्रजाती उंट या प्राणी छत्राखाली येतात. ९० हून अधिक देशांत लक्षावधी लोकांच्या उदरनिर्वाहाशी उंट हा प्राणी कसा निगडित आहे, हे या वर्षात अधोरेखित केले जाईल. अन्नाची हमी, पोषण आणि आर्थिकवाढीसाठी हा प्राणी मदत करतो. त्याचप्रमाणे जगभरातील विविध समुदायांसाठी सांस्कृतिकदृष्ट्याही तो महत्त्वाचा ठरतो. या शाही प्राण्याकडे वर्ष त्याच्या नावाने साजरे होत असल्याने लक्ष राहील आणि परिणामी आपण इतर जिवांसाठी काही करतो आहोत, याचे स्मरण आपल्याला राहील. पुढचे वर्ष माणसाला नवनवीन अशा अनेक संधी देणारे ठरेल अशी आशा करूया...

Web Title: New opportunities and new challenges on the threshold of a new year!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.