‘मातृभूमी’चा नवा पॅटर्न
By राजा माने | Published: August 18, 2017 12:36 AM2017-08-18T00:36:55+5:302017-08-18T00:37:19+5:30
आपण कुठेही असलो तरी आपल्या गावाची ओढ प्रत्येकाला असते. गावासाठी काहीतरी केले पाहिजे या अनिवासी भूमिपुत्रांच्या भावनेला फुंकर घालणारा बार्शी येथील ‘मातृभूमी प्रतिष्ठान’चा नवा पॅटर्न...
आपण कुठेही असलो तरी आपल्या गावाची ओढ प्रत्येकाला असते. गावासाठी काहीतरी केले पाहिजे या अनिवासी भूमिपुत्रांच्या भावनेला फुंकर घालणारा बार्शी येथील ‘मातृभूमी प्रतिष्ठान’चा नवा पॅटर्न...
जिथे आपण जन्मलो, वाढलो त्या गावाची ओढ प्रत्येकाला सदैव असते. दुनियादारीच्या रहाटगाडग्यात कोण कुठेही पोहोचला तरी त्याला गावाची ओढ स्वस्थ बसू देत नाही. याच ओढीतून आपल्या गावात चांगले घडत राहावे ही भावना वाढीस लागते. त्या भावनेला योग्य आकार मिळाल्यास किती चांगले काम उभे राहू शकते याचे उदाहरण म्हणून सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील मातृभूमी प्रतिष्ठान या संस्थेचे नाव आवर्जून घ्यावे लागेल.
वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी होऊन स्वत:च्या पायावर उभी राहिलेली ‘अनिवासी’ गावकरी मंडळी प्रत्येक गावात असतात. त्या गावासाठी काहीतरी करण्याची प्रबळ इच्छाही त्यांच्यामध्ये असते. पण नक्की काय करायचे या प्रश्नाचे उत्तर सापडत नाही आणि अशा लोकांची इच्छा केवळ मनातच राहते. नेमक्या याच वेदनेची जाणीव सनदी अधिकारी संतोष पाटील, अविनाश सोलवट आणि त्यांच्या मित्रमंडळीला झाली. त्यातूनच बार्शी तालुक्यातील वेगवेगळ्या क्षेत्रातील अराजकीय व्यक्तींना एकत्र करून आपल्या भागाच्या विकासासाठी हातभार लावणारी चळवळ उभी करण्याचा विचार पुढे आला. प्रशासकीय सेवेपासून कलाक्षेत्रापर्यंत प्रत्येक क्षेत्रात बार्शीचे भूमिपुत्र देशात आणि परदेशात कार्यरत असल्याची माहिती मिळाली. आयएएस, आयपीएसपदांपासून तलाठी पदापर्यंत वेगवेगळ्या पदांवर बार्शी तालुक्यातील लोक काम करीत असल्याचे दिसून आले. त्यांना आपल्या तालुक्यासाठी काहीतरी करण्याची तळमळ असल्याचेही समजले. याच आधारावर पाटील व सोलवट यांनी बार्शीत स्थायिक असलेल्या काही सेवाभावी लोकांशी चर्चा केली. प्रतापराव जगदाळे, उद्योजक संतोष ठोंबरे, अजित कुंकूलोळ, मुरलीधर चव्हाण, अशोक हेड्डा, मधुकर डोईफोडे, डॉ.लक्ष्मीकांत काबरा, विनय संघवी, प्रा. किरण गायकवाड, कमलेश मेहता, सयाजीराव गायकवाड, अमित इंगोले, गणेश शिंदे आदींसारख्या विविध क्षेत्रातील सेवाभावींना एकत्र करून अनिवासी बार्शीकरांना साथीला घेऊन कायमस्वरूपी संघटन तयार करण्याचा निर्णय झाला. त्या संघटनेचे नेतृत्व संतोष ठोंबरे यांच्याकडे देण्यात आले आणि तिथेच महाराष्टÑाच्या समाजसेवी चळवळीला दिशा देऊ पाहणाºया मातृभूमी प्रतिष्ठान या नव्या पॅटर्नचा जन्म झाला.
सुरुवातीच्या काळात १२ खेड्यांना टप्प्या-टप्प्याने शुद्ध पाणी प्रकल्प बसविणे, प्राथमिक शाळेतील मुला-मुलींसाठी शाळेच्या आवारात खेळण्याची सुविधा उपलब्ध करून देणे, गावातील बसथांब्यावर महिलांसाठी निवारा उभा करणे असे उपक्रम राबविण्यात आले. शुद्ध पाणी आणि आरोग्य यावर प्रबोधन करण्यासाठी प्रत्येक गावात प्रचारफेºया आयोजित करण्यात आल्या. लोक प्रत्येक उपक्रमात फक्त लाभ न घेता ते काम उभे करण्यासाठी स्वत: कष्ट घेऊ लागले. हे मूलभूत काम सुरू असताना ‘जिथे कमी, तिथे आम्ही’ हे सूत्र अंगिकारून प्रतिष्ठानने लोकांच्या मदतीने तालुक्यातील गाळ काढण्याच्या मोहिमेपासून ते थेट दर्जेदार व्याख्यानमालेच्या आयोजनापर्यंत आपला सहभाग वाढविला. त्याचाच परिणाम म्हणून देशात केवळ बार्शीत एकमेव मंदिर असल्याची ख्याती असलेल्या ग्रामदैवत भगवंत महोत्सवात महाप्रसादासारखे उपक्रम उत्साहाने पार पडू लागले.
आज प्रत्येक गावामध्ये वृद्ध आणि निराधारांच्या पालनपोषणाचा प्रश्न गंभीर बनत आहे. त्यावर उपाय म्हणून अशा निराधारांसाठी दोनवेळ भोजनाची व्यवस्था करण्याचा निर्णय झाला. खामगाव, सुर्डी व श्रीपतपिंपरी या गावांमध्ये प्रत्येकी २० लाभार्थ्यांना घरपोच जेवण देण्याची सोय करण्यात आली. या सुविधेची निकड लक्षात घेऊन बार्शी शहर सर्वेक्षण करून निराधारांची माहिती संकलित करण्यात आली. त्यातूनच अन्नपूर्णा ही योजना साकार झाली. आज या योजनेतून निराधारांना दररोज दीडशे डबे घरपोच दिले जातात. याला जोडूनच बार्शीतील कॅन्सर हॉस्पिटल व जगदाळेमामा हॉस्पिटल येथे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी माफक दरात पोळीभाजी केंद्राची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. आरोग्यापासून नव्या पिढीच्या करिअरपर्यंतच्या विषयात मदत करण्याचा कृतिशील मानस मातृभूमीच्या प्रत्येक सदस्यांमध्ये दिसतो. आता अनेक अनिवासी बार्शीकर मातृभूमी परिवारात दाखल होताना दिसतात.