पाकमध्ये नवा गडी, नवा डाव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2022 12:16 PM2022-11-26T12:16:52+5:302022-11-26T12:18:47+5:30

आता इम्रान यांना जनतेचा पाठिंबा वाढत असताना शरीफ बंधूंनी मुनीर यांना लष्करप्रमुख पदावर बसवून लष्कराच्या हातून साप मारण्याचा डाव आखला आहे.

New player, new innings in Pakistan | पाकमध्ये नवा गडी, नवा डाव

पाकमध्ये नवा गडी, नवा डाव

googlenewsNext

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला शनिवारी चौदा वर्षे पूर्ण होत असताना लेफ्टनंट जनरल असीम मुनीर हे पाकिस्तानचे नवे, सतरावे लष्करप्रमुख बनले आहेत. इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स किंवा आयएसआय या पाक गुप्तचर संस्थेचे प्रमुख राहिलेले सैन्याधिकारी लष्करप्रमुख बनण्याचा हा पाकच्या इतिहासातील जनरल अशफाक परवेझ कयानी यांच्यानंतरचा केवळ दुसरा प्रसंग आहे. अकरा वर्षे पाकिस्तानवर राज्य करणारे जनरल झिया उल हक यांचा कट्टरपंथी सैन्याधिकारी चेला अशी असीम मुनीर यांची ओळख आहे. 

मिलिटरी इंटेलिजन्स व आयएसआय या दोन्ही संस्थांचे प्रमुख राहिलेले फारसे कुणी पाक लष्करप्रमुख बनलेले नाही. अर्थात मुनीर हे अवघे आठ महिने आयएसआयचे महासंचालक होते. त्याचदरम्यान फेब्रुवारी २०१९ मध्ये काश्मीर खोऱ्यात पुलवामा येथे दहशवाद्यांनी घडवून आणलेल्या स्फोटात चाळीस भारतीय जवानांचा बळी गेला होता. त्यानंतर सर्जिकल स्ट्राइकवेळी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसाठी अजित डोवाल यांना मुनीर यांच्याशीच बोलावे लागले होते. जनरल कमर जावेद बाजवा यांच्याकडून येत्या २९ तारखेला असीम मुनीर सूत्रे स्वीकारतील तेव्हा कदाचित पाकिस्तानच्या राजकारणातील लष्कराच्या हस्तक्षेपाचे, त्याचप्रमाणे भारत-पाक संबंधाचे एक नवे वळण सुरू होईल. ते वळण नेमके कसे असेल, या प्रश्नाची काही उत्तरे पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात दडली आहेत तर काही बाहेर आहेत. असीम मुनीर हे संपूर्ण कुराण पाठ असणारे म्हणजे हाफीज-ए-कुराण आहेत.  जनरल झिया उल हक यांच्या धर्मश्रद्ध लष्करी अधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत तयार झालेले ते श्रद्धाळू सैन्याधिकारी आहेत. 

असे अधिकारी लष्कराच्या कारवायांमध्ये किती अधिक प्रमाणात धर्म आणतील, हा भारताच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे. बाजवा व मुनीर यांच्या काळात भारत-पाक नियंत्रणरेषा तसेच आंतरराष्ट्रीय सीमेवरील घुसखोरी कमी झाली, हे खरे. तथापि, अलीकडे ड्रोनची घुसखोरी वाढली आहे. अनेकांना वाटते की, लष्करी कारवायांत धर्म नक्की येईल आणि भारतात घुसखोरी व दहशतवादी कारवाया करणाऱ्या धर्मांधांच्या टोळ्यांच्या सोयीची ही नियुक्ती आहे; परंतु गुप्तचर संस्थांमध्ये काम केलेल्या, तसेच मुत्सद्देगिरीच्या क्षेत्रातील काहींना वाटते की, असे अधिकारी धार्मिकदृष्ट्या कट्टर असतातच असे नाही. त्यांनी मनात आणले तर दहशतवादाला आळा घातला जाऊ शकतो. कारण, त्यात गुंतलेल्या घटकांशी अशा अधिकाऱ्यांचा संवाद असतो. असीम मुनीर यांच्या नियुक्तीने पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणात नवी मोठी गुंतागुंत तयार झाली आहे. 

मावळते लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी पद सोडताना, गेल्या ७५ वर्षांमध्ये मुलकी कारभारात व सत्तासंघर्षात, राजकारणात हस्तक्षेपामुळे पाक लष्कर बदनाम झाले, अशी महत्त्वाची कबुली दिली आहे. आपल्या कारकिर्दीत आपण जाणीवपूर्वक तसा हस्तक्षेप टाळल्याचा आणि यापुढेही तसेच होत राहील, असा त्यांचा दावा आहे. बाजवा काहीही म्हणत असले तरी हे वास्तव आहे की, त्यांच्याच लष्करप्रमुखपदाच्या कार्यकाळात पनामा पेपर लीक प्रकरणात नवाझ शरीफ पदच्युत झाले. देशभर पदयात्रांचा धडाका लावून मध्यावधीसाठी पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांच्यावर दबाव आणू पाहत असलेले इम्रान खान यांना पदच्युत करण्यात लष्कराची नक्कीच भूमिका होती. असीम मुनीर यांच्या नियुक्तीमुळे इम्रान खान तसेच राष्ट्रपती आरीफ अल्वी नाराज आहेत.

पंतप्रधान शाहबाझ शरीफ केवळ कठपुतली आहेत. सगळा कारभार नवाझ शरीफ हेच लंडनमध्ये बसून पाहतात. त्यांनीच असीम मुनीर यांची नियुक्ती केली, असा आरोप आहे. त्यासाठी मुनीर हे सर्वांत ज्येष्ठ असल्याचा युक्तिवाद केला जात असला तरी प्रत्यक्ष नवाझ शरीफ पंतप्रधान असताना किमान तीनवेळा ज्येष्ठत्व डावलून सैन्याधिकारी नेमले गेले होते. मुनीर यांच्यापुढे मोठे आव्हान लष्कर एकसंध ठेवण्याचे आहे. सध्या पाक लष्करात इम्रान खान समर्थक व विरोधक अशा स्पष्ट दोन फळ्या आहेत. स्वत: मुनीर यांच्यावर इम्रान यांचा मोठा राग आहे. इम्रान यांची पत्नी व कुटुंबीयांच्या भ्रष्टाचाराचा बोभाटा केला म्हणूनच तर त्यांना आयएसआयच्या प्रमुख पदावरून हटविण्यास बाजवा यांना सांगण्यात आले होते. आता इम्रान यांना जनतेचा पाठिंबा वाढत असताना शरीफ बंधूंनी मुनीर यांना लष्करप्रमुख पदावर बसवून लष्कराच्या हातून साप मारण्याचा डाव आखला आहे.

Web Title: New player, new innings in Pakistan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.