राजनाथसिंहांची नवी विद्वत्ता
By admin | Published: November 30, 2015 12:47 AM2015-11-30T00:47:09+5:302015-11-30T00:47:09+5:30
गृहमंत्री राजनाथसिंह हे गंभीर दिसणारे गृहस्थ आहेत. केंद्रात मंत्री होण्याआधी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. भाजपाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आहे.
गृहमंत्री राजनाथसिंह हे गंभीर दिसणारे गृहस्थ आहेत. केंद्रात मंत्री होण्याआधी ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले आहेत. भाजपाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी चांगले काम केले आहे. अशा अनुभवी नेत्याकडून तेवढ्याच अभ्यासपूर्ण व समजूतदार वक्तव्यांची अपेक्षाही आहे. घटनादिनाच्या निमित्ताने त्यांनी लोकसभेत जे भाषण केले ते मात्र त्यांच्या या प्रतिमेला साजेसे नसलेले व त्यांच्या अभ्यासू दिसण्यामागचे उथळपण उघड करणारे होते. ‘सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्ष हा नसून पंथनिरपेक्ष आहे’ हा त्यांचा शोध जेवढा हास्यास्पद तेवढाच चुकीचा आहे. पंथ हा धर्माचा पोटभेद आहे. हिंदू धर्मात शैव आणि वैष्णव, बौद्धात हीनयान व महायान, तर इस्लाममध्ये शिया आणि सुनी हे पंथ आहेत. सेक्युलर या शब्दाचा पंथनिरपेक्ष हा अर्थ असल्याचे सांगून राजनाथसिंहांनी धर्म व त्याचे आताचे कडवेपण कायम राहील याचीच व्यवस्था केली आहे. पंथांचेही एक कडवेपण असते. इतिहासात शैव आणि वैष्णवांची युद्धे झाली आणि त्यात हजारो लोक मृत्युमुखी पडले. मुसलमान धर्मातील शिया व सुनी यांची युद्धे इराण व मध्य आशियात गेली अनेक शतके सुरू आहेत. त्यामुळे सेक्युलर या संकल्पनेशी पंथांना जोडून घेऊन इतिहासात झालेल्या व वर्तमानात होत असलेल्या धार्मिक युद्धांना व तेढींना क्षम्य व सौम्य लेखता येत नाही. ज्या असहिष्णुतेची चर्चा आज देशात सुरू आहे ती पांथिक नसून धार्मिक आहे हे राजनाथांना कळतच असणार. बहुसंख्य समाजाला कडवे बनविण्याचे आणि त्याच्या अल्पसंख्यकांविषयीची तेढ उभी करण्याचे त्यांच्या पक्षाचे राजकारण जेवढे देशघातकी तेवढेच समाजविघातकही आहे. जाणकारांच्या मते इतिहासात झालेल्या १४०० युद्धांपैकी १२०० युद्धे धर्माच्या नावाने वा धर्माच्या विजयासाठीच लढविली गेली. पाकिस्तान हा देश कोणत्या पंथासाठी नव्हे तर मुस्लीम धर्मासाठी भारतापासून वेगळा झाला. राजनाथसिंहांचा पक्ष व परिवार आज ज्या विषयाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी एकवटला असल्याचे आपण पाहतो तो विषयही धर्म हाच आहे. सेक्युलर या शब्दाचा आधुनिक प्रणेता जॉर्ज जेकब होलिओ हा फ्रेंच तत्त्वज्ञ आहे. १९ व्या शतकात झालेल्या या विचारवंताने सेक्युलॅरिझम या संकल्पनेची केलेली व्याख्या आता जगाने मान्य केली आहे. ‘ज्या मूल्यांमुळे माणसांचे सर्वोच्च नैतिक कल्याण होते त्या मूल्यांचा धर्म म्हणजे सेक्युलॅरिझम’ असे त्यांचे सांगणे आहे. एका शब्दात सांगायचे तर सेक्युलॅरिझम हा नीतिधर्म आहे. राजनाथसिंह आज ज्या खुर्चीवर बसले आहेत त्या गृहमंत्र्याच्या खुर्चीवर एकेकाळी सरदार पटेल बसत असत. सेक्युलॅरिझम ही देशाची लोकशाहीविषयक गरज आहे, तशीच ती त्याची राजकीय गरजही आहे असे ते म्हणत. भारतासारखा धर्मबहुल देश एकसंध ठेवायचा तर त्याला सर्वधर्मसमभावी असणेच आवश्यक आहे, ही भूमिका ते त्यांच्या व्याख्यानातून आणि पत्रातूनही मांडत. परंपरेने चालत आलेल्या धर्मात कर्मठ बाबी आल्या. आपल्या धर्मात पंथांसह जाती, तर इतर धर्मांत पंथोपपंथ आले. कालांतराने त्यात विषमता येऊन माणसामाणसात उच्चनीचता आली. धर्मांनी त्या साऱ्या दोषांना पाठिंबा देत आपला टिकाव सांभाळला. नीतिधर्म किंवा सेक्युलॅरिझम हा त्या साऱ्यांसाठी निर्माण झालेला माणुसकीचा पर्याय आहे. खरे बोला, माणसांशी माणसांसारखे वागा यासारख्या गोष्टी सर्व धर्मांत समान असल्या, तरी त्यांच्या जुन्या श्रद्धा त्यांना परस्परांपासून दूर राखतात. त्यातून स्वधर्मप्रेम आणि परधर्मद्वेष यामुळे त्यांच्यात तेढ माजते. या तेढीचे उत्पात आता आपण साऱ्या जगात पाहत आहोत. भारताने या सेक्युलर विचारसरणीला सर्वधर्मसमभावाची विधायक जोड दिली. गांधीजींचे ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ हे भजन ही त्याची सर्वोत्कृष्ट अभिव्यक्ती आहे. धर्मनिरपेक्षता या शब्दाचा पर्यायी शब्द म्हणूनही देशात सेक्युलॅरिझम हा शब्द रूढ झाला. राजनाथसिंहांच्या पक्षाला सर्वधर्मसमभाव मान्य नाही, ईश्वर-अल्ला मान्य नाही आणि धर्मनिरपेक्षताही मान्य नाही. त्याला एकाच धर्माचे वर्चस्व असलेला बहुसंख्यांकवादच तेवढा हवा आहे. त्यांच्या पक्षातले प्राची, निरंजना, आदित्यनाथ, गोरखनाथ, महेश शर्मा आणि गिरिराजसिंहांसारखे मंत्री व खासदार याच एका गोष्टीचा सातत्याने प्रचार करतात. रामजादे आणि हरामजादे अशी समाजाची विभागणी त्यांच्याकडून होते. आपल्या राजकारणातला अडसर ठरू पाहणाऱ्यांना ते पाकिस्तानात जाण्याचा सल्ला देतात आणि आपल्या भूमिकांहून वेगळी भूमिका घेणाऱ्यांना असहिष्णूपासून देशद्रोहीपर्यंतची सगळी विशेषणे लावून ते मोकळे होतात. त्यांच्या परंपरेतल्या एका सरकारने तर सरकारवर टीका करणे हाच देशद्रोह असल्याचा फतवा मध्यंतरी काढला. लोकशाही, सहिष्णुता आणि सर्वधर्मसमभाव ही सगळी मूल्ये मोडीत काढण्याच्या त्या पक्षाच्या तयारीची ही चिन्हे आहेत. काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘देशाच्या घटनेतील मूल्ये मोडीत काढाल तर खबरदार’ असे ठणकावून ‘तसे कराल तर देशात रक्तपात होईल’ अशी जी गंभीर भाषा लोकसभेत उच्चारली ती या संदर्भातील आहे. भाजपाचे लोक धर्मद्वेषाची एकच भाषा वेगवेगळ्या तऱ्हेने बोलतात. काँग्रेसची माणसे तिचा विरोध एकाच वेळी रोखठोकपणे करतात एवढेच.