खलिस्तानवाद्यांचा नवा उठाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 03:28 AM2018-02-14T03:28:27+5:302018-02-14T03:32:03+5:30
पंजाबात अकाली दल आणि भाजप यांची काँग्रेसविरुद्ध युती आहे आणि तिचा इतिहास फार मोठा आहे. अकाली दल हा स्वत:ला शिरोमणी अकाली दल म्हणविणारा व शीख धर्माचा कैवार घेणारा पक्ष आहे.
पंजाबात अकाली दल आणि भाजप यांची काँग्रेसविरुद्ध युती आहे आणि तिचा इतिहास फार मोठा आहे. अकाली दल हा स्वत:ला शिरोमणी अकाली दल म्हणविणारा व शीख धर्माचा कैवार घेणारा पक्ष आहे. तर दुसरीकडे भाजप हा स्वत:ला हिंदुत्ववाद्यांचा पक्ष म्हणविणारा आहे. सा-या देशातच धार्मिक कट्टरतावाद जोर धरत असताना पंजाबातील अकाली दलही त्यात अर्थातच मागे राहणार नाही. या धर्माचे सामान्य लोक कमालीचे मेहनती व धाडसी आहेत. त्यांनी भारतातील अन्य राज्यांप्रमाणे जगातही आपली पैठ कायम ठेवली आहे. विशेषत: कॅनडा, इंग्लंड व इटली या देशात ते धनवंत व राजकीयदृष्ट्या बलवंतही आहेत. या मंडळीने आता पुन्हा एकवार खलिस्तानचा नारा दिला आहे. त्यासाठी कॅनडामध्ये त्यांनी एक संघटन सुरू केले असून २०२० मध्ये ते खलिस्तानसाठी पंजाबात जनमत घेण्याची मागणी करीत आहे. या तीनही देशांसह मेलबोर्न (आॅस्ट्रेलिया) येथील सर्व प्रमुख गुरुद्वारांनी भारतीय अधिकारी व त्याच्या परराष्ट्र मंत्रालयातील लोकांना प्रवेशबंदी जाहीर केली आहे हे विशेष. ओटावा या कॅनडाच्या राजधानीतील गुरुद्वारात झालेल्या अशा एका ‘सत्संगा’ला त्या देशाचे पंतप्रधान ट्रूड्यू हे डोक्याला साफा बांधून व हाती तलवार घेऊन उपस्थित होते हेही उल्लेखनीय. या लोकांचे देशातील छुप्या शीख अतिरेक्यांशी संबंध आहेत तसेच त्यांचे पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेशीही नाते आहे. जाणकारांच्या मते कॅनडाच्या मंत्रिमंडळातील काही मंत्रीही या लोकांशी संबंध राखून आहेत. काही काळापूर्वी चेन्नईमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा यातील काही अतिरेक्यांचा प्रयत्न पोलिसाच्या सावधगिरीमुळे फसला. मात्र आता हे लोक जागतिक पातळीवर खलिस्तानची मागणी घेऊन उभे होत आहेत. खलिस्तानच्या मागणीचा इतिहास थेट १९४७ पर्यंत व तेव्हाच्या मास्टर तारासिंगांच्या उठावापर्यंत जातो. मात्र तेव्हाच्या नेहरू सरकारचे ठामपण आणि पंजाबमधील देशभक्त जनतेचे राष्ट्रप्रेम यामुळे तो प्रयत्न फसला. पुढे संत जर्नेलसिंग भिंद्रावाले याच्या नेतृत्वात त्याने पुन्हा एकदा १९८० च्या दशकात डोके वर काढले आणि त्याचे स्वरूप कमालीचे हिंस्र व लढाऊ होते. जर्नेलसिंगाचे बंड मोडून काढण्यासाठी तेव्हाच्या इंदिरा गांधी सरकारने थेट अमृतसरमधील सुवर्णमंदिरात लष्कर घुसवून एका छोट्या युद्धालाच तोंड दिले. त्यात जर्नेलसिंगासह त्याचे चारशेवर सहकारी मारले गेले. मात्र या अपयशी बंडातून वाचलेल्या अतिरेक्यांनी नंतरच्या काळात थेट इंदिरा गांधींचीच हत्या केली. त्याचवेळी त्यांनी जनरल वैद्य यांचाही पुण्यात खून केला. पुढल्या २० वर्षात पंजाब शांत राहिले. आता तेथील खलिस्तानवाद्यांनी जगभर पसरलेल्या खलिस्तानी अतिरेक्यांच्या मदतीने पुन्हा त्यांचे डोके वर काढायला सुरुवात केली आहे. आजवरचा अनुभव असा की अकाली दल हा पक्ष जेव्हा सत्तेवर असतो तेव्हा हे अतिरेकी सुप्त असतात. तो पक्ष पराभूत झाला आणि पंजाबची सत्ता काँग्रेसच्या हाती आली की ते पुन्हा जागे होतात. अकाली दल हा पक्ष पंजाबात दरवेळी भाजपच्या मदतीनेच सत्तेवर आला आहे ही बाब येथे नोंदविण्याजोगी. आज पंजाबात काँग्रेसच्या कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वातील सरकार सत्तेवर आहे तर अकाली दल विरोधात असले तरी त्याला पाठिंबा देणारा भाजप दिल्लीत सत्तारूढ आहे. या अतिरेक्यांना रोखण्यासाठी देशाने गेली ७० वर्षे प्रचंड परिश्रम केले व त्यासाठी त्याच्या लष्करानेही फार मोठी प्राणहानी सहन केली आहे. त्यामुळे आताचा कॅनडापासून इटलीपर्यंतचा आणि पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेपासून भारतातील खलिस्तानवादी प्रवाहांचा एकत्र येण्याचा व जागतिक स्तरावर शीख जनतेला स्वयंनिर्णयाचा अधिकार मागण्याचा प्रयत्न अतिशय गंभीरपणे घ्यावा असा आहे. धर्मांधता हा विकार आहे आणि तो फार थोड्या प्रयत्नाने बळावणाराही आहे. खलिस्तानवादी अतिरेक्यांना आवर घालायचा तर तो केवळ त्यांच्यातील धर्मांधता कमी करून साधता येणे शक्य नाही. त्यासाठी देशभरातील सगळ्याच धर्मात शिरकाव केलेले अतिरेकी आंधळेपण थोपविणे गरजेचे आहे व त्यासाठी सरकारसह देशातील सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येणे आवश्यक आहे.