दादासाहेबांचे पेपरवाचन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 06:36 AM2018-08-22T06:36:51+5:302018-08-22T06:37:20+5:30

चहाचा घोट घेताना ‘सौं’शी गप्पा मारण्याची दादासाहेबांना हुक्की आली.

newspaper reading of Dadasaheb | दादासाहेबांचे पेपरवाचन

दादासाहेबांचे पेपरवाचन

Next

चहाचा घोट घेताना ‘सौं’शी गप्पा मारण्याची दादासाहेबांना हुक्की आली. विषय सुरूकरावा म्हणून ते म्हणाले, अगं... जरा पेपर वाचत जा. देशात, गावात काय चालू आहे त्याची माहिती ठेवत जा...
- त्याच्याने काय फरक पडणार आहे. तुम्हीच ते पेपर वाचणं बंद करा. मला विनाकारण पेपर वाचेपर्यंत तीनदा चहा करून द्यावा लागतो. माझा वेळ तरी वाचेल...
- अगं पण तुझ्या ज्ञानात भर पडेल ना. तुमच्या किट्टी पार्टीत बोलायला विषय मिळतील, म्हणून मी सुचवलं. मला काय?
- आम्हाला काय कमी विषय नाहीत. उलट वेळ पुरत नाही. परवा तुमच्या मित्राच्या बायकोनं पैठणी आणली ३५ हजाराची. पण काय मेला तो रंग...! त्यापेक्षा मी नाशिकहून पैठणी मागवलीय, मस्त रंगाची. तसा रंग कुणाकडेच नाही. ती बघा आल्यावर...
- मागवली म्हणजे? पैसे कोण देणार? की ते सॅम्पल म्हणून पाठवून देत आहेत तुला? पैसे देणार नाही बरंका मी...
- एक पैठणी मागवली तर किती प्रश्न पडले तुम्हाला. फक्त ७० हजाराची आहे, आणि तुमच्या त्या मित्राच्या बायकोपेक्षा भारी आहे. तुम्हाला मात्र नुकसान दिसते.
- बाई गं. मी गातोय काय आणि तू वाजवतेस काय...? तुझ्या ज्ञानात भर पडावी म्हणून तीन तीन रुपयाचे चार पेपर वाजत जा म्हणालो तर तू हजारोंच्या पैठणीवर गेलीस...
- काय करु पेपर वाचून सांगा बरं मी.
- अगं, देशात काय चालूय ते कळेल तुला. कुणाशी चर्चा करताना तुला विषय मिळतील. बोलण्यात वजन येईल तुझ्या.
- त्याच्याने काय होईल...?
- काय म्हणजे? तुझी इमेज चांगली होईल. सामाजिक प्रश्नाबद्दल तुझा अभ्यास पाहून लोक तुझ्याकडे कौतुकाने पाहतील.
- म्हणजे आता नाही बघत का माझ्याकडे कौतुकाने. कुठेही बाहेर जायचं झालं की मी दोन तीन ड्रेस तरी घालून पाहते, साडी असेल तर दोन तीन साड्या नेसून कोणती चांगली दिसेल ते पाहते, एकदा सेल्फी काढून घेते, त्यात ‘कशी मी दिसते’ असं पाहून घेते. म्हणून तर मी बाहेर पडले की लोक माझ्याकडे पाहात असतात, टकामका...
- अगं, बाह्यरुपापेक्षा ज्ञानाने मिळालेले रूप चांगले असते. चिरकाल टिकणारे असते.
- मला नका सांगू रूपा, टूपाबद्दल... मी काय रूपवान नाही का? आपल्या लग्नाला किती वर्षे झाली? अजून मी होते तशी दिसते आणि तुम्ही पाहा, डोक्यावर टक्कल पडायला आलंय. तुम्हीच ते पेपर वाचणं बंद करा..
- बाई गं, मी काय करायचं ते बघेन, पण तू पेपर वाचलेस तर तुझाच फायदा होणार आहे, माझा नाही...
- एक पैठणी घेतली तर तुम्हाला त्यात नुकसान दिसते आणि एवढे पेपर विकत घेता त्यात बरा आलाय फायदा...?
- अगं, त्याने ज्ञान वाढते.
- बोडक्याचं ज्ञान. वजन वाढत चाललंय. पेपरपेक्षा योगा करा, फायदा होईल.
- दादासाहेब थकले आणि म्हणाले, योगा करावा म्हणतोच आहे मी, कोणाची सीडी आणू सांग बरं. शिल्पा शेट्टी, बिपाशा बसूची की सनी लिओनीची?
- बसं तुम्हाला काही सांगायचीच खोटी. योगा सोडून त्या पोरी बघत बसाल तुम्ही. काही नको योगा, टोगा... त्यापेक्षा पेपरच वाचत बसत जा तुम्ही...
- अतुल कुलकर्णी

Web Title: newspaper reading of Dadasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :newsबातम्या