आखाती देशातील अरब वसंताचा पुढचा अंक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 04:10 AM2020-05-12T04:10:30+5:302020-05-12T04:11:04+5:30
२०१४ पासून अरब जगात दुस-या, पण सुप्त क्रांतीला सुरुवात झाली असून, सध्याच्या कोरोनाग्रस्त वातावरणात तिला वसंताचे धुमारे फुटले आहेत.
- अनय जोगळेकर
(आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक)
डिसेंबर २०१० मध्ये ट्युनिशियात महंमद बाउझिझीने सरकारी जाचाला कंटाळून स्वत:ला पेटवून घेतले आणि त्यातून अरब जगात क्रांतीची ठिणगी पेटली. ट्युनिशिया, इजिप्त, लिबियासारख्या अनेक देशांमध्ये सत्तांतर घडवून आणणाऱ्या या क्रांतीला ‘अरब वसंत’ असे नाव दिले. दुर्दैवाने हा वसंत फार काळ टिकला नाही. येमेन आणि सीरियासारख्या देशात यादवीने लाखो बळी घेतले. अन्य देशांत तेथील लष्कराने लोकशाहीचा खेळ आटोपता घेऊन पुन्हा एकदा स्वत:च्या हातात सत्ता घेतली.
२०१४ पासून अरब जगात दुस-या, पण सुप्त क्रांतीला सुरुवात झाली असून, सध्याच्या कोरोनाग्रस्त वातावरणात तिला वसंताचे धुमारे फुटले आहेत. आज त्याची चर्चा करण्याचे निमित्त म्हणजे सध्या सौदी अरेबिया आणि पर्शियाच्या आखातातील अरब देशांमध्ये १९४० च्या दशकातील मुस्लिम, ख्रिस्ती आणि ज्युईश सहजीवनावर आधारित ‘उम हारून’ म्हणजेच ‘हारूनची आई’ ही मालिका दाखविली जात आहे. याशिवाय अन्य काही मालिकांतही अरब जगातील इस्रायल व ज्यू धर्मीय लोकांबाबतच्या दुटप्पीपणावर विनोद केले आहेत. मुस्लिम धर्मीयांसाठी सर्वांत पवित्र अशा रमजानच्या महिन्यात एमबीसी या अरब जगतातील सर्वांत मोठ्या केबल नेटवर्कवरून दाखविल्या जात असलेल्या या मालिका सौदी अरेबिया व अन्य देशांच्या राजवटींच्या पाठिंब्याशिवाय प्रसारित होणे शक्य नाही, त्यामुळे टीव्ही मालिकांच्या माध्यमातून जनतेमध्ये इस्रायलबाबतचा विरोध कमी करून भविष्यात त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्याची तयारी तर चालू नाही ना, अशा शंका व्यक्तकेल्या जात आहेत.
इराक ते मोरोक्कोपर्यंत पसरलेल्या अरब जगात ज्यू धर्मीयांचे दोन हजार वर्षांहून अधिक काळ वास्तव्य होते. अल्पसंख्याक म्हणून अनेक ठिकाणी त्यांना सापत्नभाव सहन करावा लागला असला, तरी युरोपप्रमाणे त्यांचा धार्मिक आधारावर छळ वा वंशविच्छेद करण्याचा प्रयत्न झाला नाही. अरब जगात अनेक ठिकाणी ज्यू व्यापारी खूप श्रीमंत होते. सरकारदरबारातही उच्च पदांवर होते. १४ मे १९४८ रोजी इस्रायल स्वतंत्र झाल्यानंतर काही अपवाद वगळता अरब जगात ज्यू धर्मीयांचा छळ होऊ लागला. अरब जगतातील सुमारे सात लाख ज्यू लोकांनी जिवाच्या भयाने देशांतर करून इस्रायलमध्ये आसरा घेतला. इस्रायलच्या शत्रुत्वापोटी अनेक अरब देशांनी कला, संस्कृती व अर्वाचीन इतिहासातून ज्यू समाजाचे योगदान व मुस्लिम-ज्युईश सहचर्याचा भागच वगळून टाकला. इराणमधील १९७९च्या इस्लामिक क्रांतीनंतर अनेक अरब देशांनीही सुन्नी-वहाबी विचारसरणीचा आधार घेतला. आपल्यातील ख्रिस्ती व अन्य अल्पसंख्याकांना सांस्कृतिक जीवनातून दरकिनार केले. सौदीसारख्या देशांनी त्याही पुढे जाऊन सिनेमागृहे आणि संगीतावरही बंदी घातली.
२०१०-११ च्या अरब राज्यक्रांतीमुळे व २०१३-१४ मध्ये आलेल्या खनिज तेलाच्या महापुरामुळे या परिस्थितीत बदल होऊ लागला. या काळात शेल-तेलामुळे अमेरिका जगातील सर्वांत मोठा तेल उत्पादक देश बनला. ऊर्जा क्षेत्रात स्वयंपूर्ण झाल्याने अमेरिकेचे पश्चिम आशियावरील अवलंबित्व संपले. तिथल्या युद्धात आणि राजकीय संघर्षात मध्यस्ती करायला स्वत:चे सैन्य पाठविण्याची गरजही संपली. दुसरीकडे इराणने प्रादेशिक सत्ता म्हणून मोठे आव्हान उभे केले. शियापंथीय आणि पर्शियन वंशाचे इराण व सुन्नी-अरब देशांतील संघर्ष इस्लामच्या स्थापनेपूर्वी शेकडो वर्षांपासून चालत आला आहे. अमेरिकेची उदासीनता किंवा आत्ममग्नता व इराणची आक्रमकता यामुळे अनेक अरब देशांचा इस्रायलप्रती दृष्टिकोनात मोठा बदल झाला. याच काळात अनेक अरब देशांत नवी पिढी सत्तेवर आली. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या या पिढीची अरब-इस्रायल संघर्षात भावनिक गुंतवणूक नव्हती. त्यांच्यासाठी इस्रायल हा राजकीयदृष्ट्या समतोल साधणारा तसेच कृषी, पाणी, मोबाईल व सायबर सुरक्षा आदी क्षेत्रांत आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरविणारा देश होता. सौदीचे युवराज महंमद बिन सलमान व संयुक्त अरब अमिरातींचे युवराज महंमद बिन झायेद अल नाहयान यांच्या पुढाकाराने अनेक अरब देश कात टाकू लागले. आजही इजिप्त व जॉर्डन वगळता अन्य अरब देशांचे इस्रायलशी राजनैतिक संबंध नसले तरी पडद्यामागे अनेक गोष्टी घडत आहेत. दुबईमध्ये होणाºया वर्ल्ड एक्स्पोमध्ये इस्रायल सहभागी होणार असून, गेल्या वर्षी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहूंनी ओमानला सपत्नीक भेट देऊन तत्कालीन सुलतान काबूस यांची भेट घेतली होती. यावर्षीच्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये नेतान्याहूंनी तेल-अवीव ते मक्का अशी विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. एअर इंडियाच्या तेल-अवीवला जाणा-या विमानांना सौदी अरेबियावरून उडण्याची परवानगी मिळण्यास ही बदललेली परिस्थिती कारणीभूत होती.
हे बदल केवळ इस्रायल आणि ज्यू लोकांपुरते मर्यादित नाहीत. संयुक्त अरब अमिरातीत हिंदू मंदिर उभे राहिले असून, फेब्रुवारी २०१९ मध्ये पोप फ्रान्सिसनी तिथे भेट दिली होती. सौदीमध्ये महिलांच्या गाडी चालविण्यावरचे निर्बंध उठविले असून, सिनेमागृहे सुरू केली आहेत. ‘उम हारून’ ही मालिका याच प्रयत्नांचा एक भाग आहे. तिचा लेखक बहारीनचा असून, ती १९४०च्या दशकातल्या बहारीनमधील उम-जान या ज्यू धर्मीय नर्सच्या आयुष्यावर बेतली आहे, त्यामुळे ती वास्तववादीही आहे. हा दुसरा वसंत अरब जगावर किती खोलवर परिणाम करतो, हे आगामी काळात स्पष्ट होईल.