उद्याचे पुढचे पाऊल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2018 05:41 AM2018-11-08T05:41:27+5:302018-11-08T05:42:03+5:30
देशाची मान अनेक विक्रमांनी उंचावत असताना त्याच्यासमोर अनेक समस्याही आहेत.समाजाचे विघटन होण्याचा धोका दिसतो आहे. या सर्वावर मात करण्याचे नियोजन अभिजन वर्गाने करायला हवे आहे. त्यासाठीचे उद्याचे पुढचे पाऊल पडायला हवे आहे.
बलिप्रतिपदा दीपावलीच्या सणातील महत्त्वाचा दिवस. याला ‘दिवाळी पाडवा’ असेही म्हणतात. साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त. विक्रम संवत या नववर्षाचा प्रारंभ याच दिवशी होतो. व्यापाऱ्यांचेही हे नवे वर्ष. याच दिवशी वहीपूजन करून व्यापारी नवीन वर्षाचा प्रारंभ करतात. स्त्रिया आपल्या पतीचे औक्षण करतात. सुखसमृद्धीची कामना करतात. गोडधोड पदार्थांची रेलचेल, फटाक्यांची आतषबाजी आणि नवीन वस्तूंची, दागिन्यांची खरेदी दीपावली सणाच्या निमित्ताने केली जाते. यामुळे बाजारात तेजीचे वातावरण असते. पाडव्याच्या मुहूर्तावर नवीन व्यवसायाचा, उद्योगधंद्यांचा शुभारंभ केला जातो. ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’ अशी प्रार्थना पाडव्याच्या दिवशी केली जाते. तिला पुराणातील बळीराजा आणि वामन अवतार या कथेचा आधार आहे. लक्ष्मीला अर्थात धनाला प्रसन्न करणे, ही मानवाची मोठी आकांक्षा असते. दीपावलीत लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने तिची आराधना केली जाते. नवे संकल्पही केले जातात. त्यामुळे दिवाळी हा एक संकल्प सोहळाही आहे. समाज अधिक वेगाने बदलतो आहे. त्याच्या सुखा-समाधानाच्या जीवन मूल्यांमध्ये बदल होतो आहे. त्या समाजाच्या जडणघडणीमध्ये आपण सारे योगदान देत असतो. त्यातूनच गाव, शहर, राज्य आणि राष्ट्र उभारणी होत असते. आपल्या समाजासमोर अनेक गुंतागुंतीचे विषय कायमच पिंगा घालत असतात. मात्र, त्यावर मात करण्याचे बळही मानवी कल्याणाच्या धाग्यातून वीण घेऊन बाहेर पडत असते. तो धागा या निमित्ताने पकडणे महत्त्वाचे आहे. मराठी माणसाच्या दृष्टीने नवे वर्ष महत्त्वाचे ठरणार आहे. पुढील वर्षाचा दीपोत्सव येईपर्यंत देशाच्या राजकारणाची दिशा पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे. महाराष्ट्राने जी कूस बदललेली आहे, त्याचे मूल्यमापन होणार आहे. निम्मा महाराष्ट्र आज दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हे घडणार आहे. ती एक गंभीर समस्या असणार आहे. पूर्वीचे दुष्काळ हे अन्नधान्याचे असायचे. आताचे दुष्काळ हे पाण्याच्या दुर्भीक्षाचे आहेत. अन्नधान्याचा पुरवठा करणे भारतासारख्या विकसनशील देशाला आता अवघड राहिलेले नाही. त्यावर एक मोठा विजय संपादन केला आहे.
१४ वर्षांचा वनवास संपवून श्रीराम सीतेसह अयोध्येत परतले, तो दिवस साजरा करणाºया दीपस्तंभासारखाच तो मोठा विजय होता. भारत वर्षाच्या वाटचालीच्या टप्प्यातील तो एक यशस्वी टप्पा आहे. आपण अन्नधान्याच्या पातळीवर स्वयंपूर्ण आहोत. प्रश्न राहतो, तो मानवाच्या समृद्ध-सुखी जीवनाची संकल्पना पार करण्याचा. मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशात हा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे आर्थिक मंदीवर मात करण्याची ताकद आपल्या सर्वसमावेशक अर्थरचनेत आहे. तशी समृद्धी आता दुष्काळाशी सामना करण्यात तयार झाली आहे. मात्र, अधिकच्या समृद्ध जीवनाच्या मार्गात तो एक अडथळा ठरतो. परिणामी, मानवाच्या जीवनमानावर परिणाम करून जातो. आपली नवी पिढी उच्चशिक्षण आणि रोजगारासाठी स्थलांतरित होते आहे. त्याच वेगाने दुष्काळाच्या झळा बसून, या दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी स्थलांतर सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्राने या दीपावली पाडव्यानिमित्त स्थलांतरित महाराष्ट्राने जो चेहरामोहरा बदलणार आहे, त्याचे आव्हान पेलण्याचे सामर्थ्य या दीपोत्सवातून मिळो, याची प्रार्थना करायला हवी आहे. देशाची मान अनेक विक्रमांनी उंचावत असताना, या समाज विघटनाच्या प्रक्रियेवर कशी मात करता येईल, याचे गांभीर्याने नियोजन अभिजन वर्गाने करायला हवे. त्यासाठीचे उद्याचे पुढचे पाऊल पडायला हवे आहे. त्याचा संकल्प करणे हाच दीपोत्सवाचा सण साजरा करण्याचा, आपल्या जीवनाचा भाग असायला हवा आहे. केवळ फटाके फोडून हा संकल्प होणार नाही, याची जाणीव नव्या पिढीला करून द्यायला हवी. याचसाठी फटाके वाजविण्याच्या कालमर्यादेचा विचार करण्याची वेळ आली आहे. ती समाजमनाने स्वीकारायला हवी. कायद्याचा बडगा दाखवून नको. त्यातून नव्या पिढीसाठीचे नवे पाऊल पडणारे नाही. हा संकल्प करू या आणि नववर्षाचे निर्धाराने स्वागत करू या.