निर्भया न्याय दिन! अखेर न्याय झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 06:09 AM2020-03-21T06:09:16+5:302020-03-21T06:09:31+5:30
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राष्ट्रपतींनी दयेचा अखेरचा अर्ज फेटाळून लावला असतानाही आरोपींनी केलेल्या याचिकांवर सुनावणी होत राहिली. आठ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणे, हा न्याय उशिरा देण्यातील प्रकार आहे.
निर्भयाच्या मारेकऱ्यांना अखेर शुक्रवारी पहाटे फासावर लटकविण्यात आले. हा ख-या अर्थाने ‘निर्भया न्याय दिन’ ठरला आहे. निर्भयावर १६ डिसेंबर २०१२ च्या रात्री बसमध्ये सहा नराधमांनी सामुदायिक बलात्कार केला. तिला चालत्या बसमधून फेकून देण्यात आले. त्यानंतर सिंगापूर येथे सुरू असलेल्या १३ दिवसांच्या उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. निर्भयाचे आई-वडील सलग आठ वर्षे या खटल्यातील चारही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, यासाठी संघर्ष करीत होते. निर्भयावर ज्या पद्धतीने अत्याचार करण्यात आले, त्या घटनेनंतर देशभर संतापाची लाट उसळली होती. गुन्हेगारांना तातडीने फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी देशभर करण्यात येत होती. त्यासाठी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात खटला चालला. सर्वच स्तरांवरील न्यायालयांनी चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली.
अखेरचा प्रयत्न म्हणून आरोपींनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे दयेचा अर्ज केला. तोदेखील फेटाळून लावण्यात आला; तरीदेखील पतियाला हाउस सत्र न्यायालय ते सर्वोच्च न्यायालयात विविध प्रकारच्या याचिका दाखल करून आरोपी फाशीची शिक्षा टाळण्याचा प्रयत्न करीत होते. त्यावरही जनतेतून संताप व्यक्त होत होता. दुर्दैवाची बाब म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि राष्ट्रपतींनी दयेचा अखेरचा अर्ज फेटाळून लावला असतानाही आरोपींनी केलेल्या याचिकांवर सुनावणी होत राहिली. देशाच्या राजधानीत घडलेल्या या संतापजनक प्रकारानंतर आठ वर्षांनी निकाल लागणे, हा न्याय उशिरा देण्यातील प्रकार आहे. खटल्यातील कोणते ना कोणते कच्चे दुवे शोधून फाशीची शिक्षा टाळण्याचा प्रयत्न आरोपींकडून होईल; अशीच जनभावना होती, हे धक्कादायक आहे. न्याय व्यवस्थेवरील विश्वासास नख लागण्याचा प्रकार होता.
सत्र न्यायालयाने अखेर चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी केल्यानंतर गुरुवारी अखेरचा प्रयत्न म्हणून चारपैकी मुकेश हा आरोपी घटना घडली तेव्हा राजस्थानात होतो; शिवाय आपण त्या वेळी अल्पवयीन होतो, असा दावा करून शिक्षा टाळण्याचा प्रयत्न करीत होता. घटनेतील आरोपी, त्यांचे साक्षी-पुरावे, सर्व काही तपासून झाले असताना फाशी देण्याची वेळ काही तासांवर आल्यावर असे मुद्दे कसे उपस्थित होतात? त्यावर सुनावणी तरी कशी होते? हे सर्वसामान्य जनतेच्या मनात उत्पन्न होणारे प्रश्न विचार करायला लावणारे आहेत. पहाटे फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे, असे सांगितल्यावर आरोपींनी अखेरचा प्रयत्न म्हणून मध्यरात्री याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीही केली आणि पहाटे ३ वाजून ३२ मिनिटांनी म्हणजे फाशी देण्यास केवळ दोन तासांचा अवधी राहिला असताना याचिका फेटाळण्यात आली. अशावेळी त्या निर्भयासाठी लढणाºया आई-वडील तसेच नातेवाईक आदींच्या मनाची काय घालमेल झाली असेल, याचा तरी मानवतेच्या स्तरावर विचार व्हायला हवा. फाशी दिल्यावर निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया खूप महत्त्वाची आहे. ते म्हणतात, आजचा दिवस हा ‘निर्भया न्याय दिन’ आहे. भारतीय संस्कृती महान असल्याच्या गप्पा मारणाऱ्यांनी आपल्या समाजाची मानसिकता बदलण्यासाठी, सांस्कृतिक बदलांसाठी प्रयत्न करायला हवे आहेत. निर्भयाच्या मृत्यूनंतर जो संताप व्यक्त करण्यात आला त्याने देश हादरून गेला; मात्र, न्यायदानाची प्रक्रिया संथपणेच चालत राहिली.
देशात त्यानंतरही हजारो अत्याचाराच्या घटना घडत गेल्या. त्यातील असंख्य गुन्हेगार उजळमाथ्याने फिरत आहेत. अनेक खटले विविध पातळीवरील न्यायालयांमध्ये पडून आहेत. बालिका आणि महिलांवरील अत्याचारांचे प्रकार काही थांबलेले नाहीत. न्यायव्यवस्था गतिमान आहे असे वातावरण भारतात नाही. निर्भया अत्याचारासारखेच क्रूर प्रकार अनेक घडले आहेत. त्याची चर्चा प्रसारमाध्यमांत कमी झाली आहे. पण त्यांच्या नातेवाइकांना संरक्षण कमी मिळाले असेल आणि कायदेशीर साहाय्यताही कमी मिळाली असेल. त्यामुळे ‘निर्भया न्याय दिन’ सर्व बळी पडलेल्या महिलांच्या जीवनात यायचा असेल तर आपल्या समाजात बदलासाठी खूप प्रयत्न करायला हवे आहेत.