मराठी रंगभूमीच्या विचक्षण साक्षीदाराचे निर्वाण

By admin | Published: August 12, 2015 04:33 AM2015-08-12T04:33:41+5:302015-08-12T04:33:41+5:30

नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर उपाख्य अण्णा काळाच्या पडद्याआड गेले, हा वरकरणी जन्म-मृत्युच्या रहाटीचा भाग वाटला, तरी प्रत्यक्षात त्यांच्या जाण्याने त्यापेक्षा खूप काही झाले आहे.

Nirvana of the Vector Witness of Marathi Theater | मराठी रंगभूमीच्या विचक्षण साक्षीदाराचे निर्वाण

मराठी रंगभूमीच्या विचक्षण साक्षीदाराचे निर्वाण

Next

- शुभदा दादरकर
(नाट्यसंगीताच्या शिक्षक)

नाट्यतपस्वी भालचंद्र पेंढारकर उपाख्य अण्णा काळाच्या पडद्याआड गेले, हा वरकरणी जन्म-मृत्युच्या रहाटीचा भाग वाटला, तरी प्रत्यक्षात त्यांच्या जाण्याने त्यापेक्षा खूप काही झाले आहे. एकेकाळी केशराचे शेत मानल्या गेलेल्या मराठी रंगभूमीच्या प्रांताला उतरती कळा लागल्यावर याच केशराच्या शेतात गाढवे चरू लागल्याची वर्णने केली गेली. उर्जितावस्थेपासून पडत्या काळापर्यंत सारे काही याचि देहि याचि डोळा अनुभवलेल्या अण्णांनी त्यावर नुसते उसासे कधीच टाकले नाहीत. उलटपक्षी संगीत रंगभूमीला नव्या युगाचा अंगरखा चढवून तिच्या पुनरुत्थानासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. एका परीने रंगभूमीच्या जवळपास नऊ दशकांचा एक विचक्षण साक्षीदार त्यांच्या निर्वाणाने मूक झाला आहे. रंगभूमीला त्यांनी दिलेले योगदान चिरंतन स्मरणात ठेवण्याजोगे आहे. मोजक्या शब्दांत सांगायचे तर रंगभूमीचा जगन्नाथाचा रथ ओढलेल्या पंडितराजाला मराठी जनमन मुकले आहे.
ललित कलादर्श ही बापूराव पेंढारकरांची कंपनी. १९३७ साली ते गेले आणि वारसाहक्काने कोवळ््या खांद्यांवर येऊन पडलेली जबाबदारी अण्णांनी स्वीकारली आणि पेललीही. तेव्हा ते अवघे १६ वर्षांचे होते. पुढे त्यांच्या नेतृत्वात याच संस्थेने शताब्दीचा टप्पा दिमाखात पार केला. अण्णांनी संस्थेची जबाबदारी स्वीकारली तेव्हा अपूर्व सामाजिक घुसळण सुरू होती. साहित्य सोनियांच्या खाणीतून मायबाप इंग्रज सरकारवर खुबीने शरसंधान सुरू झाले होते. पुराण्या देवांच्या आडून चालू दानवांचा धिक्कार करण्याची संधी रंगभूमीही सोडत नव्हती. पण त्याच वेळी आणखी एक स्थित्यंतर घडत होते. सिनेमाचा रूपेरी पडदा बोलू लागला होता. तेव्हापासून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीचा स्वातंत्र्योत्तर टप्पा हे एक अनोखे आव्हानात्मक पर्व होते. नेमक्या याच पर्वात अण्णांची कारकिर्द नवनवी आव्हाने पेलत बहरत होती. त्यामुळेच संस्थेची जबाबदारी घेतल्यानंतरही प्रत्यक्षात स्वत: रंगभूमीवर पाय ठेवण्यासाठी अण्णांनी पाच वर्षे घेतली. त्या काळात त्यांनी रामचंद्रबुवा वझे यांच्याकडे संगीताचे रीतसर शिक्षण घेतले. रंगभूमीवर आपले गाणे चांगले वठले पाहिजे, ही त्यामागील धारणा होती. अण्णांनी १९४२ साली ‘सत्तेचे गुलाम’च्या निमित्ताने रंगभूमीवर पदार्पण केले. त्यात त्यांनी साकारलेली वैकुंठाची भूमिका रसिकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली, पण त्यांचे गुरू वझेबुवा यांनी त्याच रात्री अण्णांना बोलावून त्यांच्या गायनातील चुका सांगितल्या. कितीही दिगंत यश मिळाले, तरी पाय जमिनीवर ठेवण्याच्या अण्णांच्या स्वभावाचे बीज त्या रात्री रोवले गेले. १९५४ साली त्यांनी साहित्य संघासाठी ‘होनाजी बाळा’मध्ये बाळाची भूमिका साकारली. ती कमालीची गाजली.
पण फक्त जुन्या नाटकांच्या बळावर संस्था जगवता येणार नाही, याची खूणगाठ बांधल्यावर त्यांनी रंगभूमीवर नवी नाटके आणण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यातूनच, पु. भा. भावेंचे स्वामिनी, बाळ कोल्हटकरांचे दुरितांचे तिमिर जावो आणि माझ्या वडिलांचे-विद्याधर गोखल्यांचे पंडितराज जगन्नाथ अशी अनेक नवी नाटके १९५४ ते १९६० च्या दरम्यान रंगभूमीवर आली. त्यांनी नाटकाचे निर्मिती मूल्यही वाढविले. रंगभूमीवर पार्श्वगायन आले. नाटकाचे निर्मितीमूल्य उच्च कोटीचे ठेवण्यासाठी त्यांनी छोट्यातल्या छोट्या भूमिकेतही उत्तुंग प्रतिभेच्या नटांना पेश केले. म्हणूनच तर एखाद्या छोट्याशा भूमिकेतही मा. दत्ताराम, मामा पेंडसे, चित्तरंजन कोल्हटकर, शंकर घाणेकर, मंगला संझगिरी अशी बडी स्टार कास्ट पाहण्याचे भाग्य रसिकांना लाभले. गुणवत्तेत तडजोड नाही, हा त्यांचा खाक्या त्यात कामी आला.
संगीत रंगभूमीला नवतेचा स्पर्श करण्याच्या त्यांच्या प्रयोगशीलतेवर लोकमान्यतेची खरी मोहोर उमटली, ती ‘पंडितराज जगन्नाथ’च्या निमित्ताने.‘जय जय गौरीशंकर’ने त्यांनी जणू यशाचा गौरीशंकर सर केला. यशश्री पायीची दासी झाल्यानंतरही अण्णा रंगभूमीला अनंत हस्ते भरभरून देत राहिले. जेव्हा नाटक कंपन्यांकडे बसगाड्या नव्हत्या, त्या काळात भारताच्या वेगवेगळ््या भागात प्रयोग लावून महिन्याभराचा यशस्वी दौरा त्यांनी रेल्वेतून केला होता. रंगभूमीसाठी आयुष्य वेचणाऱ्या अण्णांच्या खासगी आयुष्यातील प्रेमाला बहर आला, तोही रंगभूमीच्याच माध्यमातून. वधूपरीक्षा या नाटकाच्या निमित्ताने गाठभेट झालेल्या मालती नाफडेंमध्ये हृदय गुंतले आणि ती अण्णांची अर्धांगिनी झाली.
अण्णांच्या प्रदीर्घ कारकिर्दीचा तीन प्रमुख पैलूंच्या अनुषंगाने विचार होणे गरजेचे आहे. संगीत रंगभूमीवरील नट म्हणून त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. गाजवल्याही. रंगमंचावर नाट्यसंगीत कसे सादर करावे, अर्थवाहीपणा कायम ठेवून शब्दांची फेक कशी करावी, ती अर्थानुरूप कशी ठेवावी याचा वस्तुपाठ अण्णांनी घालून दिला. दिग्दर्शनाच्या बाबतीत अण्णा करड्या शिस्तीचे होते. ठरल्या वेळेला कोट खुंटीला टांगून ते स्वत: तालमीसाठी जय्यत तयार असत. तालीम ही गाण्याच्या साथीदारांसह झाली पाहिजे, हे ते कटाक्षाने पाहात. शिकवण्याची त्यांची हातोटी आणि दृष्टी माझ्यासारखीला आजही नाट्यसंगीत शिकवताना वरदान ठरते. नेपथ्याचे त्यांचे भानही आगळे होते. रंगभूमीवर उभे कसे राहावे इथपासून नेपथ्याचा पर्याप्त वापर कसा करावा, याची त्यांची दृष्टी पुढच्या पिढ्यांना उपयोगी पडली. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत कसा जाईल, हे पाहण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. आजच्या घडीला नाट्यसंगीत शिकवताना आम्हाला तेच संचित कामी येत आहे.
अण्णांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू जगावेगळे होते. अनेक वर्षे ते दिवसातून एकदाच जेवायचे. पेहराव म्हणाल, तर पांढरे धोतर, आत साधारण तशाच रंगाचा शर्ट आणि फिकट निळ््या रंगाचा कोट हीच त्यांची वेशभूषा आणि ओळखही. हा माणूस मनाने मोठा रसिक. कोणी गुच्छ दिला तर ते चटकन त्यातील एखादे निवडक फूल काढून कोटाला लावायचे. मनाजोगती भट्टी जमेपर्यंत ते हटायचे नाहीत. माझ्या वडिलांकडून त्यांनी पंडितराजचे किती सीनच्या सीन पुन:पुन्हा लिहवून घेतले, हे मी पाहिले आहे. सतत पान तोंडात ठेवून चर्चा रंगविण्याची सवय जडलेल्या या माणसाने डॉक्टरांनी बजावले, त्या दिवसापासून पानाचे नाव काढले नाही.
संगीत रंगभूमीच्या पुनरुत्थानाच्या बरोबरीने त्यांनी जवळपास तीनशे नाटकांचे जे रेकॉर्डिंग करून ठेवले आहे, तो ठेवा अमूल्य आहे. इहलोकीचा निरोप घेताना ते असा बराच आणि मौल्यवान ठेवा महाराष्ट्राला देऊन गेले आहेत.

Web Title: Nirvana of the Vector Witness of Marathi Theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.