‘निरवानिरव’ मोदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:40 AM2018-03-01T00:40:44+5:302018-03-01T00:40:44+5:30

पंजाब नॅशनल बँकेला २० हजार कोटी रुपयांनी बुडवणा-या नीरव मोदीचे अनेक अपराध ओळीने नोंदविणाºया एका ज्येष्ठ व्यंगचित्रकाराने त्याचा सर्वात मोठा अपराध ‘नरेंद्र मोदींना निरवानिरव मोदी करणे’ हा असल्याचे म्हटले आहे.

 'Nirvinirvar' Modi | ‘निरवानिरव’ मोदी

‘निरवानिरव’ मोदी

Next

पंजाब नॅशनल बँकेला २० हजार कोटी रुपयांनी बुडवणा-या नीरव मोदीचे अनेक अपराध ओळीने नोंदविणाºया एका ज्येष्ठ व्यंगचित्रकाराने त्याचा सर्वात मोठा अपराध ‘नरेंद्र मोदींना निरवानिरव मोदी करणे’ हा असल्याचे म्हटले आहे. मल्ल्या पळाला, ललित मोदी पळाला आणि आता नीरव मोदी पळाला. नरेंद्र मोदी या सर्व अपराध्यांच्या पलायनाबाबत मौन पाळताना दिसले. एवढे मोठे आर्थिक गुन्हे त्यांच्या सरकारच्या डोळ्यादेखत होत असताना त्याविषयी बोलण्याचे सोडून ते देशाला एकापेक्षा एक मोठी आणि अविश्वसनीय वाटावी अशी आश्वासने देतानाच अधिक दिसले. बोफोर्सचा तथाकथित घोटाळा ६७ कोटींचा होता तरी मोदींच्या पक्षाने तो ३७ वर्षे उगाळला. त्यांच्या सरकारवर राफेल विमानांच्या खरेदीत झालेला घोटाळा २२ हजार कोटी रुपयांचा असल्याचा आरोप सारे विरोधी पक्ष आता करीत आहेत. मोदी त्याहीविषयी कधी बोलत नाहीत. किंबहुना सरकारवर होणाºया गंभीर आरोपांना आणि त्याच्या प्रशासनातील उघड होणाºया घोटाळ्यांना सरळ उत्तर देण्याऐवजी काँग्रेस पक्ष व त्याची जुनी राजवट यांच्याविषयी देशात व विदेशातही टीकाखोरी करण्यातच त्यांनी त्यांचे वक्तृत्व आजवर झिजवलेले दिसले आहे. त्यांच्या सरकारातील अलीकडच्या घोटाळ्यांबाबत ते व सरकारातील संबंधित खाती कोणत्या कारवाया करीत आहे याहीविषयी ते आणि त्यांचे प्रवक्ते गप्प राहण्यातच समाधान मानत आहे. विरोधकांवर आरोप केले की आपल्या पापांचे परिमार्जन आपोआपच होते हा त्या साºयांनी मनोमन बाळगलेला समज खरा नाही. जनतेला मौनाचा अर्थ कळतो आणि जोरकस बोलण्यातील असत्यही समजते. मोदींच्या सरकारातील माणसे सारेकाही व्यवस्थित व सुरळीत चालले आहे असे भासविण्याचा प्रयत्न त्यांच्या भाषणातून व त्यातील खºयाखोट्या आश्वासनातून करताना दिसतात. काही काळापूर्वी केंद्र सरकारातील कायदेपंडित म्हणून ओळखले जाणारे एक ज्येष्ठ मंत्री नागपूर या महाराष्ट्राच्या उपराजधानीत आले. त्यांना त्यांचे मित्र असलेल्या एका ज्येष्ठ स्थानिक कायदेपंडिताने त्यांच्या सरकारच्या अशा मौनाविषयी खडसावून प्रश्न विचारला तेव्हा ते हताशपणे म्हणाले ‘आम्ही केवळ आमच्या खात्यांचे हेडक्लार्क आहोत, सारे निर्णय पंतप्रधानांचे कार्यालय व ते स्वत:च घेतात. आमच्याकडे तयार निर्णयच तेवढे अंमलबजावणीसाठी येत असतात. पक्ष म्हणून त्यांचे समर्थन करायचे आणि मंत्री म्हणून त्यांची अंमलबजावणी करायची एवढेच आमच्या हाती आहे.’ एका ज्येष्ठ मंत्र्याचे सरकारातील हे हतबलपण एकूण सरकार व प्रशासन यांना झालेला पक्षाघात सांगणारे आहे. मोदी सरकारचे सारे निर्णय मोदी हे एकटेच घेतात याविषयी राष्ट्रीय नियतकालिकांनी बरेचदा लिहिले आहे. त्याला सरकारातील एकाही मंत्र्याने कधी उत्तर दिल्याचे दिसले नाही. जी माणसे चांगल्याचे समर्थन करीत नाहीत ती आपल्या लोकप्रियतेला बाधा आणणाºया निर्णयाचे समर्थन तरी कसे करणार आणि सरकारच्या चुकीच्या निर्णयांवर निरवानिरवीचे पांघरूण तरी कसे घालणार? नोटाबंदीचा निर्णय जनतेच्या विरुद्ध गेला. त्या निर्णयाने देशात सव्वाशेहून अधिक लोकांचा बळी घेतला. मात्र सरकारातील एकानेही त्या बळी गेलेल्यांविषयी सहानुभूतीचा चकार शब्द कधी काढला नाही. जीएसटीच्या निर्णयाने देशात महागाई वाढविली, व्यापाºयांवर कमालीचे निर्बंध आणून त्यांना जास्तीची कागदपत्रे तयार ठेवायला भाग पाडले गेले. मात्र त्याही निर्णयाविषयी सरकार पक्षातील कुणी जनतेकडे क्षमायाचना केली नाही आणि त्याविषयी कुणी बोलतानाही दिसले नाही. बँकांचे घोटाळे झाले आणि सरकार गप्प राहिले. पाकिस्तानने या एकाच वर्षात ८०० हून अधिकवेळा भारताच्या सीमेचा भंग केला, त्यात अनेक लष्करी जवानांना हौतात्म्य पत्करावे लागल्याचे दिसले. मात्र याहीबाबत एका लष्कर प्रमुखाखेरीज सरकारतील कुणी कधी बोलले नाहीत. त्याचमुळे उपरोक्त व्यंगचित्रकाराने या सरकारला ‘निरवानिरव करणारे मोदी सरकार’ म्हटले ते सार्थक आहे असेच म्हणणे भाग आहे.

Web Title:  'Nirvinirvar' Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.