PM Narendra Modi Birthday: अद्भूत आत्मबलाचा चकित करणारा बळकट स्रोत म्हणजे पंतप्रधान मोदी: नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 08:44 IST2021-09-17T08:43:25+5:302021-09-17T08:44:37+5:30
भारताने स्वातंत्र्योत्तर काळात पाहिलेल्या व अनुभवलेल्या पंतप्रधानांपैकी विद्यमान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे व्यक्तिमत्त्व सर्वात वेगळे आहे.

PM Narendra Modi Birthday: अद्भूत आत्मबलाचा चकित करणारा बळकट स्रोत म्हणजे पंतप्रधान मोदी: नितीन गडकरी
भारताने स्वातंत्र्योत्तर काळात पाहिलेल्या व अनुभवलेल्या पंतप्रधानांपैकी विद्यमान पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे व्यक्तिमत्त्व सर्वात वेगळे आहे. आत्यंतिक राष्ट्रप्रेम, प्रचंड कष्ट घेण्याची तयारी, निर्धार व निर्णय क्षमता, भारताला परम वैभव प्राप्त करून देण्यासाठी ध्यास घेऊन काम करण्याची धाटणी असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे. भारताला सर्व क्षेत्रांत आत्मनिर्भर बनवण्यासाठी चहू बाजूंनी सुरू असलेल्या प्रयत्नांच्या मागे नरेंद्रभाईंचे दूरदृष्टीचे नेतृत्व आणि मार्गदर्शन आहे. गेल्या सात वर्षांहून अधिक काळात त्यांनी दाखविलेले आत्मबल माझ्या दृष्टीने केवळ अभूतपूर्व असे आहे.
भाजप हा पक्ष एकेकाळी राजकीय अस्पृश्यतेचा बळी होता. ती अस्पृश्यता आमचे नेते अटलजी, अडवाणीजी यांनी संपवली आणि भाजपने एनडीएच्या निमित्ताने देशाच्या राजकारणालाच नव्हे; तर एकूण स्वरूपाला एक नवी दिशा दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवर आज भारताचा डंका वाजतो आहे. देशात एम्स, आयआयएम, आयआयटी यांसारख्या ख्यातकीर्त शैक्षणिक संस्थांचे जाळे विणले जाते आहे. उज्ज्वला किंवा जनधन योजनांसारख्या उपक्रमांनी सामान्य जनांचे कल्याण होते आहे. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुले बांधली जात आहेत. देशाच्या सीमा आता अधिक सुरक्षित आहेत, व्यापार उदिमाला प्रोत्साहन, पायाभूत सुविधांचा विकास, करप्रणालीचे सुसूत्रीकरण, तीन तलाकसारख्या अनिष्ट पद्धतीचे उच्चाटन, प्रभू श्रीरामचंद्रांच्या भव्य मंदिराची उभारणी, जम्मू - काश्मीरमध्ये तसेच अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले.
कोरोनाच्या प्रादुर्भावादरम्यान त्यांच्या नेतृत्त्वाचा कस लागला. परंतु, त्याही संकटातून त्यांच्या नेतृत्त्वात आपण मार्गक्रमण केले. आज भारत जगातील सर्वात मोठी मोफत लसीकरणाची मोहीम राबवीत आहे. सबका साथ, सबका विकास असे ब्रीद ठेवून नरेंद्रभाई ज्या पद्धतीने या देशाला पुढे नेत आहेत, ते कार्य अद्वितीयच मानले पाहिजे.
एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली व्यक्ती भारताची पंतप्रधान होऊ शकते, हे जसे त्यांच्या निमित्ताने सिद्ध झाले, तसेच प्रखर राष्ट्रवादाचा विचार देशाच्या वैभवात वेगळ्या प्रकारची भर घालू शकतो, हेही सिद्ध झाले आहे. मोदीजींना स्वार्थ नाही. त्यामुळे त्यांची राष्ट्रसेवा ही निःस्पृह स्वरुपाची आहे. तिला आत्मबलाचे अधिष्ठान आहे आणि अतीव राष्ट्रप्रेमाचे, मेहनतीचे, कल्पकतेचे कोंदण आहे. त्यांना ईश्वराने राष्ट्रकार्य आणि लोकसेवेसाठी उदंड आयुरारोग्य द्यावे, हीच त्यांच्या जन्मदिनी ईश्वराला प्रार्थना!