नितीन गडकरींची जादूची कांडी
By Admin | Published: April 1, 2016 04:04 AM2016-04-01T04:04:41+5:302016-04-01T04:04:41+5:30
एकाच दिवशी २७ हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करणाऱ्या नितीन गडकरींची जादूची कांडी सोलापूर जिल्ह्यावर फिरली. त्याचा भाजप नेते पक्षासाठी किती उपयोग करणार...?
- राजा माने
एकाच दिवशी २७ हजार कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करणाऱ्या नितीन गडकरींची जादूची कांडी सोलापूर जिल्ह्यावर फिरली. त्याचा भाजप नेते पक्षासाठी किती उपयोग करणार...?
जादू म्हटली की, हातचलाखी आलीच, असे सूत्र आपण नेहमीच मांडतो. त्यामुळे जादूच्या कांडीलाही तोच नियम लावला जातो. राजकारणात वापरल्या जाणाऱ्या जादूच्या कांड्या यापेक्षा निराळ्याच! पण काहीही असो नितीन गडकरी यांची जादूची कांडी मात्र महाराष्ट्राच्या दृष्टीने सदैव हिताचीच ठरलेली आहे. आपण म्हणाल, जादूची कांडी आणि गडकरी यांचा काय संबंध? नेमक्या त्याच संबंधाची अनुभूती सोलापूर जिल्ह्याने मागच्या आठवड्यात घेतली. रस्ते विकासाच्या कामांची तब्बल २७ हजार कोटी रुपयांची जादूची कांडी गडकरींनी फिरविली. तीही सोलापूरचे सुपुत्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या साक्षीनेच!
या कार्यक्रमाने ७ मार्च १९६६ रोजी महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झालेल्या उजनी धरण भूमी पूजनाच्या आठवणी जागविल्या़ जिल्ह्याला व शहराला नवे रूप देऊ पाहाणारा तेवढ्याच तोलामोलाचा तो क्षण होता़ उजनीने सोलापूर जिल्ह्याचा चेहरामोहरा आणि अर्थकारण बदललेले हा मुद्दा वादातीत आहे. धरण झाले आणि जिल्ह्याचे अर्थकारण झपाट्याने बदलले. आज ३५ साखर कारखाने उभे आहेत तर १५ उभारणीच्या प्रतीक्षेत आहेत. कारखान्यांचे हे अर्धशतक कित्येक जणांच्या पचनी पडणारही नाही.
आता नितीन गडकरी यांनी सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या रस्ते विकासाचे अप्रतिम स्वप्न पाहिले आहे़ २७ हजार कोटी रुपयांच्या भूमिपूजनाचे काम झाले; पण त्यासाठी पैसा कोठून येणार, हा सर्वमान्य प्रश्नही पुढे येतो. असाच प्रश्न मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे वेळीही गडकरींना विचारला गेला होता़ आज मात्र त्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येकाला गडकरींनी त्यावेळी फिरविलेल्या जादूच्या कांडीची आवर्जून आठवण होते. तोच अनुभव सोलापूर जिल्ह्याला येईल असाच विश्वास त्यांनी भूमिपूजन समारंभात सोलापूरकरांना दिला आहे.
पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा. शरद बनसोडे आणि ‘लोकमंगलकार’ आ. सुभाष देशमुख यांना त्या कार्यक्रम आयोजनाबद्दल निश्चितपणे शाबासकी द्यायला हवी. भूमिपूजन झालेल्या उड्डाणपुलांमुळे जवळ-जवळ अर्धे सोलापूर शहर व्यापले जाणार आहे. गावातून जाणाऱ्या महामार्गामुळे अपघातात अनेक विद्यार्थी बळी पडले होते. आता तसे प्रसंग तर येणार नाहीत़ पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, गाणगापूर आणि श्री सिद्धरामेश्वर ही स्थळे या जिल्ह्याचीच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याची आहेत. ही सर्व स्थळे चारपदरी रस्त्यांनी जोडली जाणार आहेत. पंढरीचा पालखी मार्ग असो वा वर्षानुवर्षे मोठमोठ्या खड्ड्यांनी व्यापलेला गाणगापूर मार्ग असो आता प्रत्येक रस्ता चौपदरी !
एकाचवेळी एवढ्या मोठ्या कामांचा श्रीगणेशा होण्याचा अनुभव सोलापूर जिल्हा प्रथमच घेत होता. गडकरींनी आपण दिलेल्या मंजुऱ्या हवेतल्या नाहीत याची हमी आपल्या भाषणात देताना येत्या चार-पाच महिन्यात टेंडर्स निघून कामालाही सुरुवात होणार असल्याची ग्वाही दिली.
एकूणच मागचा आठवडा गडकरींच्या जादूच्या कांडीने गाजविला. त्याला बार्शीत राजेंद्र मिरगणे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान आवास योजनेतील ८६० घरांचे भूमिपूजन करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भक्कम जोड दिली. या पार्श्वभूमीवर भाजपाची शक्ती जिल्ह्यात वाढणार काय, हा लाख मोलाचा प्रश्न आहे़़ गटातटाने हाही पक्ष ग्रासला आहे़ दोन देशमुखांची तोंडे वेगवेगळ्या दिशेला तर खा़ बनसोडे नक्की कुठे हेच समजत नाही़ बिच्चारा संघ परिवार हे सगळे पाहात घुटमळण्यापलीकडे काहीच करू शकत नाही. येऊ घातलेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीस जादूची कांडी उपयोगी ठरू शकते़ पण गटाने माजलेले मनोरोग, कल्पनादारिद्र्य कोण सोडणार? तरीही विकासाला दिशा देणारी नितीन गडकरींची जादूची कांडी कामी येऊ शकते़, हे त्यांना कोण सांगणार!