Nitin Raut Birthday: वंचितकेंद्री समाजकारणाला बळ देणारा दूरदर्शी लोकनेता 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 07:11 AM2021-10-09T07:11:43+5:302021-10-09T07:12:21+5:30

राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेसच्या अ. भा. मागासवर्ग विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन राऊत यांचा आज (दि.९) वाढदिवस. त्यानिमित्त..

Nitin Raut Birthday: A visionary public leader who gives strength to disadvantaged society | Nitin Raut Birthday: वंचितकेंद्री समाजकारणाला बळ देणारा दूरदर्शी लोकनेता 

Nitin Raut Birthday: वंचितकेंद्री समाजकारणाला बळ देणारा दूरदर्शी लोकनेता 

Next

डॉ. नितीन राऊत यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वात मला अनेक शक्यतांचे आवाज ऐकायला येतात. या सर्व आवाजांचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न मी करतो, तेव्हा उद्याच्या एका दूरदर्शी लोकनेत्याची प्रतिमा माझ्या नजरेपुढे स्पष्ट व्हायला लागते. त्यांचे निश्चित दिशेने उलगडत जाणारे सामाजिक आणि राजकीय वर्तन पाहता त्यांच्यात एक फार मोठ्या आवाक्याचा दूरदर्शी लोकनेता दडलेला आहे, हा निर्णय मला घ्यायला लागतो. आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, नैतिक अशा सर्व सत्ता आर्थिक सत्तेच्या मांडलिक झालेल्या आहेत. सामाजिक न्याय, इहवाद आणि समाजवाद अशा महान तत्त्वांपासून आर्थिक सत्ता दूर जाते, त्या वेळी एकूणच राष्ट्राची अवस्था बुडणाऱ्या जहाजासारखी होते. मूल्यांचे कणे मोडण्याची स्पर्धा सुरू होते. पूर्ण समाजाच मग या बौद्धिक अराजकात गटांगळ्या खायला लागतो.

आपण सर्वच आज एका सांस्कृतिक ओहोटीच्या काळात जगत आहोत. अशा वेळी एकूणच समाज हतबलतेच्या किनाऱ्याला  तरी लागतो किंवा संभ्रमाच्या धुक्यात तरी शिरतो. आपल्या भोवतीच्या जीवनात याचे दु:खद  दाखले  आपल्याला मिळतात. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  देशात संविधानकेंद्री राजकारण अभिप्रेत होते. वंचितांना न्याय मिळावा ही त्यांची आत्यंतिक धडपड होती. सर्वांसाठी परिवर्तन आणि परिवर्तनासाठी सर्वांचे संघटन, हे  डॉ. बाबासाहेबांच्या राजकारणाचे सूत्र होते. ते राजकारण समाजासाठी होते याचा अर्थ एकूणच समाजातील सर्वच दुर्बल घटकांसाठी होते. या सर्वांची वैचारिक आणि भावनिक अभिरुची संविधानकेंद्री व्हावी, ही थोर सांस्कृतिक दृष्टी या राजकारणाच्या पाठीशी होती. डॉ. नितीन राऊत यांच्या याच दृष्टीचे प्रत्यंतर त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसते. हे व्यक्तिमत्त्व केवळ राजकीय व्यक्तिमत्त्व नाही, तर  ते अत्यंत जागरूक असे सामाजिक व्यक्तिमत्त्वही आहे. राजकारणाची समाजकारणापासून, राजकारणाची उच्च सांस्कृतिक मूल्यांपासून फारकत करण्याचा  आणि केवळ आर्थिक राजकारणाचे ओझे वाहण्याचा हा काळ आहे.

या पडझडीच्या काळात एकूणच देशात फार कमी माणसे जी संविधानकेंद्री सामाजिक आणि आर्थिक राजकारणावरची आपली पकड ढिली होऊ देत नाहीत. डॉ. नितीन राऊत हे त्यातले आश्वासक नाव आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनाला छळणाऱ्या प्रश्नांची मान मोडून अभ्यास करण्याची सवय त्यांना आहे. आपली वाङ्मयीन अभिरुची त्यांनी प्रयत्नपूर्वक जागरूक ठेवलेली आहे. अल्पसंख्याकांच्या आणि इतरही सर्वच अडल्यानडल्यांच्या अडचणींत धावून जाणे हा त्यांचा स्वभाव आहे. वंचितकेंद्री समाजकारण हे त्यांनी आपल्या राजकारणाचे ध्येय ठरविले आहे. मंत्रिपद वा राजकारणातले कोणतेही पद हे साधन आहे आणि लोकसेवा हे आपले साध्य आहे, हे त्यांनी आपल्या मनाला पक्के शिकविलेले आहे.

गिरणी कामगाराच्या या मुलाला गरिबीचे छळशास्त्र चांगले माहीत आहे. त्यामुळे गरिबांबद्दल त्यांना विशेष आस्था वाटते. अत्यंत मायेने, कळवळ्याने आणि गरीब लोकांच्या काळजाला हात घालत कसे बोलावे याचे प्रशिक्षण त्यांना त्यांच्या सामाजिक पार्श्वभूमीने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित केंद्रित चळवळीने दिलेले आहे. रागावलेल्या, चिडलेल्या व्यक्तीला शांत कसे करावे यासाठी त्यांना वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. त्याच्या प्रश्नांशी ते सहज एकरूप होतात. हे सामंजस्य त्यांना त्यांच्या भोवतीच्या आंबेडकरी चळवळीने दिलेले आहे. एकूणच समाजाचा केवळ चेहराच नव्हे, तर त्याचे पारंपरिक मनही बदलेले  पाहिजे. समाजाने आधुनिक भौतिक बदलच स्वीकारू नयेत तर त्याने आधुनिक मूल्यचारित्र्यही स्वीकारावे यासाठी नितीन राऊत नावाचा हा कल्पक भीमसेवक सतत धडपडत असतो. मुस्लीम बांधव, शीख बांधव, बौद्ध बांधव अशा सर्वांनाच हा सुविद्य लोकनेता आपले कुटुंब मानतो.

सामाजिक सलोख्याचे, संविधानातील भारतीय ऐक्याचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांचे चित्र वास्तवाच्या कॅनव्हासवर चितारण्याचा ध्यास त्यांच्या सर्वच विकासकेंद्री कामांमधून आपल्यासोबत बोलत राहतो. पश्चिम नागपूरच्या विकासाचे मॉडेल त्यांनी उत्तर नागपुरात गतिमान केले. पाण्याचा प्रश्न, रस्त्यांचा प्रश्न आणि रोजगाराचा प्रश्न उत्तरांच्या दिशेने धावायला लागला आहे. उत्तर नागपूरला विकासाची ही उत्तर दिशा देणाऱ्या लोकसेवकाला महाराष्ट्र आता नितीन राऊत या नावाने ओळखतो. बौद्ध विवाह कायद्याचा आणि वारसा हक्काचा प्रश्न त्यांनी अभ्यासपूर्ण पद्धतीने लावून धरला. शासकीय पातळीवर त्यांच्या प्रयत्नांना याबाबत हिरवा कंदील मिळाला आहे. त्यांना वाढदिवसाच्या सदिच्छा.

- डॉ. यशवंत मनोहर (ज्येष्ठ साहित्यिक)

Web Title: Nitin Raut Birthday: A visionary public leader who gives strength to disadvantaged society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.