नितीनभाऊ हाजीर हो...!
By राजा माने | Published: April 9, 2018 01:21 AM2018-04-09T01:21:05+5:302018-04-09T01:21:05+5:30
इंद्रदेवाच्या या आठवड्यातील फर्मानाने आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके पुरता चक्रावून गेला. भाजप प्रकट दिनाच्या ऐतिहासिक महासोहळ्याची बित्तमबात आणि पवार ब्रिगेडच्या ‘हल्लाबोल’ मोहिमेचा आँखो देखा हाल कळविण्याचा त्याचा बेत होता.
इंद्रदेवाच्या या आठवड्यातील फर्मानाने आपला इंद्रलोकाचा स्टार रिपोर्टर यमके पुरता चक्रावून गेला. भाजप प्रकट दिनाच्या ऐतिहासिक महासोहळ्याची बित्तमबात आणि पवार ब्रिगेडच्या ‘हल्लाबोल’ मोहिमेचा आँखो देखा हाल कळविण्याचा त्याचा बेत होता. तेवढ्यातच महागुरू नारदांचा व्हॉट्सअॅप मेसेज येऊन धडकला. त्याने मेसेज पाहिला....‘नितीनभाऊ हाजीर हो !’ एवढाच तो मेसेज . नितीनभाऊंना इंद्रदरबारात पाचारण करायचे कारणच काय? या प्रश्नाच्या विचारात असतानाच त्याच्या मोबाईलची रिंग खणाणली.‘ नारायण ...! नारायण ..!!’ (नारदांचा डायल टोन असल्याने) यमकेने क्षणार्धात फोन घेतला व बोलू लागला.
यमके : प्रणाम..ग़ुरूदेव !
नारद : इंद्रदेवांचे फर्मान बघितलेस ना ! मग, आता नितीनभाऊंना कुठं गाठतोस ?
यमके : नागपुरात गडकरी वाड्यावर किंवा दिल्लीत ! पण गुरू, हल्लाबोल मोहिमेने पश्चिम महाराष्टÑ ढवळून निघतोय. धनाभाऊ, अजितदादा, तटकरे टीमची जोरदार बॅटिंग सुरू आहे, जाणता राजाही दिल्लीत गतिमान झालाय.यापैकी कुणाला तरी इंद्रदरबारात बोलावण्याऐवजी नितीनभाऊंनाच का बरे बोलवायचे ?
नारद : अरे शिष्या, मराठी भूमीतील खणलेले रस्ते तुला कसे दिसत नाहीत ? तुला फक्त चंद्रकांतदादांचे खड्डेच दिसत होते का? हजारो कोटींच्या कामांची भूमिपूजने करण्याचा पराक्रम करणाऱ्या नितीनभाऊंनी मुंबापुरीतील भाजप प्रकट दिन ऐतिहासिक महासोहळ्यात आणखी एक विक्रम नोंदला...
यमके : हो, आता नितीनभाऊंनी सेक्युलर आणि धर्मनिरपेक्ष या पारंपरिक शब्दाला पर्यायी सोईचा शब्द जन्मी घातला.. ‘सर्वधर्मसमभाव’
नारद : कडव्या हिंदुत्ववादाचे उदात्तीकरण करण्याचा तो प्रयत्न म्हणावा लागेल. पण त्या प्रयत्नासाठी त्यांना इंद्रदरबारात बोलावले जात नाहीये...
यमके : मग कशासाठी बोलावले जातेय? इंद्रदेव त्यांना कशाचा जाब विचारणार?
नारद : जाब काय फक्त व्यंगचित्रकार राजनेच विचारायचा का?
यमके : अहो , महासोहळ्यात चंद्रकांतदादांची ‘वाळवी’ गाजली. अमितभार्इंचे साप, मुंगूस, श्वान असे प्राणीप्रेमही गाजले. त्यांना इंद्रदरबारात बोलवायला हवे होते. शिवाय भरगच्च भरलेल्या वर्गाचे ‘मॉनिटर’ आमच्या देवेंद्रभाऊंचे तावातावाने झालेले जोशपूर्ण भाषणही गाजले होते. त्यांनाही टाळून नितीनभाऊंनाच का बोलवायचे?
नारद : ते जेथे जेथे जातात तिथे लाखोंचे इमले चढवितात, हे आम्हाला ठाऊक होते. पण, आता त्यांनी मुंबापुरीतील महामेळाव्यात कोटी कोटीची उड्डाणे घेतली आहेत. त्यांच्या एकट्याच्या खात्यातून महाराष्टÑासाठी पाच लाख कोटी रुपये राखून ठेवल्याचे त्यांनी जाहीर केले. एक लाख कोटीची कामे वर्षभरातच सुरू होणार असल्याचा दावा केला...मग त्यांना ही आकडेमोड विचारायला नको ?
यमके: खरं आहे. त्यांना जाब विचारायलाच हवा. इंद्रदरबाराला नितीनभाऊंचे कोटी कोटी उड्डाणाचे कोडे सुटायलाच हवे. तरीही मला वाटते काही काळ त्यांना कामासाठी देऊन नंतरच बोलवायला हवे.
नारद: त्यांना कामासाठी काळ द्यावा असे तुला का वाटते?
यमके: गुरूदेव, पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाचे ते जनक असल्याने त्यांना कोटी-कोटीची उड्डाणे घेण्याचा अधिकारच आहे ना !