नितीश ईज बिहार?

By admin | Published: August 6, 2015 10:19 PM2015-08-06T22:19:55+5:302015-08-06T22:19:55+5:30

कोणे एकेकाळी अखिल भारतीय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी इंदिरा गांधी यांची स्तुती करण्यासाठी ‘इंदिरा ईज इंडिया अ‍ॅन्ड इंडिया ईज इंदिरा’ असे उद्गार काढले

Nitish is Bihar? | नितीश ईज बिहार?

नितीश ईज बिहार?

Next

कोणे एकेकाळी अखिल भारतीय काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी इंदिरा गांधी यांची स्तुती करण्यासाठी ‘इंदिरा ईज इंडिया अ‍ॅन्ड इंडिया ईज इंदिरा’ असे उद्गार काढले आणि टीकेचे प्रचंड मोठे मोहोळ अंगावर ओढून घेतले. आता त्याच धर्तीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी ते स्वत: म्हणजेच बिहार आणि बिहार म्हणजे नितीशकुमार असे सूचित करणारे एक जाहीर पत्र पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना लिहिले आहे. मध्यंतरी मोदी यांनी त्यांच्या बिहार दौऱ्यात नितीश यांच्या ‘डीएनए’मध्ये खराबी असल्याचे जाहीर उद्गार काढले होते. त्यावर टीका झाल्यावर मोदींनी नितीश यांच्या नव्हे तर त्यांच्या लोकशाहीविषयक भूमिकेच्या डीएनएमध्ये खराबी असल्याची दुरुस्ती केली होती. पण मोदींचे मूळचे विधान गृहीत धरून नितीशकुमार यांनी मोदींना लिहिलेल्या पत्रात, सदर विधानाने संपूर्ण बिहारचा अपमान केल्याचा ठपका ठेवला आहे. मुळात बिहार या बिमारु राज्याचे जाऊ द्या, तथाकथित प्रगत राज्यातील जनसामान्यांपैकी किती लोकाना डीएनए म्हणजे काय हेच ठाऊक असण्याची शक्यता नसताना, त्यात खराबी असणे वा नसणे, हे समजण्याचाही प्रश्न उपस्थित होत नसताना, बिहारी बाबूंना हा आपला अपमान वाटण्याचे काही कारणच नाही. पण मुद्दा तो नाहीच. नितीशकुमार याआधी बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले, तेच मुळी भाजपाच्या सहकार्याने. पण भाजपाने जेव्हां नरेन्द्र मोदी यांची पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून निवड केली त्याच क्षणी नितीश यांच्या निधर्मवादाला बट्टा लागला व त्यांनी भाजपाशी असलेले संबंध एका झटक्यात तोडून टाकले. तो राग मोदींच्या मनात असणारच. त्याचबरोबर गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या झंझावाताने खुद्द बिहारात नितीश यांच्या संयुक्त जनता दलाची पूर्ण वाताहत केली व त्याचा राग नितीश यांच्या मनात साचून राहिलेला असणेही स्वाभाविकच आहे. त्यात भर म्हणून की काय, लोकसभा निवडणुकीनंतर नितीश यांनी नैतिकतेचा आव आणून मुख्यमंत्रिपद सोडताना, ज्यांना आपल्या पदावर बसविले त्या जितनराम माँझी यांनी आता थेट मोदींचा कळप गाठला आहे. तेव्हां या साऱ्या गलबल्यात बिहारचा अपमान वगैरे काहीही नसून आगामी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची ही एक रंगीत तालीमच आहे. त्यामुळेच बहुधा सध्या रालोआत असलेल्या रामविलास पासवान यांनीदेखील या वादात उडी घेतली असून नितीश यांनीच बिहारचा अपमान केल्याचा प्रत्त्यारोप केला आहे. नरेन्द्र मोदी पंतप्रधान असताना व त्यांना भोजनाचे निमंत्रण दिलेले असताना, मोदींनी त्यांना जेऊ घातले नाही व आतिथ्यशील बिहारी जनतेचा तो खरा अपमान होय, असे पासवान यांनी म्हटले आहे.

Web Title: Nitish is Bihar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.