मोदींसमोर नितीशकुमारांचे कडवे आव्हान?
By admin | Published: February 9, 2016 03:46 AM2016-02-09T03:46:28+5:302016-02-09T03:46:28+5:30
पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जोवर नरेंद्र मोदी यांचे नाव समोर आले नव्हते तोवर ते स्वत:स गुजरातचे स्वयंघोषित निर्माते म्हणवून घेण्यातच आनंद मानत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार
- हरिष गुप्ता
(‘लोकमत’ समूहाचे नॅशनल एडिटर )
पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जोवर नरेंद्र मोदी यांचे नाव समोर आले नव्हते तोवर ते स्वत:स गुजरातचे स्वयंघोषित निर्माते म्हणवून घेण्यातच आनंद मानत होते. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पार्श्वभूमी मात्र तुननेने खूपच साधी आहे. पण ते उच्चशिक्षित आणि चांगले प्र्रशासकही आहेत. २०१४च्या मोदी लाटेनंतर मोदी- नितीशकुमार यांच्यात निवडणुकीच्या पातळीवर तुलना करण्यासारखे काहीच नव्हते. भाजपाच्या नेतृत्वाखालील रालोआने बिहारमध्ये ४० पैकी ३८ जागा जिंकून नितीशकुमारांच्या जदयूला केवळ दोन जागा मिळू दिल्या होत्या. पण नंतरच्या काळात गंगेतून बरेच पाणी वाहून गेले आहे.
अभियांत्रिकीची पदवी घेऊन राजकारणात उतरलेल्या व ठाम समाजवादी विचार असणाऱ्या ६५ वर्षीय, नितीशकुमार यांनी मागील वर्षीच्या बिहार विधानसभा निवडणुकीत मोदींवर डाव उलटवला. भाजपाला लोकसभा निवडणुकीनंतर जबरदस्त चपराक बसलीच, पण नितीशकुमारही राष्ट्रीय पातळीवर आले. ७०च्या दशकातील जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीतून पुढे आलेले नितीशकुमार तसे सावध राजकारणी आहेत. ते जाहीररीत्या जरी हे नाकारीत असले तरी २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ते मोदींसमोर कडवे आव्हान उभे करतील असेच संकेत आहेत. ‘बिहार आणि उत्तर प्रदेशात सांस्कृतिकता आणि लोकसंख्या याबाबतीत समानता आहे’, असे वक्तव्य करून त्यांनी उत्तर प्रदेशच्या राजकारणातील त्यांचा रस सूचित केला आहे. उत्तर प्रदेशातही महागठबंधन करण्याचे त्यांच्या मनात असल्याचे मागील काही घडामोडीतून दिसूनही आले आहे. त्यांनी अजितसिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाशी संपर्कसाधला असून अपना दलचे प्रमुख कृष्णा पटेल यांच्याशी त्यांचे संबंध मधुर आहेत. शिवाय अल्पसंख्यकांच्या डॉ.अयुब यांच्या पीस पार्टीच्याही ते संपर्कात आहेत.
भाजपाने मात्र माध्यमातील आपल्या सूत्रांना हाताशी धरुन बिहारात पुन्हा जंगलराज सुरु झाल्याचा प्रचार सुरु केला आहे. पण तो फारसा प्रभावी ठरताना दिसत नाही. नितीशकुमार यांना अजूनही केंद्रीय रेल्वे मंत्री व बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नावाजले जाते. त्यांनीच अगदी सुरुवातीस आॅनलाईन रेल्वे तिकीट बुकींंग सुरु केले आणि तिकीट खिडक्याही वाढवल्या. यामुळे रेल्वेला फायदाच झाला. त्यांनी बिहारात शालेय मुलींना शासकीय निधीतून वाटलेल्या सायकलींमुळे मुलींचे शाळेतील अनुपस्थितीचे प्रमाण कमालीचे घटले आहे. २००५ ते २०१४ या काळात राज्यातील महिला साक्षरता वाढली आणि राज्यातील सरासरी उत्पन्न सुद्धा वाढले आहे.
नितीशकुमार यांच्यासाठी उत्तर प्रदेशचे आव्हान मात्र बिहारपेक्षा वेगळे असेल. त्यांच्या जदयूचे त्या राज्यातील स्थान नगण्य आहे व त्यांना समाजवादी पार्टी किंवा मायावतींच्या बहुजन समाज पार्टीचा पाठिंबा मिळणे अवघड आहे. केवळ राष्ट्रीय लोक दलाचे समर्थन लाभणे पुरेसे नाही. मुळात या पक्षाला असलेला जाट समूहाचा आधारही आता घटला आहे. समाजवादी पार्टी नितीश यांच्या बाबतीत सावध आहे. मागील वर्षी बिहार विधानसभा निवडणुकीत समाजवादी पार्टीने महागठबंधनच्या विरोधात उमेदवार दिले होते. या आठवड्यात उत्तर प्रदेशात तीन ठिकाणी पोट-निवडणुका आहेत आणि नितीश तिथे समाजवादी पार्टीच्या उमेदवारांविरोधात प्रचार करणार आहेत.
असेच काहीसे बहुजन समाज पक्षाच्या (बसप) बाबतीतही आहे. लोकसभा निवडणुकीत मायावतींच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही तरी त्यांनी एकूण मतदानाचा मोठा भाग मिळवला होता. या मागचे कारण होते मायावतींचा ब्राह्मण आणि दलित एकत्रीकरणाचा प्रयत्न. तो २०१४ साली मात्र अयशस्वी ठरला होता. पण मायावतींच्या हातात जटाव आणि चांभार जातींची मते आहेत.२०११ च्या जनगणनेनुसार राज्यातील दलितांचे प्रमाण एकूण ५५ टक्के आहे. पण मायावतींचा दलितांमधील पासी, धोबी, वाल्मिकी, खाटिक आणि दुषाद यांच्याशी तितकासा घट्ट संपर्क नाही. दलितांमध्ये पासी १५ टक्के आहेत व त्यांच्यावर भाजपाने भावनात्मक पकड बसवली आहे. गझनीच्या महम्मदाच्या नातलगास युद्धात पराभूत करणारा आपला राजा हे पासींचे अभिमानाचे आणि गौरवाचे केन्द्र आहे. या समूहाने २०१४ मध्ये भाजपाला चांगली मते दिली होती.
बिगर-जटाव जातींचा असा आरोप आहे की मायावतींनी त्यांच्या सत्ताकाळात दिलेले वचन पूर्ण केले नाही. नितीश यांचे लक्ष या समूहावर आहे. त्याने भाजपाला पाठिंबा दिलेला असला तरी वाटाघाटी होऊ शकतात असे त्यांना वाटते. पासी तरुणांना अजूनही सरकारी नोकऱ्या, शाळा-महाविद्यालये येथे पुरेसे आरक्षण किंवा प्रतिनिधित्व नाही. पासी समूहाला जटाव समूहासोबत मिसळू दिले जात नाही, तिथे इतर जातींची गोष्ट दूरच आहे. पासींसाठी वेगळी वसतीगृहे तर आवश्यकच आहेत.
गाजीपूर येथे मागील आठवड्यात झालेल्या जाहीर सभेत नितीश यांनी बिगर-जटाव समूहांसमोर बोलताना जाती व्यवस्था नष्ट करण्यावर भर दिला आणि त्यातून त्यांनी भाजपा आणि मायावाती यांच्यावर नेम साधला. नितीश यांचा प्रयत्न उत्तर प्रदेशात महागठबंधन उभारण्याचा आहे. त्यात अनेक जाती आणि समूह असतील, भाजपाकडे झुकणाऱ्याा समाजवादी पार्टीपासून दुरावलेले मुस्लीम असतील, दलित समूहातले कुर्मी, मौर्य , कुशवाह आणि राजभर असतील आणि ज्यांनी उच्च जाती आणि यादवांचा प्रभाव झुगारुन द्यायचा आहे असे बिगर-यादव ओबीसीही असतील. नितीश यांनी या साऱ्यावर अद्याप ठाम निर्णय घेतलेला नसला तरी तशी चाचपणी ते नक्कीच करीत आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नितीश यांचे मित्र आहेत. तसेच त्यांचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी चांगले संबंध आहेत. नितीश यांच्या शपथविधीला ममतांचे विरोधक असलेले कम्युनिस्ट नेते उपस्थित असूनही ममता तिथे हजर होत्या. शिवाय अकाली दल व शिवसेनाही तिथे होती. चेन्नईहून एम.के.स्टालिन आले होते तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारही होते. महाभारताच्या या भूमीत समारंभांना असलेली उपस्थिती म्हणजे उद्योग पर्वाच्या आरंभाची मूकसंमती असते. इथे राजकारणातील बडा भाई शोधला जात असतो. मग हा बडा भाई पाटण्यातला मुन्ना (नितीश यांचे लाडातले नाव) असला म्हणून काय झाले?