निक्सन यांची विकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2020 12:27 AM2020-09-08T00:27:30+5:302020-09-08T00:28:41+5:30

इंदिरा यांनी हे बंड तर मोडून काढलेच; पण अमेरिकेचा शूरपणे मुकाबला करणाऱ्या व्हिएतनामी जनतेचे जाहीर कौतुक केले.

Nixon's perversion | निक्सन यांची विकृती

निक्सन यांची विकृती

googlenewsNext

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि त्यांचे तत्कालीन सुरक्षा सल्लागार हेन्री किसिंजर यांचे भारत, भारतीय यांच्याबद्दल अत्यंत वाईट मत होते, याचे अनेक दाखले किसिंजर यांच्या आत्मचरित्रपर ग्रंथापासून तत्कालीन अमेरिकी पत्रकारांच्या पुस्तकातून प्राप्त झाले आहेत. मात्र व्हाइट हाउसतर्फे सार्वजनिक करण्यात आलेल्या ताज्या टेप्समुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

‘भारतीय महिला जगात सर्वाधिक अनाकर्षक आहेत’, ‘भारताची लोकसंख्या प्रचंड असूनही लोक मुले जन्माला का घालतात’, ‘आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांत प्राण्यांचा रानटीपणा तरी असतो. भारतीय पुरुषांमध्ये तोही नाही’, अशी मुक्ताफळे निक्सन यांनी या टेपमध्ये उधळली आहेत. निक्सन १९६९ ते ७४ या काळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. व्हिएतनाम युद्धात निक्सन-किसिंजर जोडगोळीचा मुखभंग झाला. याच युद्धाचा व निक्सन यांच्या भारतद्वेषाचा जवळचा संबंध आहे. ज्यावेळी निक्सन यांची राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली तेव्हा काँग्रेसमध्ये ‘गूंगी गुडिया’ म्हणून वर्णन केल्या गेलेल्या इंदिरा गांधी विरोधात एका गटाने बंड केले होते. या बंडखोर गटाचा अमेरिकेच्या धोरणांना पाठिंबा होता.

इंदिरा यांनी हे बंड तर मोडून काढलेच; पण अमेरिकेचा शूरपणे मुकाबला करणाऱ्या व्हिएतनामी जनतेचे जाहीर कौतुक केले. अमेरिका व सोव्हिएत युनियन या दोन महासत्तांमधील संघर्षात पं. नेहरू व इंदिरा गांधी यांचा वैचारिक कल साम्यवादी विचारांकडे असला तरी आंतरराष्ट्रीय राजकारणात अलिप्ततावादी चळवळीची मुहूर्तमेढ रोवली. निक्सन यांना भारतीयांची तिडीक असण्याचे मूळ कारण इंदिरा गांधी यांनी अमेरिकेच्या वर्चस्ववादाला भीक न घालण्यात आहे.

पूर्व पाकिस्तानात शेख मुजिबूर रहमान यांनी पंतप्रधानपदावर दावा केल्यावर याह्याखान यांनी दमनशक्तीचा वापर सुरू केला. लक्षावधी लोकांची कत्तल करण्यात आल्याने छळाने हैराण झालेले निर्वासितांचे लोंढे पश्चिम बंगालमध्ये दाखल होऊ लागले. त्यामुळे भारत-पाकिस्तानच्या सीमेवर युद्धाचे ढग जमा झाले. मानवाधिकाराच्या नावाने नेहमीच गळे काढणाºया अमेरिकेने लोकशाहीवादी भारताची बाजू उचलून धरण्याची अपेक्षा होती. परंतु निक्सन-किसिंजर यांनी पाकिस्तानची तळी उचलून धरली.

भारतीय जनता ही केनेडींच्या बाजूची व आपल्या विरोधात असल्याचा निक्सन यांचा ग्रह होता. शिवाय निक्सन व इंदिरा यांच्यात दिल्लीत झालेल्या एका भेटीनंतर निक्सन नाराज झाले होते. एकीकडे निर्वासितांना धीर देतानाच दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर किसिंजर यांच्या खेळींवर मात करण्यात इंदिरा यशस्वी झाल्या. युद्ध अटळ असतानाही इंदिरा यांनी निक्सन यांना भेटण्याचे निश्चित केले. निर्वासितांच्या प्रश्नाबाबत निक्सन यांचे मन वळवण्याचा त्यांनी बराच प्रयत्न केला. मात्र मानवी प्रश्नाचा निक्सन राजकीय अंगाने विचार करीत होते.

निक्सन इंदिरा यांच्यावर इतके नाराज झाले होते की, राजशिष्टाचार केराच्या टोपलीत टाकत त्यांनी इंदिरा यांना भेटीकरिता पाऊणतास तिष्ठत ठेवले. ही गोष्ट इंदिरा यांच्या मनाला लागली. निक्सन भेटीनंतर भारतामधील निर्वासितांच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी इंदिरा व्हिएतनामवर बोलल्या. निक्सन यांनी केलेल्या सूचनांबद्दल त्यांनी ‘ब्र’देखील काढला नाही. बांगलादेश युद्धाच्या पार्श्वभूमीवर सातवं आरमार बंगालच्या उपसागरात आणून इंदिरा गांधी व पर्यायाने भारतीयांना डोळे वटारून दाखवण्याचा शेवटचा प्रयत्न निक्सन यांनी केला. पूर्व बंगालमधील पाकिस्तानी फौजांनी १६ डिसेंबर १९७१ रोजी शरणागती पत्करली. अमेरिकेचे सातवे आरमार भारताच्या हद्दीत दाखल होण्यापूर्वी युद्ध संपले आणि बांगलादेशच्या निर्मितीने निक्सन-किसिंजर यांचेही नाक कापले गेले. इंदिरा यांच्यात विरोधकांनाही दुर्गेचा साक्षात्कार झाला. निक्सन यांना सत्तेची झिंग चढली होती. अशी झिंग चढल्यावर नेते कसे बेताल बोलतात ते आपण सध्याही पाहतो. त्या झिंगेनी त्यांच्यातील विकृती उचंबळून आली आहे.

रिचर्ड निक्सन ज्या रिपब्लिकन पक्षातर्फे निवडणूक लढवून राष्ट्राध्यक्ष झाले त्याच पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प सध्या निवडणूक रिंगणात असून अमेरिकेतील भारतीयांच्या मतांकरिता ‘नमस्ते ट्रम्प’ या कार्यक्रमाचे गुजरातमध्ये आयोजन केले होते. निक्सन यांच्यावर हा काळाने उगवलेला सूड आहे.

Web Title: Nixon's perversion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.