No दुश्मनी.. No गटबाजी..  Only अवघे पाहू सु‘पंत’

By सचिन जवळकोटे | Published: September 1, 2019 09:08 AM2019-09-01T09:08:54+5:302019-09-01T09:09:38+5:30

लगाव बत्ती..

No animosity .. No faction .. Only rarely see 'pant' | No दुश्मनी.. No गटबाजी..  Only अवघे पाहू सु‘पंत’

No दुश्मनी.. No गटबाजी..  Only अवघे पाहू सु‘पंत’

googlenewsNext

- सचिन जवळकोटे

‘हात’ अन् ‘घड्याळ’वाल्यांनी आजपावेतो एक काम इमानेइतबारे केलं. आपलेच कार्यकर्ते अडविले अन् आपलेच नेते जिरवले. गावागावात झुंजी लावल्या. आयुष्यभर एकमेकांना लढवत ठेवलं... परंतु गुजरातचे ‘अमितभाई’ अन् नागपूरचे ‘देवेंद्रपंत’ वेगळीच स्ट्रॅटेजी घेऊन आज सोलापुरात येताहेत. वर्षानुवर्षे झगडत राहिलेल्या नेत्यांना एकत्र आणून आपलं ‘कमळ’ फुलविण्याचा नवा प्रयोग करताहेत... No दुश्मनी.. No गटबाजी.. Only अवघे पाहू सु‘पंत’.. लगाव बत्ती !

आज फक्त भोजन...
...वाढविणार राजकीय वजन!

सांगली-कोल्हापूरच्या महापुरामुळं पाच-सहा दिवस पुढं वाहवत गेलेली ‘कमळ’वाल्यांची ‘जनादेश’ यात्रा आज सोलापुरात येऊन ठेपतेय. या ठिकाणी वाजविला जाईल विधानसभेचा बिगुल. मात्र इथं होणारच नाही महाराष्ट्राला अपेक्षित असणारा कैक नेत्यांचा ‘प्रवेश सोहळा’... कारण ‘हाफचड्डी’वाल्यांचीही स्वत:ची अशी एक आचारसंहिता ठरलेली. पश्चिम महाराष्ट्रातील गबरगंड साखरसम्राट अन् शिक्षणसम्राटांचा प्रवेश सोहळा म्हणजे जणू ‘धनादेश’ यात्रा. याचा पार्टीच्या ‘जनादेश’ यात्रेशी येऊ देऊ नका काहीही संबंध, असा गुप्त आदेशच म्हणे नागपूरच्या ‘संघ’वाड्यातून निघालेला. असं असलं तरीही ‘भाई अन् पंत’ यांच्या भेटीला कोण-कोण येणार, याकडं सा-यांचंच लक्ष. इथल्या भोजन सोहळ्यात कोण कुणाला ‘ओकेऽऽ डनऽऽ’ची जिलेबी खाऊ घालणार किंवा ‘नंतर बघूऽऽ’चं गाजर दाखविणार, याचीही सोलापूरकरांना उत्सुकता लागलेली. अक्कलकोट, पंढरपूर, करमाळा अन् माढ्याच्या आमदारांचा फैसलाही होणार इथंच. त्यांच्या स्थानिक विरोधकांना अर्थात आपल्या निष्ठावान कार्यकर्त्यांना चुचकारण्याचा प्रयत्नही पद्धतशीरपणे केला जाणार इथंच.

पुन्हा एकदा ‘बापूंचा बंगला’

होटगी रस्त्यावरचा ‘सुभाषबापूंचा बंगला’ माहिताय का राव तुम्हाला? उगाच दचकू नका. ‘त्या’ बंगल्याची आता काही ‘ब्रेकिंग-ब्रिकिंग’ काही नाही. ‘शॉर्टकट’च्या प्रयोगातून झटपट यश मिळत असलं तरीही त्याचा त्रास नंतर वारंवार सहन करावा लागतो, हे लक्षात आल्यामुळंच की काय ‘बापू गट’ आजकाल प्रत्येक गोष्ट नियमानुसार करू लागलाय (म्हणे!). असो... तर या बंगल्यात परवा माढ्याचे ‘बबनदादा’ सुमारे बराच वेळ होते. ‘सावंतां’च्या आॅफिससमोर ताटकळत बसण्यापेक्षा ‘बापूं’च्या बंगल्यात हक्कानं गप्पा मारलेल्या कधीही चांगल्या, असा साक्षात्कार म्हणे त्यांना झालाय. कारण, सहकार खातं ‘बापूं’कडंच. कारखान्याच्या कुंडल्या त्यांच्याकडंच. लोकसभेच्या निकालानंतरही ‘अवीं’ची बँक पुन्हा एकदा ‘संजयमामां’च्या कारखान्याला कैक ‘खोकी’ देऊ शकत असेल तर ‘बापू’ का नाही आपल्याला मदत करणार, असा प्रश्न ‘बबनदादां’ना पडला तर नको नवल; परंतु या प्रश्नाचं उत्तर शोधता-शोधता टेंभुर्णीचं ‘कोकाटे’ भयचकित झाले तर नको आश्चर्य.
मात्र, माढ्यात स्थानिक विरोधकांपेक्षाही अकलूजकरांचा त्रास जास्त होऊ शकतो, हे ओळखून अगोदर दोन्ही ‘दादां’ची दिलजमाई करण्याचा अजेंडा राहिलाय ‘पंतां’च्या डोक्यात... अन् या नव्या ‘अ‍ॅडजेस्टमेंट’ला नाही म्हणू शकणार नाहीत दोन्हीही ‘दादा’... कारण ‘अकलूजकरांचा कारखाना’ जसा वांद्यात तसाच ‘निमगावकरांचाही कारखाना’ फंद्यात. त्यामुळं No दुश्मनी.. No गटबाजी.. 
Only अवघे पाहू सु‘पंत’. लगाव बत्ती...

...पुन्हा एकदा 
‘नाना अन् अण्णा?’

    सप्टेंबर महिन्यात ‘देवेंद्रपंत’ नक्कीच ‘अण्णां’चा चहा मागवतील, असा विश्वास वाटू लागलाय ‘अक्कलकोटकर’ अन् ‘पंढरपूरकर’ मंडळींना. मात्र, इथंही तीच स्ट्रॅटेजी. पंढरपुरात ‘भारतनाना’ अन् ‘प्रशांतमालक’ यांना एकत्र आणण्याचा होईल प्रयत्न. जसं बार्शीत ‘राजाभाऊं’च्या स्पर्धकाला ‘कॅबिनेट’ देऊन बसविलं ‘म्हाडा’च्या घरात निवांत, तसंच एखाद्या महामंडळाचा शब्द देऊन ‘प्रशांतमालकां’नाही केलं जाईल शांत. अक्कलकोटमध्येही चुचकारलं जाईल ‘सचिनदादां’ना. त्यासाठी लावली जाईल स्वतंत्र बैठक. मात्र ‘सिद्रामप्पां’ना कसं समजावयाचं (ह्यांग माडादू?) हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच. मात्र ‘देवेंद्रपंत’ करू शकतील म्हणे ही सारी मंडळी मॅनेज... परंतु मूळ दुखणं राहिलंच की होऽऽ सोलापूरच्या दोन ‘देशमुखां’ना कोण एकत्र आणणार? लगाव बत्ती...

लोकमंगल’ अन् ‘मनोरमा’ दिलजमाई...

    सुमारे वीस-बावीस वर्षांपूर्वी सोलापुरात बहुजनांच्या संस्था म्हणून तीन बँका उदयास आलेल्या. मात्र ‘मनोहरपंत’ केवळ ‘निराळे वस्ती’च्याच राजकारणात अडकल्यानं त्यांच्या ‘शरद’ची झेप सीमित ठरली लकी चौकापुरतीच. ‘सुभाषबापूं’ची स्वप्नं नेहमीच मोठ्ठी असल्यानं त्यांच्या ‘लोकमंगल’नं प्रवेश केला परजिल्ह्यात. इंदिरानगरमधील ‘मोरे’ घराण्याच्या ‘मनोरमा’ परिवारानंही पाऊल टाकलं जिल्ह्याबाहेर. खरंतर राजकीय ‘सुभाषबापू’ अन् प्रशासकीय ‘श्रीकांत’ यांच्या वाटा वेगळ्या. तरीही आजपावेतो दोन्ही संस्थांमधील स्पर्धेची कळत-नकळत होत राहिली चर्चा. मात्र, आता ‘संघ’वाल्यांनी यावरही शोधलाय उतारा. ‘मोरे’ परिवाराच्या हातात ‘कमळ’ देण्याचा घेतलाय ‘मल्टीस्टेट’ निर्णय. होईल लवकरच घोषणा. यामुळं घडू शकतो अजून एक नवा चमत्कार. ‘मनोरमा’ परिवारातल्या ‘अस्मिता’ताईही ‘धनुष्यबाणा’च्या गटबाजीला कंटाळून घेऊ शकतात धक्कादायक निर्णय.. कारण ‘कमळ’वाल्यांचं ठरलंय, No दुश्मनी.. No गटबाजी.. 
Only अवघे पाहू सु‘पंत’. लगाव बत्ती...

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: No animosity .. No faction .. Only rarely see 'pant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.