वाचनीय लेख - गृहपाठ नको, मग आपण शाळाही बंद करणार का?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 09:40 AM2022-09-23T09:40:05+5:302022-09-23T09:41:03+5:30
गृहपाठामुळे ताण येतो म्हणून गृहपाठ बंदी करण्याऐवजी गृहपाठाचे स्वरूप बदलून ते अधिक रंजक करण्याची खरी गरज आहे!
भाऊसाहेब चासकर
पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करायचा मनोदय राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी बोलून दाखवला आहे. मात्र गृहपाठासाठी आग्रही असलेल्या पालकांच्या ते पचनी पडलेले दिसत नाही. समाजमाध्यमांत तिखट टीका होऊ लागली आणि विरोधाला तोंड फुटले!
मुलांना गृहपाठाचा मानसिक ताण येतो म्हणून दुसरे टोक गाठून एकदम गृहपाठबंदी करणे योग्य होणार नाही. सुंदर हस्ताक्षर काढून वहीवर ‘छान’, ‘सुंदर’ असा अभिप्राय आणि शिक्षकांची शाबासकी मिळवणे मुलांना आवडते. काही शाळांमध्ये गृहपाठावर ‘स्मायली’ मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ लागलेली असते. एखाद्या दिवशी गृहपाठ द्यायचा राहिल्यास शाळा सुटायच्या वेळेस विद्यार्थी आग्रह धरतात. शिकवलेले किती समजले? हे गृहपाठातून शिक्षकांना समजायला मदत होते. शिकवण्याची दिशा ठरवायला मदत होते. लेखी, तोंडी परीक्षा, प्रकल्प, प्रात्यक्षिक, उपक्रम यांसोबत सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनात ‘स्वाध्याय’ हे एक साधन तंत्र आहे. घरचा अभ्यास दिला नाही तर मुले दप्तर उघडून बघत नाहीत, म्हणून ‘गृहपाठ द्या’ असा पालकांचा आग्रह असतो. शिक्षणमंत्री म्हणतात तसे विद्यार्थ्यांच्या मन, मेंदूवर ताण आहेत का? तर निश्चित आहेत.
शहरी भागातल्या अनेक शाळांमधल्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी असते. वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांचे आकलन जणू एकसारखेच आहे, असे गृहीत धरून शिक्षक शिकवतात. अनेक संकल्पना विद्यार्थ्यांना समजलेल्या नसतात आणि परीक्षेच्या वेळी विद्यार्थ्यांच्या मनावर भारी दडपण येते. त्यातून ताणतणाव, तीव्र भीती आणि पुढे नैराश्य अशा गोष्टी घडतात. पण गृहपाठामुळे ताण येतो म्हणून गृहपाठबंदी करण्याऐवजी गृहपाठाचे स्वरूप बदलण्याची गरज आहे. त्यात रंजकता, नावीन्य आणणे आवश्यक आहे. लिहिताना मुलांना मजा वाटेल, त्यांच्याठायी असलेल्या शोधक वृत्तीला प्रोत्साहन देता येईल, असे गृहपाठ पाहिजेत. सध्या पावसाचे दिवस आहेत. वर्गात कविता शिकवून झाल्यानंतर मुलांनी घरी पाऊस विषयावर गप्पा माराव्यात. विजा कडाडतात, ओढे-नाले वाहते होतात, धबधबे कोसळू लागतात, नद्या दुथडी भरून वाहू लागतात, धरणे भरतात, कालवे, जास्त पावसाने होणारी पिकांची नासाडी, येणारे महापूर, पावसाच्या भल्या-बुऱ्या आठवणी, अनुभव-प्रसंग मोठी माणसे मुलांसोबत वाटून घेतील. अनेक गोष्टी मुलांना समजतील. शिक्षण मुलांच्या जीवनाशी जोडले जाईल. पावसावर मुले आनंदाने निबंध लिहितील. गणितातील लिटर, मीटर असे मापन, कोन मोजणे... सगळ्या विषयांत हे शक्य आहे.
शरीराला विशिष्ट ठिकाणी जखम झाल्यास डॉक्टर उपचार करतात, गरज भासल्यास शस्रक्रिया करतात. अवयव काढून टाकत नाहीत. गृहपाठ बंद केल्यास शिक्षण शरीराचा एक अवयव काढून टाकल्यासारखे होईल! कोविड काळात मुलांच्या लिहिण्या-वाचण्याची गती मंदावलेली आहे, मुलांना लेखन सरावाची प्रचंड आवश्यकता आहे, हे इथे मुद्दाम लक्षात घ्यायला हवे. समजा, ‘आम्हांला शाळेचा वैताग येतो’ असे मुलांनी सांगितले तर आपण शाळा बंद करणार आहोत का? - शिक्षणात काही गोष्टी अनिवार्य करायला लागतात.
शिक्षकांनी मन लावून शिकवावे, ही मंत्रिमहोदयांची अपेक्षा रास्त आहे. मन लावून शिकवायला बहुसंख्य शिक्षक उत्सुक आहेत. पण मग अशैक्षणिक कामांचा भडिमार थांबवण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा. शिक्षकभरती बंद आहे. जिल्हा परिषद, महानगरपालिका शाळांतच नाही तर मराठी माध्यमाच्या खासगी अनुदानित शाळांमध्येही पुरेसे शिक्षक नाहीत. जे आहेत त्यांना सतत कसली ना कसली माहिती लिहून गुगल फॉर्ममध्ये पाठवावी लागते. प्रशासनाची माहितीची भूक भागतच नाही! शिक्षकांना वर्गात शिकवण्याची संधी मिळणे दुर्मीळ झाले आहे. सरकार, मंत्री किंवा अधिकारी बदलले की धोरण बदलते. ही धरसोडवृत्ती शिक्षणाला बाधक आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि या क्षेत्रातील तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करूनच शिक्षण क्षेत्रातले निर्णय विचारपूर्वक घेतले पाहिजेत. प्रश्न लाखो मुलांच्या शिक्षणाचा, भविष्याचा आणि आयुष्याचा असतो!
(लेखक सहायक शिक्षक, जि. प. शाळा, वीरगाव, अहमदनगर)