नोकरीबरोबर यापुढे लग्न नव्हे, लिव्ह इन रिलेशनशिप !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 08:42 AM2021-12-10T08:42:11+5:302021-12-10T08:42:37+5:30

यापुढे नकोशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यासाठी पिंक स्लिप देणाऱ्या बॉसची गरजच नाही, ते काम कदाचित बॉट्स करतील!

No longer married with a job, live in a relationship! | नोकरीबरोबर यापुढे लग्न नव्हे, लिव्ह इन रिलेशनशिप !

नोकरीबरोबर यापुढे लग्न नव्हे, लिव्ह इन रिलेशनशिप !

googlenewsNext

डॉ. भूषण केळकर

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ

आज  स्टीव्ही वंडर याच्या “ यू अँड मी- पार्ट टाइम लव्हर्स” या पंचवीस वर्षे जुन्या गाण्याची आठवण झाली ! बेटर डॉट कॉम नावाच्या  कंपनीचे सीईओ - विशाल गर्ग - यांनी तीन मिनिटांच्या झूम कॉलमध्ये एकदम ९०० लोकांना “ यू आर फायर्ड” असं सांगितलं !! - त्याचा व्हिडिओ लिक झाला, आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली. फारच टीका झाल्यावर विशाल गर्ग यांनी त्याबद्दल खेद व्यक्त केला ते सोडा, पण त्यामुळे मूळ घटनेचं गांभीर्य अजिबातच कमी होत नाही. अर्थात, आयटीच्या जगात यात फार नवीन  असं काही नाही हीच ती अमेरिकन “पिंक स्लिप”! अर्थात, त्यात  गुलाबी किंवा रम्य असं काहीही नसतंच. 

विशाल गर्ग त्यांच्या त्या झूम कॉलमध्ये म्हणतात, हे काम दुर्दैवाने मी दुसऱ्यांदा करतो आहे. पहिल्यांदा जेव्हा  लोकांना फायर करावं लागलं, तेव्हा मी रडलो होतो!!” केवळ तीन मिनिटांचा झूम इंपर्सनल- रुक्ष कॉल त्यातून आता ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या सुट्या आहेत आणि त्याच्या अगदी आधी लोकांना नोकरीवरून काढणं- याबद्दल खूपच तीव्र भावना आणिप्रतिक्रिया समाजमाध्यमांमध्ये व्यक्त झाल्या !  हा जमाना इन्स्टंट ग्राटीफिकेशनचा! “ मॅगीनूडल इफेक्ट” ! “श्रद्धा व सबुरी” यापेक्षा “आत्ता आणि लगेच” !! याच्या अतिरेकाचे हे अपरिहार्य परिणाम आहेत ! 

नोकरीसाठी निवड आणि नोकरीवरून काढणे या प्रक्रिया आता यंत्रंच करतील, माणसं नव्हेत!, युनिलिव्हर मल्टिनॅशनल कंपनीत जगभरातील हायरिंग हे ९० टक्के डिजिटली होतं !वॉल्वो ही कार मॅन्युफॅक्चरिंग करणारी कंपनी; तिथे  तर, उमेदवारांच्या मुलाखती गाडीनेच घेतल्या आणि बेल्जियममध्ये २०० इंजिनिअर्सची  नेमणूक केली होती! लोकांना नोकरीवरून फायर केलं जाणं, ही काही नवीन गोष्ट खचितच नाही ! जगभर, वर्षानुवर्षे आणि सबळ व्यावसायिक कारणांनी आजवर हे चालू आहे !!  परंतु त्याच्यामध्ये मानसशास्त्राचा एक महत्त्वाचा नियम वापरला जावा, असा निदान संकेत तरी आजवर होता. “स्तुती करताना अनेक लोकांसमोर करावी आणि दोष दिग्दर्शन करताना खासगीत करावं!’’ “बेटर डॉट कॉम” या कंपनीने लोकांना नोकरीरून काढलं ते धक्कादायक आहे, ते त्यात वापरल्या गेलेल्या पद्धतीमुळे ! ज्यामध्ये प्रेमाचा, सहानुभूतीचा लवलेशही नाही आणि उद्यापासून नोकरी नाही हे सांगणार कोण?- तर, यंत्र !!

अर्थात, हे फक्त आयटीत घडेल असं समजू नका ! ज्या ज्या क्षेत्रामध्ये ऑटोमेशन येईल त्या त्या सर्व क्षेत्रामध्ये पिंक स्लिप देण्याचं प्रमाण - आणि तेही काहीशा अमानुष पद्धतीने- वाढण्याची शक्यता आहे !! अनेक कंपन्यांमध्ये सतत काही ना काही प्रकारे मूल्यमापन होतच असतं, यात जे टिकत नाहीत,  त्यांना दूर करण्यावाचून कंपनीकडे काही पर्यायही नसतो. म्हणजे शिकाल तरच टिकाल हा नियम !! 
“वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम”च्या एका अहवालानुसार, सध्याच्या मनुष्यबळापैकी ४५ टक्के लोकांना त्यांच्या कौशल्यामध्ये सतत वृद्धी करत राहणं आणि नवीन शिकत राहणं अत्यावश्यक आहे !’’  निरंतर शिक्षण (कंटिन्यूअस लर्निंग) आणि बहुजिनसी/बहुशाखीय शिक्षण हे सतत करत राहिलं पाहिजे !! त्याला तरणोपाय नाही ! यापुढच्या काळात सर्व क्षेत्रात असणाऱ्या  “गिग इकॉनॉमी”मध्ये आणि कोविड नंतरच्या “न्यू नॉर्मल”मध्ये या सतत बदलत राहण्याला काहीही पर्याय  असणार नाही.

सध्या अनेक कंपन्यांमध्ये हायरिंगसाठी रोबोट वापरले जातात, तसे  पर्सनलाइज्ड बॉटस् कदाचित फायरिंगसाठी उद्या वापरले गेले तर, आश्चर्य वाटायला नको !! जी कामं अप्रिय आहेत किंवा मानवाला अवघड वाटतात ती “आऊटसोर्स” करण्याची सगळ्यात चांगली पद्धत म्हणजे तंत्रज्ञान, नाही का? पूर्वीच्या पदवीधरांचं कंपन्यांच्या बरोबर जणू लग्न व्हायचं- अनेकांच्या बाबतीत तर, ते जन्मभराचं नातं असे !  पुढच्या “न्यू नॉर्मल”मध्ये लोकांचे त्यांच्या कार्यक्षेत्राबरोबरचं नातं “लिव्ह-इन- रिलेशनशिप”मधलं - तात्पुरतंच असेल !! 
bhooshankelkar@hotmail.com

Web Title: No longer married with a job, live in a relationship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.