अटकाव करायला कुणी नाही!

By admin | Published: September 6, 2015 04:18 AM2015-09-06T04:18:22+5:302015-09-06T04:18:22+5:30

प्रसिद्ध बंडखोर कन्नड विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची त्यांच्या राहत्या घरात दिवसाढवळ्या हत्या केली गेली आणि कर्नाटकसह देशभरातील कला/सांस्कृतिक जीवन हादरून गेलं.

No one to stop! | अटकाव करायला कुणी नाही!

अटकाव करायला कुणी नाही!

Next

- संजय पवार

प्रसिद्ध बंडखोर कन्नड विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांची त्यांच्या राहत्या घरात दिवसाढवळ्या हत्या केली गेली आणि कर्नाटकसह देशभरातील कला/सांस्कृतिक जीवन हादरून गेलं. यापूर्वी महाराष्ट्रात झालेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध दक्षिण महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांवर, प्रदेशांवर केंद्रित केला असतानाच कर्नाटकात अशाच समविचारी पण अधिक आक्रमक अशा कलबुर्गी या विचारवंताची हत्या घडवली जाते. त्यानंतर पुढचे ‘टार्गेट’ही जाहीर केले जाते. त्यामुळे अशा विचार विरोधकांचे मनोधैर्य किती वाढलेय याची ही साक्ष आहे.

केंद्रात मोदी सरकार आल्यानंतर या मंडळींचे धैर्य वाढलेय. याचा केंद्र सरकार, भाजपाची राज्य सरकारे साफ इन्कार करतात. त्यावर राज्यात आणि केंद्रात ज्या पद्धतीने विरोधकांनी घेरायला हवं तसं घेरलेलं नाही. केंद्रात विरोधक अल्पमतात आहेत. त्यात प्रादेशिक पक्षांना आपली पापं झाकण्यासाठी केंद्राची चड्डी एका हाताने धरून ठेवणे गरजेचे आहे. काँगे्रसला विरोध करण्यापेक्षा राहुलबाबाचं नेतृत्व प्रस्थापित करण्यात अधिक रस. याच राहुलबाबांनी पुरोगामी महाराष्ट्रात ज्येष्ठ विचारवंत, कार्यकर्त्यांच्या दिवसाढवळ्या हत्या झाल्या तिकडे कधी लक्ष दिले नाही. पण संपूर्ण भारतातून फक्त ३0 विद्यार्थी जिथे शिकतात, त्या विद्यार्थ्यांच्या (त्या अर्थाने) सामान्य मागणीसाठी चालेलेल्या संपाला पाठिंबा द्यायला सदेह हजेरी लावली. तशी त्यांना ओंकारेश्वर पुलावर द्यावीशी वाटली नाही, यातच सगळं आलं.
यात परिस्थितीने एक असा पेच निर्माण केला आहे, की दाभोलकर हत्येच्या तपासासाठी ओरडणारे, पानसरेंच्या हत्येच्या वेळी सत्तेत आले. साहजिकच दाभोळकर हत्येप्रसंगी सत्तेत व पानसरे हत्येप्रसंगी विरोधात असलेले ‘झाली किनई फिट्टफाट’ म्हणत घोटाळ्याच्या फायली बाहेर पडणार नाहीत यावर लक्ष ठेवत बसलेत. बाकी विचारांची लढाई विचारानेच लढली पाहिजे, अशी खूनसत्रे चालू देणार नाही, गुन्हेगार कुठल्या पक्षाचा, संघटनेचा, किती मोठा याचा विचार केला जाणार नाही, पोलिसांच्या कामात हस्तक्षेप नाही (याचा उलट अर्थ ते हातावर हात ठेवून बसले असतील तरी त्यांना कामाला लागा, असेही सांगणार नाही?), फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. रेखाचित्रं प्रसिद्ध झालीत. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतलंय. लवकरच सूत्रधारांपर्यंत पोचतील, अशी सगळी आर. आर. पाटील यांची स्मृती जागवणारी विधानं इतकी तोंडपाठ झाली आहेत, की यातलं काहीही माध्यमांनी छापलं, दाखवलं तरी ती ‘ताजी बातमी’च असेल.
या दोन्ही हत्यांच्या संदर्भात ‘बारा मुल्कोंकी पुलीस उनको ढूँढ रही हैं’ असं किती टीम कार्यरत आहेत, हेही सांगितलं जातं. आपल्याकडे विशेष काही कारण नसताना आत्मिक समाधानासाठी जसे ‘सत्यनारायण’ घातले जातात तसा अधूनमधून धाडसत्र, धक्कादायक बातमी देत तपास रेंगाळत ठेवायची नामी क्लृप्ती म्हणजे तपास सीबीआयकडे द्यायचा !
स्वातंत्र्योत्तर काळापासून साधारण आणीबाणीपर्यंत राज्यातल्या एखाद्या प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार, असं म्हटलं की स्थानिक सरकारला तो आपला, आपल्या गृह खात्याचा पराभव, अपमान वाटायचा. विरोधकांनी फारच ताणले तर ‘सीआयडी’ चौकशी मंजूर होई. ती झाली तरी विरोधकांना तो विजय वाटे. इतक्या या यंत्रणा त्या काळी सक्षम होत्या. आताचे राज्यकर्ते वाटच बघत असतात कुणी सीबीआय, सुप्रीम कोर्टाची भाषा करतेय का! लगेच मागणी मान्य! विचारा आता त्यांनाच. त्यात केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असेल तर मग दुधात साखर. हा झाला भाग सरकारी जबाबदारीचा. पण बाकी सुबुद्ध नागरिक, संस्था, संघटना, राजकीय पक्ष, साहित्य, कला क्षेत्र इथली परिस्थिती काय आहे? दाभोलकर, पानसरे हे समाजवादी, कम्युनिस्ट तसेच हिंदू धर्म, इतिहास यांची चिकित्सा करून प्रबोधनाचे काम करणारे. त्यासाठी प्रसंगी कायदे बनविण्यासाठी भाग पाडणारे. दाभोलकरांची अंधश्रद्धा निर्मूलन समिती आजही महाराष्ट्रभर काम करते. त्यात बंगाली बाबांपासून दर्ग्यापर्यंत सर्वांची ‘प्रात्यक्षिका’सह पोलखोल केली तरीही संघ, भाजपासह सेनेने त्यांना हिंदूविरोधी ठरवलं.
शेवटी... आठवडाभरापूर्वी शीना बोरा, इंद्राणी मुखर्जी, तिचे तीन नवरे, तेवढीच मुले, मित्र यांच्या केससाठी मुंबई पोलीस आयुक्त दस्तुरखुद्द राकेश मारिया रोज २0/२0 तास चौकशी करताहेत. इंग्रजी माध्यमे, पेज थ्री सेलीब्रेटी त्यांच्या कौतुकात न्हाताहेत. त्यांचा बायोडेटा प्रसिद्ध होतो आहे. (मात्र त्यात २६/११ मध्ये शहीद झालेल्या अशोक कामटे यांच्या पत्नी विनिता कामटेंनी लिहिलेल्या ‘लास्ट बुलेट’ आणि हसन मुश्रीफ लिखित ‘हू किल्ड करकरे’मधील उतारे नाहीत!) एका घरगुती प्रकरणासाठी पोलीस दल रात्रीचा दिवस करतेय, पण विचारवंतांचे मारेकरी फक्त रेखाचित्रातच शोधताहेत! गुड गव्हर्नन्सवाले सरकार राज्यात व केंद्रात आहे. गृहखाते मुख्यमंत्र्यांकडे आहे. कैदी पळताहेत, पोलीस आत्महत्येला प्रवृत्त करताहेत, घोटाळेबाज खुलेआम फिरताहेत; दाभोलकर, पानसरे यांच्या पाठिराख्यांना, नातेवाइकांना आश्वासने मिळताहेत. बाकी समाज ‘विचारवंत’ गेला, आपलं थेट नुकसान काय, असं म्हणत वडीलधाऱ्यांच्या मृत्यूनंतर रेशन कार्डवरचं नाव कमी करून आणतो तसे दाभोलकर गेले, पानसरे गेले म्हणून टीक मार्क करून बसलाय.
या पार्श्वभूमीवर आजच (दि.४सप्टें.) बातमी आलीय. मातृभूमी या मल्याळी दैनिकात ‘रामायणावर’ स्तंभ चालू होता. तो संपादकांवर दबाव आणून बंद केला गेला. कारण हा स्तंभ ज्येष्ठ टीकाकार, भाष्यकार एम. एम. बशीर लिहीत होते. बशीर यांनाही धमक्या आल्यात. मुसलमान कसा काय रामायणावर भाष्य करतो? ही अशीच ठसठस अनेकांच्या मनात सुप्रसिद्ध चोप्रा प्रसिद्ध ‘महाभारत’ मालिकेच्या वेळी अनेकांच्या मनात होती. कारण महाभारत लिहीत होते प्रसिद्ध साहित्यिक, पटकथाकार डॉ. राही मासूम राजा! तेव्हा ती ठसठस मळमळ गिळली गेली. आता ती हत्यारी झाली आहे, मोकाट झाली आहे. अटकाव करायला कुणी नाही. कडवे उजवे मारेकरी होत असताना संयमित उजवे मूकसंमती देताहेत म्हटल्यावर पोलीस पथके, सीबीआय, अटकेचे निर्धार हे पाहून मोकाट फिरणारे मारेकरी हसून शोलेतल्या गब्बरप्रमाणे म्हणत असतील, ‘सूना है ठाकूरने हिजडोंकी फौज बनायी हैं!’ 

Web Title: No one to stop!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.