‘युद्ध नको, दबाव हवा’

By Admin | Published: September 27, 2016 05:24 AM2016-09-27T05:24:39+5:302016-09-27T05:24:39+5:30

केरळातील कोझीकोड येथे भरलेल्या भाजपाच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविषयी आणि पाकिस्तानला उद्देशून जे भाषण केले ते विवेक व संयमाच्या

'No war, no pressure on air' | ‘युद्ध नको, दबाव हवा’

‘युद्ध नको, दबाव हवा’

googlenewsNext

केरळातील कोझीकोड येथे भरलेल्या भाजपाच्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविषयी आणि पाकिस्तानला उद्देशून जे भाषण केले ते विवेक व संयमाच्या मर्यादा सांभाळणारे होते. मनात आणले तर आम्ही पाकिस्तानला धूळ चारू असे ते म्हणाले खरे, मात्र त्याचवेळी पाकिस्तान त्याच्या छुप्या हल्लेखोरांकडून भारतावर युद्ध लादू शकणार नाही हेही त्यांनी स्पष्ट केले. हे भाषण व रेडिओवर त्यांनी केलेली मन की बात या दोन्हींमधून उघड झालेली गोष्ट ही की भारताने पाकिस्तानशी करावयाच्या समोरासमोरच्या युद्धाचा पर्याय नाकारला आहे. जागतिक व क्षेत्रीय स्वरुपाच्या संघटनांत पाकिस्तानला एकाकी पाडण्याचा, अमेरिकेसारखे त्याचे मित्रदेश त्याच्यापासून दूर करण्याचा, भारत-पाक संघर्षातून चीनला वेगळे करण्याचा, जगातली मुस्लीम राष्ट्रे पाकिस्तानच्या बाजूने जाणार नाहीत याची व्यवस्था करण्याचा व प्रत्यक्ष पाकिस्तानच्या सरकारला त्याच्या लष्करापासून वेगळे राखून पाहाण्याचा व तशीच त्याच्याशी बोलणी करण्याचा, यासारखे अनेक पर्याय यापुढे भारत वापरणार आहे. त्याच वेळी बलुचिस्तानमधील जनतेने पाकिस्तानी अत्याचारांविरुद्ध चालविलेल्या उठावाला बळ देण्याचे आणि सिंधमधील जनतेवर पाकिस्तानच्या पंजाबी राज्यकर्त्या वर्गाने लादलेल्या जुलूमाविरुद्ध जगाच्या व्यासपीठावर बोलण्याचे व त्यालाही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष बळ देण्याचे धोरणही भारत यापुढे अवलंबिणार आहे. युद्ध करायचे नाही, मात्र शत्रूवर त्याला नमविता येण्याएवढा आंतरराष्ट्रीय व अंतर्गत दबाव उभा करायचा हे या धोरणाचे मुख्य सूत्र आहे. भाजपामधील व माध्यमांतील काही अति शहाण्या लोकांनी सिंधू व भारतातून पाकिस्तानात जाणाऱ्या इतर नद्यांचे पाणी अडवून त्याला कोरडे करण्याचा व नमविण्याचा एक पर्याय या काळातच पुढे केला. मात्र तो ऐकून दुर्लक्षिण्यापलीकडे मोदींच्या सरकारने फारसे काही केले नाही ही बाबही येथे महत्त्वाची व स्वागतार्ह ठरणारी आहे. असे उपाय आपल्यावर उलटणारे असतात ही बाब या शहाण्या सूचकांना फारशी कळत नाही हे यातले वास्तव. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या वेळी भाक्रा-नांगलवर विमान हल्ले चढवून ते धरण फोडण्याची भाषा पाकिस्तानी लष्कराच्या सेनापतींनी वापरली होती ही गोष्ट या मंडळीने येथे आठवावी. आताच्या पाकजवळ अणुबॉम्बसह अतिशय शक्तीशाली क्षेपणास्त्रे आहेत. तेव्हा त्याला जी गोष्ट विमान हल्ल्यांनी करणे कदाचित जमले असते ती आता त्याला अणुयंत्रणेचे एक बटन दाबूनही करता येणारी आहे. तसे झाले तर पंजाब, हरयाणा, हिमाचल आणि राजस्थानवर कोणता अनवस्था प्रसंग गुदरेल याची कल्पना या शहाण्यांनी केली नसावी. (काही दिवसांपूर्वी दूरचित्रवाहिनीवर बोलताना लष्कराच्या एका माजी अधिकाऱ्याने, ‘टाकूनच द्या पाकिस्तानवर एक बॉम्ब आणि त्याने आपल्यावर बॉम्ब टाकले तर मरू द्या आपलीही पाच-दहा कोटी माणसे. मात्र त्यामुळे ही आताची कटकट कायमची थांबेल’ असे मूर्ख उद््गार काढले होते. एकेकाळी अशी भाषा चीनचा माओ त्से तुंगही वापरायचा. ‘अणुयुद्धात आमची तीस कोटी माणसे मेली तरी आम्ही सत्तर कोटी शिल्लकच राहू’ अशी विषवाणी तो बोलायचा.) तात्पर्य, या अतिरेकी चिथावणीखोरांच्या वक्तव्यांची दखल न घेता ‘युद्ध नको, दबाव हवा’ ही भाषा मोदींनी वापरली आहे व तीच खऱ्या शहाणपणाचीही आहे. मात्र त्याच वेळी सीमेवरच्या पहाऱ्यांत वाढ करणे, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून कोणालाही भारतीय हद्दीत पाय ठेवता येणार नाही याचा चोख बंदोबस्त करणे आणि साऱ्या सैन्याला सदैव तत्पर राहण्याचे निर्देश देणे याही त्यांच्या भाषणातील बाबी महत्त्वाच्या आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेत पाकिस्तानची बाजू त्या देशाचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी नुकतीच मांडली. तिचे खोटेपण जगाच्या लक्षात आले असल्याचे त्याच्या प्रतिक्रियेवरूनही साऱ्यांना समजले. शरीफ यांना भारताच्या बाजूने दिले जाणारे उत्तर त्यांचे उरलेसुरले वाभाडे काढणारे व पाकिस्तानचा हल्लेखोर चेहरा उघड करणारे असेल यात शंका नाही. सारांश, सरकार सावध आहे आणि त्याने आपल्या पुढल्या धोरणाची निश्चिती केली आहे. या धोरणात युद्ध नाही मात्र पाकिस्तानच्या युद्धखोरीला आळा घालणारी परिस्थिती निर्माण करणे नक्कीच आहे. अमेरिकेने पाकिस्तानचे समर्थन आता थांबविलेही आहे. काळजीची बाब रशियाची आहे. एकेकाळचा भारताचा हा निकटचा स्नेही आता पाकिस्तानबरोबर लष्कराच्या संयुक्त कवायती करण्यात गुंतला आहे. त्याला त्याच्या भारतासोबत असलेल्या दीर्घकालीन मैत्रीचे स्मरण करून देणे गरजेचे आहे. जगातली प्रमुख मुस्लीम राष्ट्रेही पाकिस्तानच्या बाजूने जाताना न दिसणे हा भारताच्या भूमिकेचा मोठाच विजय मानावा असा भाग आहे. अशा वेळी सरकारी धोरणाला फाटे फोडण्याची, त्याला युद्धखोरीची चिथावणी देण्याची, त्याच्या समर्थकांचीच खोड आता थांबली पाहिजे. त्याच वेळी काश्मीरात शांतता कायम होणे व भारतात धार्मिक तणाव उत्पन्न होणार नाहीत याची काळजी घेणे आवश्यक आहे. एकसंध व एकात्म राष्ट्र हेच पाकिस्तानसारख्या शत्रूला समजणारे आपले खरे उत्तर राहणार आहे.

Web Title: 'No war, no pressure on air'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.