भारत-पाकसाठी ' नोबेल' धडा
By admin | Published: October 13, 2014 03:37 AM2014-10-13T03:37:40+5:302014-10-13T03:37:40+5:30
नोबेल पुरस्कार समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमधील शांततेसाठीचा पुरस्कार सर्वाधिक वादग्रस्त आहे हे सर्वविदितच आहे.
नोबेल पुरस्कार समितीतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमधील शांततेसाठीचा पुरस्कार सर्वाधिक वादग्रस्त आहे हे सर्वविदितच आहे. समितीने केलेल्या निवडीवर अनेकदा टीका झाली आहे. शांतता आणि अहिंसेचे महान प्रेषित महात्मा गांधी यांना सन्मानित करण्यास नोबेल समितीने सातत्याने दिलेला नकार हा सदैव टीकेचा विषय आहे. गांधीजींना नोबेल पुरस्कार का दिला नाही, याची कारणेही मोठी मनोरंजक आहेत. गांधीजी हयात असताना तब्बल पाचवेळा त्यांच्या नावाची नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली होती; पण निवड समितीने ती स्वीकारली नाही. त्यांच्या भीषण हत्येनंतर समितीने त्यांचा सन्मान करण्याबाबत विचार केला; पण निर्णय घेतला नाही. उलट योग्य उमेदवार नाही म्हणून त्या वर्षी कुणालाही हा पुरस्कार दिला गेला नाही. असे का व्हावे? महात्मा गांधींना नोबेल पुरस्कार न देण्यामागचे कारण शोधणे फारसे कठीण नाही. नोबेल शांतता पुरस्काराचा वापर पाश्चिमात्य जगाकडून बऱ्याचदा राजकीय इशारा देण्याकरिता केला गेला आहे. गांधीजींनी पाश्चिमात्य साम्राज्यवादी शक्तींविरुद्ध लढा चालविला होता. ते गोळीबार करीत नव्हते म्हणून काय झाले? सत्य आणि अहिंसा व असहकाराची चळवळ या जोरावर त्यांनी लक्षावधी नि:शस्त्र लोकांची फौज उभी केली होती. या लोकांनी साम्राज्यवादी शक्तींना हुसकावून लावले. अशी मानहानी करणाऱ्याचा पाश्चिमात्य जग स्वत:हून कसा सत्कार करील? अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामासारख्यांनी रक्तरंजित युद्धे छेडली, तरी त्यांना हा पुरस्कार दिला गेला, गांधीजींना नाही.
पण यंदाचा पुरस्कार भारताचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची कन्या मलाला युसूफझाई यांना विभागून दिला गेला. यंदाच्या विजेत्यांना दिलेल्या मानपत्रात समितीने गांधीजींच्या शांततेच्या लढ्याच्या पद्धतींचा उल्लेख केला आहे. भारत आणि पाकिस्तान आणि हिंदू व इस्लाम या दोन धर्मांचाही संदर्भ त्यात आहे. असला संदर्भ दिल्याबद्दल आक्षेपही घेण्यात आले आहेत. बालशिक्षण किंवा बालमजुरीच्या विरोधासारख्या कामात धर्म आणण्याची काही गरज नव्हती, अशा भावना व्यक्त झाल्या. आपण याबद्दल काय करू शकतो! एक तर नापसंती व्यक्त करू शकतो किंवा पुरस्कार देण्यामागच्या संदेशातून धडा शिकू शकतो.
भारताची फाळणी होऊन भारत आणि पाकिस्तान असे दोन देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाले, त्या गोष्टीला आता ६७ वर्षे उलटली. दोन्ही देशांनी स्वतंत्र मार्ग चोखाळले; पण चांगले शेजारी म्हणून दोघे शांततेने राहू शकले नाहीत. शेजाऱ्यांमध्ये भांडणे होतात, ती मिटत नाहीत आणि भांडणांना हिंसक वळण लागते तेव्हा ती चिंताजनक बाब बनते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सारख्या कुरबुरी सुरू असतात म्हणून जगाला चिंता वाटणे साहजिक आहे कारण दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत. भारताशी असलेल्या वैरामुळे पाकला जिहादी सेना उभी करण्याचे एक कारण मिळाले आहे. या जिहादी सेनेपासून जागतिक शांततेला धोका आहे, याच शक्तींकडून झालेल्या हल्ल्यातून मलाला बचावली आहे.
कैलाश सत्यार्थी किंवा मलाला ज्या देशांत राहतात, त्या देशांच्या सरकारचे हे दोघे लाडके नाहीत. दर वर्षी अनेकांना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. सत्यार्थी गेली ३५ वर्षे बालमजुरीच्या विरोधात काम करीत आहेत. सत्यार्थी यांना ‘पद्मश्री’नेही सन्मानित करण्यात आलेले नाही. परिस्थिती इतकी विचित्र आहे, की सत्यार्थी यांच्या नावाची घोषणा झाली तेव्हा अनेकांना प्रश्न पडला. हे सत्यार्थी कोण? १७ वर्षे वयाच्या हिंमतवान मलालाबद्दल तर बोलायचीच सोय नाही. तिच्याच देशात लोक तिला परकी मानतात. अशा परिस्थितीत पाश्चात्त्य जग या दोघांना सर्वोच्च नोबेल पुरस्काराने सन्मानित करते तेव्हा हे जग भारत आणि पाकिस्तानलाही एक संदेश देते. तुम्ही जबाबदारीने का वागत नाही? तुमचे नागरिक व्यक्तिश: महान काम करीत असताना एक देश म्हणून तुम्ही परिपक्वपणे का वागत नाही? केवळ सत्यार्थी किंवा मलाला यांच्यामुळे पाश्चात्त्य जगाला हा संदेश पाठवावा, असे वाटले नाही. दोन्ही देशांतील कुशल बुद्धिवंतांनी पाश्चिमात्य जगाला मोठे योगदान दिले आहे, म्हणूनही त्यांना असा संदेश देणे जरूरी वाटले.
हिंदू-मुस्लिम सहकार्य हे पुरातन भारतीय संस्कृतीचे सार आहे. खूप राजे-महाराजे होऊन गेले; पण हिंदू आणि मुसलमान बंधूभावाने एकत्र राहिले. इथला वारसा समृद्ध केला. ब्रिटिश राजवटीत मात्र गडबड झाली. सत्ता गाजवण्यासाठी या दोन समाजात फूट पाडण्याचे उद्योग सुरू झाले. फूट पाडा आणि राज्य करा, याच मानसिकतेची परिणती पुढे फाळणीत झाली. या घटनेला बरीच वर्षे होऊन गेली; पण दोन्ही धर्मांना मिळणारा संदेश ताज्या घडामोडींच्या संदर्भात महत्त्वाचा आहे. संदेश स्पष्ट आहे. सुखा-समाधानाने, बंधूभावाने राहा.
भारत आणि पाकिस्तान सीमेवर दोन्ही बाजूंकडून धुमश्चक्री सुरू असताना या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली, हे एकप्रकारे चांगलेच झाले. गेली सहा दशके दोन्ही बाजूंकडून सीमेवर गोळीबार चालत आला आहे, त्याचा काहीही उपयोग होत नाही. गोळीबाराच्या फैरी झाडल्या जातात, आगळीक केली जाते, कुरापत काढण्यात येते आणि एकमेकांना दोष दिला जातो. १९७१ च्या युद्धात पूर्व आणि पश्चिम पाकिस्तान वेगळा झाला. हा अवमान पाकिस्तानचे लष्कर विसरले नाही म्हणून ते भारताविरुद्ध असल्या कुरापती चालू ठेवते. याचा लष्करीदृष्ट्या किंवा मुत्सद्देगिरीमध्ये पाकिस्तानला काही फायदा मिळतो, अशातला भाग नाही. मानसिक समाधान म्हणून पाकिस्तान असे वागतो, हे दुर्दैवी आहे. भारत एवढा जोमदार देश आहे, की पाकिस्तानच्या असल्या छेडछाडीचा संताप येतो; पण त्या पलीकडे भारताला काही फरक पडत नाही. अलीकडे तर हे नेहमीचेच झाले आहे; पण पाकिस्तानच्या अशा वागण्याने त्याचेच नुकसान होत आहे आणि पाकिस्तानच कमजोर होत आहे.
नोबेल पुरस्कार वितरण समारंभाला नवाज शरीफ आणि नरेंद्र मोदी या दोन्ही पंतप्रधानांनी उपस्थित राहावे, असे मनोगत मलालाने बोलून दाखविले. ही एका छोट्या मुलीची इच्छा आहे, असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ती केवळ मलालाची इच्छा नाही, तर या उपखंडातील बालकांची ती इच्छा आहे. मतभेद कायम असतानाही आपले नेते एकत्र आले तर निर्माण होणाऱ्या शांततेमुळे खूप फायदे आहेत. युद्धामुळे खूप तोटे होत असतात. बालके उद्याचे भविष्य आहेत. दोन देशांनी या दोघा पुरस्कार विजेत्यांच्या भावना समजून घेतल्या तर या नोबेल पुरस्काराला व्यापक अर्थ प्राप्त होईल.