नोबेल, एआय आणि धोका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2024 08:23 AM2024-10-10T08:23:28+5:302024-10-10T08:23:28+5:30

जेफ्री हिंटनसारख्या पितामहांनी दिलेला इशारा त्यामुळेच महत्त्वाचा!

nobel prize artificial intelligence and jeopardy | नोबेल, एआय आणि धोका!

नोबेल, एआय आणि धोका!

जगप्रसिद्ध नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांनी २ ऑगस्ट १९३९ रोजी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँकलिन रूझवेल्ट यांना एक पत्र लिहिले होते. हिटलरचा नाझी जर्मनी तेव्हा अणुबॉम्ब मिळवण्याच्या प्रयत्नात होता. तत्पूर्वी अमेरिकेने हे तंत्रज्ञान हस्तगत करण्याची गरज त्या पत्रात व्यक्त केली होती. त्यानुसार अमेरिकेने ‘प्रोजेक्ट मॅनहटन’ सुरू केला आणि त्यातून जगातील पहिल्या अणुबॉम्बची निर्मिती झाली. 

अमेरिकेने ६ ऑगस्ट १९४५ साली जपानच्या हिरोशिमा आणि ९ ऑगस्ट रोजी नागासाकी शहरांवर हे बॉम्ब टाकले आणि ११ ऑगस्ट रोजी दुसऱ्या महायुद्धाची सांगता झाली. पण जगात अण्वस्त्र स्पर्धा सुरू होऊन संपूर्ण पृथ्वीच्या विनाशाची शक्यता निर्माण झाली. त्यानंतर आइनस्टाइन यांना त्यांच्याच त्या पत्राबद्दल पश्चाताप होऊ लागला. पुढे १९५४ साली नोबेलविजेते रसायनशास्त्रज्ञ लिनस पॉलिंग यांच्याशी गप्पा मारताना आइनस्टाइन यांनी म्हटले होते की, रूझवेल्ट यांना लिहिलेले ते पत्र म्हणजे त्यांच्या आयुष्यातील मोठी चूक होती! इतिहासाची पुनरावृत्ती होते म्हणतात. आता पुन्हा एकदा तसेच काहीसे घडले आहे. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता) क्षेत्राची पायाभरणी करणाऱ्या जॉन हॉपफिल्ड आणि जेफ्री हिंटन या शास्त्रज्ञांना नुकतेच भौतिकशास्त्रातील नोबेल मिळाले. त्यांनी एआय क्षेत्रात मशिन लर्निंग आणि आर्टिफिशियल न्यूरल नेटवर्क यावर संशोधन केले. मात्र, याच वेळी हिंटन यांनी एआयमुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या धोक्यांकडे जगाचे लक्ष वेधले. औद्योगिक क्रांतीने जसे जग बदलले, तसेच ते एआयमुळेही बदलेल. मात्र, या गोष्टी मानवी नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. त्याने मानवजातीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असे हिंटन यांनी म्हटले आहे. हिंटन यांनी गुगलबरोबर ‘गुगल ब्रेन एआय’ विकसित करण्यासाठी काम केले होते. मात्र, नंतर त्यांनी ते काम थांबवले. एआयचा गैरवापर होण्याची शक्यता लक्षात घेता मी यासंदर्भात केलेल्या कामाचा मला काही वेळा खेद वाटतो, असे हिंटन म्हणाले होते. जन्माला आल्यापासूनच माणूस त्याच्या ज्ञानेंद्रियांद्वारे सभोवतालच्या वातावरणाची माहिती संकलित करून ती मेंदूत साठवून ठेवत असतो. त्यातून तो विविध परिस्थितीत कसे वर्तन करायचे, हे ठरवत असतो. हे निर्णय घेताना त्याने वर्षानुवर्षे साठवलेल्या माहितीचा, घेतलेल्या अनुभवांचा फायदा होत असतो. 

आता संगणकाला अशीच माहिती पुरवली जाते. विविध प्रश्नांना कसा प्रतिसाद द्यायचा हे शिकवले जाते. त्यातून यंत्रे मानवाप्रमाणे निर्णय घेऊन प्रतिसाद देऊ शकतात. यंत्रांना मानवाप्रमाणे विचार करून प्रतिसाद देण्यास शिकवणे म्हणजेच त्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रदान करणे. वास्तविक एआयमुळे सध्या अनेक क्षेत्रांत मदत होत आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा कामे अधिक वेगाने आणि अचूकतेने होत आहेत. एआयमुळे अनेकांच्या नोकऱ्या जातील, ही भीती गेल्या काही वर्षांपसून व्यक्त केली जात होतीच. ‘चॅटजीपीटी’सारखी साधने आल्यानंतर तो धोका आणखीच गडद बनला आहे. मात्र, आता हे तंत्रज्ञान केवळ एवढ्यावरच थांबलेले नाही. यंत्रे स्वत: विचार करून नवीन माहिती आत्मसात करू शकतात. त्यावर आधारित कृती करू शकतात. त्यातून ही यंत्रे भविष्यात मानवी क्षमतेच्या पलीकडे जाऊन स्वतंत्रपणे काम करू लागतील. भविष्यात कदाचित यंत्रे मानवाला जुमानेनाशी होतील. त्यातून अखंड मानवजातीच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न होऊ शकेल, असा इशारा आता 

एआय क्षेत्रात काम करणारे शास्त्रज्ञच देत आहेत. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही त्याबाबत नुकताच धोका व्यक्त केला आहे. हा धोका विविध क्षेत्रांमध्ये खरा होत असल्याचे संकेत मिळत आहेत. एआय तंत्रज्ञान वापरून डीपफेक म्हणजे एखाद्याच्या खोट्या प्रतिमा बनवून त्या प्रसारित केल्याचे प्रकार वाढत आहेत. एआय अल्गोरिदम्सच्या मदतीने असे डीपफेक तयार करून समाजमनावर व्यापक परिणाम घडवणे, लोकांचे मतपरिवर्तन करणे, निवडणुकांमध्ये गैरप्रकार करणे हेदेखील शक्य होऊ शकते. चीनसारखे देश ‘फेशियल रेकग्निशन’ तंत्रज्ञान वापरून पोलिसी राज्य व्यवस्था निर्माण करू पाहताहेत. वाईट हेतूने प्ररित ‘एआय अल्गोरिदम्स’मुळे शेअर बाजारात आणि आर्थिक क्षेत्रात मोठे नुकसान होऊ शकते. इतकेच नव्हे तर भविष्यात एआयचा वापर करून स्वयंचलित शस्त्रास्त्रे बनवली जाण्याचा धोका आहे. यंत्रमानवांसारखी ही शस्त्रे मानवी नियंत्रणाबाहेर जाऊन मोठा हिंसाचार घडवू शकतात. त्यामुळे आज एआय क्षेत्रात काम करणारे अनेक तज्ज्ञ या तंत्रज्ञांनाचा पुढील विकास थांबवण्याचा सल्ला देत आहेत. जेफ्री हिंटनसारख्या पितामहांनी दिलेला इशारा त्यामुळेच महत्त्वाचा!
 

Web Title: nobel prize artificial intelligence and jeopardy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.