सौहार्द, शांतता कुणाला खुपते आहे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 05:24 AM2018-03-22T05:24:50+5:302018-03-22T05:24:50+5:30
अहमदनगर येथे कुरिअरमार्फत पाठविल्या जात असलेल्या रेडिओसदृश वस्तूचा स्फोट झाला. हा स्फोट ‘क्रूड’ बॉम्बचा होता हे निष्पन्न झाल्याने हा घातपाताचा कट होता हे लक्षात येते. सर्वात गंभीर बाब म्हणजे ही भेट ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांच्या नावाने पाठविली जात होती.
- सुधीर लंके
अहमदनगर येथे कुरिअरमार्फत पाठविल्या जात असलेल्या रेडिओसदृश वस्तूचा स्फोट झाला. हा स्फोट ‘क्रूड’ बॉम्बचा होता हे निष्पन्न झाल्याने हा घातपाताचा कट होता हे लक्षात येते. सर्वात गंभीर बाब म्हणजे ही भेट ‘सरहद’ संस्थेचे संजय नहार यांच्या नावाने पाठविली जात होती. त्यामुळे हा त्यांच्याच घातपाताचा कट होता हा प्राथमिक निष्कर्ष निघतो. राज्यात नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे या सामाजिक कार्यकर्त्यांची हत्या झाली. त्या प्रकरणांचा उलगडा आपली पोलीस यंत्रणा अद्याप करु शकलेली नाही. या साखळीत आणखी कुणा कार्यकर्त्याचे अथवा सामान्य माणसाचेही नाव यावे हा राज्यावरील आणखी एक कलंक ठरेल.
अगोदर पंजाब आणि त्यानंतर काश्मीरच्या शांततेसाठी आयुष्य वाहून घेतलेल्या संजय नहार यांच्यासाठी कुणी ‘बॉम्ब’ची भेट पाठवावी ही बाब अनाकलनीय व यातनादायीही आहे. जेव्हा सत्तर, ऐंशीच्या दशकात पंजाब खलिस्तानी चळवळीत हिंसाचाराने धगधगत होता तेव्हा नहार यांनी पंजाबच्या शांततेसाठी शांतिमार्च काढला. तेथे जाऊन तरुणांशी संवाद साधला. त्यांना राष्टÑवादासाठी प्रवृत्त केले. पंजाब शांत झाला, तेव्हा त्यांनी काश्मीरच्या शांततेसाठी प्रयत्न सुरु केले. त्यासाठीच ‘सरहद’ नावाची संस्था सुरू केली. काश्मीरच्या मुलांना व तरुणांना मुख्य प्रवाहात सामील करण्यासाठी ते सतत आग्रही आहेत. या मुलांना त्यांनी संपूर्ण देश दाखविला, शिकविले, पुनर्वसन केले. स्वत:च्या शाळेत दाखल करुन घेतले. देशातील पत्रकारांनाही काश्मीरच्या समस्या आवर्जून दाखविल्या. पुणे-काश्मीर फ्रेंडशीप, ‘हिंदू पंडित- काश्मिरी मुस्लीम’ असे फोरम तयार केले. महाराष्टÑ व पंजाब यांच्यात सांस्कृतिक आदानप्रदान वाढविणारे घुमान हे महत्त्वाचे केंद्र पंजाबमध्ये आहे. घुमान ही संत नामदेव यांची कर्मभूमी. तेथे ८८ वे मराठी साहित्य संमेलन व्हावे ही कल्पना व त्यासाठीचे परिश्रमही त्यांचेच.
सौहार्द व शांततेसाठी नहार आग्रही असताना त्यांना ही स्फोटके कोण पाठवू इच्छिते आहे? नहार यांच्या नावाने हे जे कुरिअर जाणार होते ते अल्पसंख्यक समाजाच्या मुलीच्या नावाने आहे. अर्थात हे नाव बनावट असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे या बनावट चेहऱ्यामागील खरा चेहरा कुणाचा आहे?
पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळायला हवे. घटनेनंतर पोलिसांनी या मुलीच्या नावासह स्फोटकांसोबत लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकूर माध्यमांसाठी खुला केला. वास्तविकत: अशा घटनांत सामाजिक व धार्मिक तेढ निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी काही पथ्ये पाळायची असतात. जे नावच बनावट आहे ते उघड करण्याची पोलिसांनीही इतकी घाई का केली? कारण त्यातून लगेचच घटनांना जात, धर्माचे कंगोरे प्राप्त होतात. नगर शहरही या घटनेमुळे चर्चेत आले आहे. घातपाती कारवायांचे मूळ नगरपर्यंत कसे पोहोचले? याला काही राजकीय संदर्भ आहेत का? ही कृती करणाºयाला पुणे अशांत करायचे होते की नगर? अशा अनेक प्रश्नांची मालिका या घटनेने निर्र्माण केली आहे. पोलीस मुळापर्यंत पोहोचून काय सत्य उजेडात आणणार याची राज्याला प्रतीक्षा राहील.