असंतुष्ट आत्म्याचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 04:18 AM2018-07-02T04:18:10+5:302018-07-02T04:18:34+5:30
हरदन हळ्ळी डी. देवेगौडा हे केवळ नशिबाने देशाच्या पंतप्रधानपदावर आलेले व एक वर्ष त्यावर टिकलेले आहेत. मान्यता, पात्रता आणि जनाधार यातील काहीएक बळ पाठीशी नसताना एवढे मोठे पद मिळूनही ते असंतुष्ट ते असंतुष्टच राहिले आहेत.
हरदन हळ्ळी डी. देवेगौडा हे केवळ नशिबाने देशाच्या पंतप्रधानपदावर आलेले व एक वर्ष त्यावर टिकलेले आहेत. मान्यता, पात्रता आणि जनाधार यातील काहीएक बळ पाठीशी नसताना एवढे मोठे पद मिळूनही ते असंतुष्ट ते असंतुष्टच राहिले आहेत. पंतप्रधानपद सोडताना त्यांनी केलेले ‘पुन: कधी तरी या पदावर येऊ’ हे उद्गारही आजवर तसेच राहिले आहेत. कर्नाटक या त्यांच्या राज्यातही त्यांना त्यांचा पक्ष जेमतेम तिसऱ्या क्रमांकावर परवा राखता आला आणि काँग्रेसच्या ८० आमदारांच्या भरवशावर आपले चिरंजीव कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदावर बसविता आले. त्या राज्यात काँग्रेस हा सत्तेतील मोठा सहभागी पक्ष असल्याने त्याचे सरकारवर वर्चस्व राहणे स्वाभाविक आहे. पण देवेगौडांचे असंतुष्ट मन त्यावर रुष्ट आहे. त्यांना राज्याचे सारे अधिकार त्यांच्या पुत्राच्या हाती एकवटलेले हवे आहेत. स्वत: देवेगौडांचे केंद्रातील मंत्रिमंडळ अनेक पक्षांचे होते व तेथे त्यांना तडजोडी कराव्याच लागल्या. मात्र मी केले ते पुत्राला करावे लागू नये ही त्यांची जिद्द आहे व त्याचपायी त्यांचे आताचे आकांडतांडव सुरू आहे. २०१९ च्या निवडणुकांसाठी काँग्रेससह सगळे विरोधी पक्ष एकत्र येण्याची शक्यता दिसत असताना व त्यासाठी देशात चर्चा सुरू असताना ‘असे ऐक्य घडण्याची शक्यता फारशी नसल्याचा’ सूर देवेगौडांच्या असंतुष्ट आत्म्याने काढला आहे. त्यामागे त्यांची निराशा व नव्या राजकारणात त्यांना महत्त्वाचे स्थान असणार नाही, याची जाणीव आहे. हे देवेगौडा स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणारे असले तरी भाजपच्या एकारलेल्या राजकारणावर त्यांनी टीका केल्याचे कधी दिसले नाही. अशावेळी धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र येण्याच्या मुहूर्तावर त्यांनी असा बदसूर काढणे हे त्यांच्या वयाला व अनुभवाला न शोभणारे आहे. त्यांच्या पक्षासाठी काँग्रेसने केलेला त्याग दिसत असतानाही त्यांनी असे म्हणावे यात कृतघ्नपणाही आहेच. देवेगौडांचे वय व राजकारणातील त्यांचा अनुभव लक्षात घेता, अशा राष्ट्रीय ऐक्यासाठी त्यांनीच खरे तर पुढाकार घ्यायचा. त्यासाठी देशातील धर्मनिरपेक्ष शक्तींना भेटून त्यांना एकत्र आणण्यासाठी आपली प्रतिष्ठा व कस पणाला लावायचा. परंतु ‘मी नाही तर काहीच नाही’ अशी वृत्ती असलेले जे महाभाग राजकारणात असतात त्यामधील ते एक आहेत. त्यामुळे देशात धर्मनिरपेक्ष शक्ती एकत्र येणार नाहीत, असे वाक्य त्यांनी उच्चारले आहे. उत्तर प्रदेशात भाजपचा झालेला पराभव त्यांनी पाहिला आहे. राजस्थानातील पराभवही त्यांच्या ध्यानात आहे. मेघालय आणि गोव्यात भाजपने आपले बहुमत गमावले आणि केंद्रातील स्वबळावरची सत्ताही घालविली. देशात झालेल्या ११ पोटनिवडणुकांपैकी १० जागांवर भाजपला पराभव पाहावा लागला. खुद्द कर्नाटकातही त्यांच्या मुलाचे सरकार सत्तारूढ व्हावे अशी सारी स्थिती डोळ्यासमोर असताना देवेगौडांना निराशाच दिसत असेल तर त्यांचे इरादेच संशयास्पदच होतात आणि त्यांना नव्या राजकारणात जास्तीचे काही हवे असल्याचे ते संकेत देतात, अशी माणसे संघटित शक्तीत निरुपयोगीच नव्हे तर उपद्रवी ठरतात. त्यांचे भाजपशी आतून सूत असल्याचाही संशय यातून व्यक्त होतो. वास्तव हे की देशात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस जवळ येत आहेत. उत्तर प्रदेशात मायावती, अखिलेश व राहुल जवळ आले आहेत. बिहारमध्ये लालूप्रसादांचा पक्ष काँग्रेससोबत आहे. काश्मिरात फारुख अब्दुल्ला व राहुल एकत्र आले आहेत. पंजाबात काँग्रेस सत्तेवर आहे, डाव्यांनी काँग्रेससोबत राहण्याचे ठरविले आहे, अशा वेळी एखाददुसरा पक्ष वा गट आपले भांडे वेगळे वाजवीत असेल तर त्याला काही तरी द्यायचे व शांत करायचे असते. ते देऊन देवेगौडांना शांत केलेही जाईल. पण ज्या काळात साºयांनी ऐक्याची व सामर्थ्याची भाषा बोलायची त्या काळात असली अवसानघातकी भाषा केवळ दुर्दैवीच नाही तर निंद्य म्हणावी, अशीही आहे. त्यावर त्यांचे चिरंजीव काही बोलतील वा कर्नाटकातील काँग्रेस पक्ष आपली प्रतिक्रिया देईलच. पण तशा प्रतिक्रियांची गरज अशा म्हाताºया पुढाºयांनी निर्माण करणे गरजेचे आहे काय, हा खरा प्रश्न आहे.