मुंबईतले उत्तर भारतीय उद्धव, राज यांना स्वीकारतील का?
By संदीप प्रधान | Published: December 5, 2018 09:30 AM2018-12-05T09:30:04+5:302018-12-05T09:35:00+5:30
राजकारणात वास्तवाची जाणीव योग्य वेळी होणे हे कधीही उत्तम. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अशीच योग्य वेळी राजकीय वास्तवाची जाणीव झाली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.
राजकारणात वास्तवाची जाणीव योग्य वेळी होणे हे कधीही उत्तम. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना अशीच योग्य वेळी राजकीय वास्तवाची जाणीव झाली आहे, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेचे गळ्यात गळे होते. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या मिशन १५० ने युतीमध्ये बिब्बा घातला आणि युती तुटली. शिवसेनेनी भाजपाच्या दगाबाजी विरुद्ध गळा काढून मराठी व्होटबँकला आपल्या मागे एकवटण्याचा प्रयत्न केला. तिकडे भाजपाने महाराष्ट्रातील बहुतांश शहरात परराज्यातून स्थलांतरित झालेल्या उत्तर भारतीय, बिहारी वगैरेंना मोदींच्या करिष्म्यामुळे व ‘अच्छे दिन’चे लॉलीपॉप दाखवून मतपेटीत बंद केले. याचा परिणाम असा झाला की, शिवसेनेचे नाक असलेल्या मुंबईत भाजपाचे १५ तर शिवसेनेचे १४ आमदार निवडून आले. त्यामुळे आता मुंबईत ‘आवाज कुणाचा’ तर आमचाच, अशा आरोळ्या किरीट सोमैया, आशिष शेलार वगैरे मंडळी महापालिका निवडणुकीपूर्वी ठोकू लागले. महापालिक निवडणुकीत दुपारपर्यंत मराठी मतांमुळे शिवसेनेचे पारडे जड दिसत असताना अचानक परप्रांतीय मतदारांनी अनेक ठिकाणी रांगा लावून मते दिल्याने जेमतेम ३१ जागांवर असलेल्या भाजपाने ८२ जागा प्राप्त केल्या आणि ८४ जागा स्वबळावर मिळवणाऱ्या शिवसेनेच्या तोंडाला फेस आणला. समजा भाजपाने एक जरी जागा शिवसेनेपेक्षा जास्त मिळवली असती तर शिवसेनेला ‘नकटे मामू’ बनून फिरावे लागले असते. मनसेत फूट पाडून शिवसेनेला आपल्या अंगी चंद्रबळ आणावे लागले. या गेल्या चार वर्षांतील घडामोडींनंतर शिवसेनेनी धडा घेतला. दि. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येतील बाबरी मशिद पाडली गेल्यानंतर उसळलेल्या दंगलीत शिवसेनेनी सक्रिय भूमिका बजावली. अगोदर मराठी माणूस शिवसेनेबरोबर होताच पण दंगलीत शिवसेनेनी जी ‘मर्दुमकी’ बजावली त्यामुळे गुजराती, राजस्थानी व्यावसायिक शिवसेनेला कुर्निसात करु लागले. परिणामी १९९५ मध्ये शिवसेना-भाजपा युतीची सत्ता राज्यात प्रस्थापित झाली. लागलीच मुंबई महापालिकेतील काँग्रेसची सत्ता हस्तगत करण्याकरिता शिवसेनेनी काँग्रेसमध्ये फूट पाडली व महापौरपदाच्या निवडणुकीत पुष्पकांत म्हात्रे यांचा दारुण पराभव केला. जेमतेम एक वर्षात झालेल्या महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे ११२ नगरसेवक विजयी झाले होते. शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासात ही सर्वाधिक संख्या होती. भाजपासोबत निवडणूकपूर्व युती असल्याने आणि त्यावेळी युतीमध्ये तुलनेनी सौहार्दाचे वातावरण असल्याने शिवसेनेनी भाजपाला सत्तेत वाटा दिला होता. त्यानंतर सातत्याने शिवसेनेच्या जागा घटत असून मागील निवडणुकीत त्या ८४ च्या घरात आल्या आहेत.
वरील पार्श्वभूमीवर शिवसेनेनी राम मंदिराचा मुद्दा भविष्यातील राजकारणावर डोळा ठेवून हाती घेतला आहे. राम मंदिरावरुन देशातील वातावरणात धार्मिक विद्वेष पसरला तर मुंबईसारख्या शहरात नरेंद्र मोदींच्या यांच्या करिष्म्याला भूललेल्या गुजराती, राजस्थानी समाजाला पुन्हा शिवसेनेची गरज भासू शकते. तसेच राम मंदिराचा मुद्दा हा उत्तर भारतीय हिंदूंना भावणारा असल्याने, ती काँग्रेसकडून दुरावलेली व्होटबँक भाजपाकडून काही प्रमाणात हिसकावता आली तर त्याचा लाभ होऊ शकेल, असे शिवसेनेला वाटले असू शकते. उत्तरेकडे बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल प्रचंड आकर्षण होते. तिकडच्या एका वृत्तपत्राकरिता मुंबईत काम करणाऱ्या एका पत्रकाराने मागे मला असे सांगितले होते की, मी कुठलीही बातमी दिली नाही तरी चालते. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबतची छोटीशी बातमी जरी प्रतिस्पर्धी दैनिकात प्रसिद्ध झाली तर त्याबद्दल मला जाब विचारला जातो. त्यामुळे बाळासाहेबांचे पुत्र उद्धव यांनी अयोध्येला जाऊन रामाची व शरयू नदीची आरती करणे यातून उद्धव यांनी २००० च्या दशकात प्रभावीपणे हाती घेतलेले ‘मी मुंबईकर’ हे अभियान अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
शिवसेनेत असतानाच ‘मी मुंबईकर’ हे अभियान गुंडाळण्यास भाग पाडणारे व कालांतराने मनसेची स्थापना करुन सातत्याने शिवसेनेला मराठी माणसाचा मुद्दा घट्ट पकडून ठेवण्यास भाग पाडणारे राज ठाकरे हे दोन दिवसांपूर्वी उत्तर भारतीय महापंचायतीच्या व्यासपीठावर गेले होते. त्या व्यासपीठावरुन त्यांनी आपली बाजू हिंदीतून मांडली. राज यांच्यासारख्या परप्रांतियांना कट्टर विरोध करणाऱ्या नेत्याला उत्तर भारतीय श्रोत्यांसमोर हिंदीत संवाद करावासा वाटणे ही त्यांची राजकीय अपरिहार्यताच आहे. मराठी मतांचे शिवसेनेसह सर्व पक्षांमध्ये विभाजन होते. उच्च जातीचे मराठी मतदार भाजपा-शिवसेनेला मते देतात तर काही जाती पश्चिम महाराष्ट्रात प्रभावी असलेल्या राष्ट्रवादीची पाठराखण करतात. काँग्रेसची प्रत्येक मतदारसंघात लहान-मोठी का होईना व्होटबँक आहेच. त्यात मराठी मते आहेत. त्यामुळे केवळ उरलेल्या मराठी मतांवर आपला एकही आमदार विजयी होऊ शकत नाही, याची जाणीव राज यांना झाली आहे. उत्तर भारतीय मतदार हा बहुतांशी गोरगरीब, कष्टकरी आहे. त्यामुळे त्याची एकगठ्ठा मते मिळवणे मराठी मतांची बेगमी करण्यापेक्षा सोपे आहे. मनसेनी उत्तर भारतीयांवर दहशत बसवल्यापासून अनेक भागातील मनसेच्या रिक्षा युनियनचे सभासद हे उत्तर भारतीय आहेत. घाटकोपरचे रमाबाई नगर हे दलित वस्तीचे केंद्र मानले जाते. मात्र तेथे पूर्वापार वास्तव्य करणारे दाक्षिणात्य आहेत व आता मोठ्या संख्येने उत्तर भारतीय आहेत. अशीच काहीशी परिस्थिती कामराज नगरमध्येही आहे. येथे महापालिका निवडणुकीत किमान दोन वेळा मनसेचे नगरसेवक विजयी झाले. थोडक्यात काय तर मुस्लीमांवर दहशत बसवून ज्या पद्धतीने भाजपाने उत्तर प्रदेशात त्यांची मते घेतली तशीच मनसे ती उत्तर भारतीयांना दाखवून राजकीय यश संपादन करते. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक वगैरे शहरांत परप्रांतीय मोठ्या संख्येने आहेत. विदर्भात हिंदी भाषिकांचा प्रभाव आहे. त्यामुळे तसे पाहिले तर महाराष्ट्रातील किमान १३० ते १४५ मतदारसंघांत हिंदी भाषिक मतदार निर्णायक आहेत. याची जाणीव आता उद्धव व राज ठाकरे यांना झाली आहे.
राज्यातील सत्ता गमावल्यामुळे कमालीची अस्वस्थ असलेली राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा-शिवसेनेवर मात करण्याकरिता महाराष्ट्रात महाआघाडी स्थापन करण्याकरिता धडपडत आहे. अशा महाआघाडीत मनसेचा समावेश करण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसनी यापूर्वी दिला आहे. मात्र उत्तर भारतीयांचा द्वेष करण्याची भूमिका असलेले राज ठाकरे यांना सोबत घेऊन बसणे काँग्रेसकरिता डोकेदुखी ठरु शकते. त्यामुळे उत्तर भारतीयांच्या मनातील किल्मिष दूर करण्याकरिता उत्तर भारतीय महापंचायतीने हा कार्यक्रम आयोजित केला असण्याची शक्यता आहे. या महापंचायतीची स्थापना करण्यामागे प्रेरणा असलेले अरविंद तिवारी हे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहेत हा निव्वळ योगायोग नाही. उत्तर भारतीयांच्या व्यासपीठावर जाऊन राज यांनी आपलीच भूमिका मांडली हे जरी खरे असले तरी भाषणाच्या शेवटी मुंबईत चार-पाच पिढ्या वास्तव्य करणाऱ्या उत्तर भारतीयांबाबत आपला आक्षेप नाही, असे सांगायला ते विसरले नाहीत. म्हणजे एका अर्थाने त्यांनी उद्धव ठाकरे यांनी २००० च्या दशकात मांडलेली व त्यावेळी राज यांनी उधळून लावलेली ‘मी मुंबईकर’ अभियानाला पूरक भूमिका स्वीकारली आहे.
‘सुबह का भूला अगर शाम को घर आए तो उसे भूला नही कहते’, अशी हिंदीत कहावत आहे. आता उद्धव व राज या मराठी भाषिकांच्या हिताचे राजकारण करणाऱ्या दोन नेत्यांना उत्तर भारतीय हिंदी भाषिक कसे स्वीकारतात ते निकालानंतरच स्पष्ट होईल.