उत्तर कोरियाची आता अमेरिकेवर हेरगिरी!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2023 10:14 AM2023-12-01T10:14:52+5:302023-12-01T10:15:40+5:30
North Korea: उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आणि अमेरिका यांच्यातलं वैर सर्व जगाला माहीत आहे. अमेरिकेनं अनेक बाबतीत उत्तर कोरियाला अनेक इशारे आणि ‘आदेश’ दिले; पण किम जोंग उन यांनी त्या ‘आदेशां’ना कायमच केराची टोपली दाखवली.
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन आणि अमेरिका यांच्यातलं वैर सर्व जगाला माहीत आहे. अमेरिकेनं अनेक बाबतीत उत्तर कोरियाला अनेक इशारे आणि ‘आदेश’ दिले; पण किम जोंग उन यांनी त्या ‘आदेशां’ना कायमच केराची टोपली दाखवली. अर्थात किम जोंग उन यांचा हडेलहप्पी स्वभावही अख्ख्या जगाला माहीत आहे. आपल्या मनात जेव्हा, जे काही येईल, त्याच्या परिणामांचा कोणताही विचार न करता ते अंमलात आणायचा त्यांचा खाक्या आहे.
किम जोंग उन यांचा नवा पवित्रा म्हणजे त्यांनी आता थेट अमेरिकेच्या अति संवेदनशील आणि अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांवर हेरगिरी करायला सुरुवात केली आहे. अमेरिकेचं व्हाइट हाऊस, रक्षा मंत्रालय पेंटागॉन, अमेरिकेतील लष्करी ठाणी... या साऱ्या गोष्टींचे त्यांनी थेट फोटोच काढले आहेत आणि त्यावर त्यांचं निरीक्षण आणि निगराणी सुरू आहे.
कसे मिळाले त्यांना हे फोटो?
किम जोंग उन यांचं म्हणणं आहे, गेली कित्येक वर्षं अमेरिकेनं जगावर दादागिरी केली. त्यांच्यावर पाळत ठेवली आणि त्यांना धाकात ठेवण्याचा प्रयत्न केला; पण अमेरिकेला मी हे सांगू इच्छितो, की आम्हीही हे करू शकतो! किम जोंग उन इतक्या आत्मविश्वासानं सध्या बोलताहेत, कारण उत्तर कोरियानं नुकतंच आपलं ‘स्पाय सॅटेलाइट’ अवकाशात सोडलं आहे आणि ते यशही झालं आहे. याआधी उत्तर कोरियानं तीन वेळा असा प्रयत्न केला होता; पण तो अयशस्वी झाला होता. याच ‘गुप्तहेर उपग्रहा’नं पाठवलेल्या छायाचित्रांचा ‘अभ्यास’ किम जोंग उन करताहेत. आपल्या या कृतीनं त्यांनी अमेरिकेला जणू काही धोक्याचा आणि सावधानतेचा इशाराच दिला आहे.
किम जोंग उन म्हणतात, जगाच्या सुरक्षेचा स्वयंघोषित ठेका अमेरिकेनं आपल्याकडे घेतला आहे; पण आम्हालाही आमच्या सुरक्षेचा हक्क आहेच. अमेरिकेनं ज्या स्तरावर हत्यारं आणि तंत्रज्ञानाचा विकास केला आहे, ते आम्हीही करू शकतोच की! आमच्या ‘स्पाय सॅटेलाइट’चं यशस्वी प्रक्षेपण हा त्यातला एक भाग! अमेरिका आम्हाला वारंवार अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देतं; पण आम्हीही कच्च्या गुरूचे चेले नाहीत!
उत्तर कोरियानं अमेरिकेच्या व्हर्जिनिया येथील संरक्षण स्थळांवरील युद्ध विमानांची गिणतीही केली आहे. याशिवाय इटलीची राजधानी रोम आणि दक्षिण कोरियातील लष्करी संवदेनशील ठिकाणांचे फोटोही उत्तर कोरियानं मिळवले आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉमस-ग्रीनफिल्ड आणि उत्तर कोरियाचे राजदूत किम सोंग यांची नुकतीच भेट झाली. किम सोंग यांचं म्हणणं होतं, अमेरिकेकडून वारंवार आपल्या शस्त्रांचं प्रदर्शन केलं जातं आणि अण्वस्त्र हल्ल्यांची भीती दाखवली जाते. हे आम्ही सहन करणार नाही. त्याचवेळी लिंडा यांचं म्हणणं होतं की, आम्ही कधीच कोणाला धमकी दिली नाही, देत नाही. आमच्या युद्धाभ्यासाचं वेळापत्रक तयार असतं आणि त्याप्रमाणेच आम्ही आमच्या अभ्यासाची उजळणी करीत असतो. यासंदर्भात आम्ही उत्तर कोरियाशी बोलणी करायलाही तयार आहोत; पण किम जोंग उन यांच्या वतीनं किम सोंग यांनी अमेरिकेला बजावलं, अमेरिकेकडून जोपर्यंत ‘लष्करी धाक’ दाखवणं संपत नाही, तोपर्यंत आम्हीही आमच्या सशस्त्र क्षमतांमध्ये आणि क्षेपणास्त्रांमध्ये वाढ करतच राहू.
दुसरीकडे उत्तर कोरियाचा ‘शेजारशत्रू’ दक्षिण कोरियानंही दावा केला आहे की, उत्तर कोरियाच्या स्पाय सॅटेलाइटसाठी रशियानं मोठ्या प्रमाणात मदत केली आहे.
गेल्या महिन्यात अमेरिकेनंही दावा केला होता की, रशिया-युक्रेन यांच्यात सध्या सुरू असलेल्या युद्धात रशियाला मदत करताना उत्तर कोरियानं रशियाला एक हजारपेक्षाही जास्त घातक शस्त्रास्त्रं आणि कंटेनर्स दिली आहेत. त्याची भरपाई म्हणूनच रशियानं उत्तर कोरियाला या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी मदत केली. खरं तर संयुक्त राष्ट्रसंघानं २००६मध्येच उत्तर कोरियावर क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यावर बंदी आणली होती; पण या बंदीला न जुमानता त्यांनी क्षेपणास्त्रांच्या चाचण्या सुरूच ठेवल्या होत्या. एकंदरित स्पाय सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकेवर पाळत ठेवण्याच्या उत्तर कोरियाच्या पवित्र्यामुळे अमेरिकेसोबतच्या त्यांच्या ‘शीतयुद्धात’ वाढच होणार आहे. अमेरिकेच्या एका अहवालानुसार उत्तर कोरिया लवकरच आपली सातवी अण्वस्त्र चाचणी करणार आहे.
२००९मध्येच ‘चर्चा’ बंद!
जगासाठी अत्यंत धोकादायक असलेली अण्वस्त्रे मुळातच तयार केली जाऊ नयेत आणि सध्या आहेत ती अण्वस्त्रेही नष्ट केली जावीत असं जगातल्या अनेक देशांचं आणि सर्वच तज्ञांचं म्हणणं आहे. त्यानुसार चीन, अमेरिका, रशिया, जपान, दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया यांच्यात काही वर्षांपूर्वी ‘बोलणी’ही सुरू झाली होती; पण त्यांच्यात एकमत न झाल्यानं २००९मध्येच ही चर्चा बंद करण्यात आली होती.