सारेच गुजराती बनिये नसतात

By admin | Published: June 15, 2017 04:29 AM2017-06-15T04:29:08+5:302017-06-15T04:29:08+5:30

गांधीजी गुजराती होते. पण सगळे गुजराती जसे बनिये नसतात (उदा. नरेंद्र मोदी) तसे ते बनिये नव्हते. बनिये असणे वा बनियेगिरी करणे हा काहीतरी मिळविण्यासाठी

Not all languages ​​are created in Gujarati | सारेच गुजराती बनिये नसतात

सारेच गुजराती बनिये नसतात

Next

- सुरेश द्वादशीवार

गांधीजी गुजराती होते. पण सगळे गुजराती जसे बनिये नसतात (उदा. नरेंद्र मोदी) तसे ते बनिये नव्हते. बनिये असणे वा बनियेगिरी करणे हा काहीतरी मिळविण्यासाठी करण्याच्या हेतूचा निर्देश देणारा शब्दप्रयोग आहे. गांधी हा सारे आयुष्य इतरांना काही देत व त्यांच्यावर आपले सारे काही उधळीत राहिलेला महापुरुष आहे. दक्षिण आफ्रिकेत असताना तेथील भारतीयांसाठी तो कस्तुरबांसह लढला. त्यात त्याने तुरुंगवास पत्करला. भारतात परतल्यानंतर येथील स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करताना याही देशात त्याने आठ वर्षे तुरुंगात काढली. चंपारण्यात तो तेथील निळीच्या शेतकऱ्यांसाठी लढला. गुजरातेत दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांसाठी त्याने सरकारशी झुंज दिली. देशभरच्या दलितांना माणुसकीची वागणूक मिळावी म्हणून अनेकांचे शिव्याशाप झेलले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी येथील जनतेत ऐक्य टिकवायचे म्हणून त्याने हिंदू-मुस्लीम ऐक्याची धुरा वाहिली. शेतकरी, कष्टकरी, विणकर, शहरी कामगार आणि स्त्रियांच्या हक्कांच्या बाजूने तो उभा राहिला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याला जेवढा समाज संघटित करता आला तेवढा तो जगातल्या दुसऱ्या कोणाला जमला नाही. त्या सामर्थ्याच्या बळावर त्याने ब्रिटिश साम्राज्यशाहीला झुकविले. मात्र हे सारे करीत असताना त्याचा लाभ आपल्याला व आपल्या कुटुंबातील कोणाला असे त्याच्या मनात कधी आले नाही. मनात आणले असते तर देशातले कोणतेही पद त्याच्यासाठी साऱ्यांनी सिद्ध ठेवले असते. परंतु स्वातंत्र्य मिळाले तेव्हा त्याच्या स्वागताच्या सोहळ्यात सहभागी न होता बंगालच्या वेशीवर होत असलेल्या हिंदू स्त्रियांवरील अत्याचारांना रोखण्यासाठी तो नवखालीच्या प्रदेशात पायी हिंडत राहिला. स्त्रियांचे शुद्धीकरण करून त्यांना धर्मात घेत राहिला. त्याने हौतात्म्य पत्करले तेही समाजाच्या ऐक्यासाठी, हिंदू व मुस्लीम यांच्यातील बंधुत्वासाठी. सारे काही साऱ्यांना देऊन त्यातले काही एक स्वत:कडे न ठेवणारा माणूस बनिया नसतो. तो संत असतो. त्याचमुळे त्याची थोरवी सारे जग गात असते. एक निवडणूक जिंकून सारा देश टाचेखाली आणण्याची स्वप्ने पाहणारी अमित शाहसारखी माणसे जेव्हा त्याच्यावर बनियेगिरीचा ठपका ठेवतात तेव्हा अमित शाह यांचीच खरी किंमत देशाच्या लक्षात येते. अशा माणसांना किंमत समजते, मूल्य समजत नाही.
स्वतंत्र भारतात गांधींचा एकही नातेवाईक कोणत्या सत्तापदावर गेला नाही वा धनवंतही झाला नाही. त्यांच्यासाठी काही उरावे असे त्या महात्म्याने मागे काही ठेवलेही नाही. गांधी सामान्य माणसांना सामर्थ्यशाली बनविणारा, त्यांच्या सहनशक्तीचे त्यांच्या बलस्थानात रूपांतर करणारा आणि तोवर न लढलेल्या माणसांना सत्याग्रही बनविणारा लोकनेता होता. त्याने व्यापार (वा अमित शाहच्या भाषेत बनियेगिरी) केलाच असेल तर एका सामान्य व आत्मतृप्त वर्गात असामान्यत्व जागविण्याचा व त्याच्या आत्मपूर्तीचे रूपांतर आत्मबळात करण्यात केला. त्याला विरोधक थोडे नव्हते. पण त्यांच्याशीही त्याने अप्रामाणिकपणा वा साधी चतुराईही केली नाही. आपली मते अतिशय स्वच्छ शब्दात व साध्या भाषेत त्यांनाही त्याने ऐकविली. सामान्य माणसे दारिद्र्यात राहतात तसा तोही दारिद्र्यात राहिला. स्वातंत्र्याची बोलणी अखेरच्या टप्प्यात असताना सरकारने गांधींना दिल्लीला येण्याचे आमंत्रण दिले व तेथे त्यांच्या निवासाची व्यवस्था केली. पण गांधी स्वच्छता करणाऱ्यांच्या कॉलनीत राहिले. तेथे राहायला जाण्यापूर्वी त्यांनी त्या वस्तीचे शुद्धीकरण वा श्रीमंतीकरण केले नाही. ज्यांच्यासोबत राहायला जायचे त्यांच्यासाठी त्याने साबणांचे ढीग वा स्वच्छ टॉवेल्स पाठविले नाहीत. घनश्यामजी बिर्ला यांनी गांधी राहतील त्या वस्तीत पाणी व दिवे पोहचविण्याची जबाबदारी स्वत:कडे घेतली तेव्हा ती व्यवस्था आपण गेल्यानंतरही कायम ठेवण्याची अट गांधींनी त्यांना घातली. मुख्यमंत्री निघून जातात, गालिचे वा वातानुकूलनाची व्यवस्था काढून घेण्याचे स्वत:ला योगी म्हणविणाऱ्यांचे भिकारपण त्यांनी केले नाही. माझ्यासाठी व्यवस्था करणार असाल तर ती वस्तीतल्या साऱ्यांना कायमची मिळत राहील याची हमी द्या असे म्हणण्याचे मोठेपण गांधींमध्ये होते. अमित शाह हे स्वत: गुजराती आहेत. पण त्यांना गुजराती गांधींचे हे अमर्याद माणूसपण समजले नाही. पक्षीय चष्मे आणि सत्तेचे पाठबळ घेऊन उभे राहणाऱ्यांना ते कळायचेही नाही. ज्यांना सत्तेखेरीज दुसऱ्या कशाशीच कर्तव्य नाही, सत्ता हाती असतानाही जे शेतकरी व कष्टकरी माणसांच्या सामूहिक मरणांविषयी बोलायला तयार होत नाहीत त्यांना नवखालीत हिंडणारा गांधी कसा कळेल?
संताला बनिया म्हणणारी व खऱ्या संन्याशावर चतुराईचा आरोप करणारी माणसे तशीही एकांगी व उथळ असतात. त्यांचे म्हणणे हसण्यावारीच न्यायचे असते. अमित शाह हे एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांचा पक्ष देशात सत्तेवरही आहे. अशा माणसाने स्वत:ला इतरांच्या हसण्याचा वा थट्टेचा विषय बनवू नये एवढेच या निमित्ताने सुचवायचे. सत्तेसाठी वाट्टेल ते करायला, अगदी ईश्वर व धर्मही वापरून घ्यायला तयार असणारी माणसे सत्तेला तुच्छ लेखणाऱ्या गांधीजींना समजू शकत नसतील तर आपणही त्याचे विशेष वाटून घेण्याचे कारण नाही.

(संपादक, लोकमत, नागपूर)

Web Title: Not all languages ​​are created in Gujarati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.