पक्षांतर नव्हे, हे मूल्यांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:10 AM2017-08-03T00:10:06+5:302017-08-03T00:10:08+5:30
आपला पक्ष सोडून दुसरा पक्ष धरणा-याला त्याच्या नव्या निष्ठा जरा जोरात सांगाव्या लागतात. झालेच तर आपल्या जुन्या पक्षाला आणि त्यातील सहका-यांना त्याला बोलही लावावा लागतो.
आपला पक्ष सोडून दुसरा पक्ष धरणा-याला त्याच्या नव्या निष्ठा जरा जोरात सांगाव्या लागतात. झालेच तर आपल्या जुन्या पक्षाला आणि त्यातील सहका-यांना त्याला बोलही लावावा लागतो. तसे केल्याखेरीज नवे सहकारी त्याच्यावर विश्वास ठेवीत नाहीत आणि जुन्या सहकाºयांच्याही त्याच्याविषयीच्या आशा संपत नाहीत. लालूप्रसाद यादव आणि काँग्रेस यांची साथ सोडून भाजप व मोदी यांच्या वळचणीला जाऊन उभे राहणा-या नितीशकुमारांनी नेमके हेच केले आहे. जुने मुख्यमंत्रिपद (महागठबंधनचे) सोडून नवे मुख्यमंत्रिपद (जदयू-भाजपचे) ग्रहण केल्यानंतर पाचव्या दिवशी पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपली नवी मूल्ये व नव्या निष्ठा जोरात सांगून टाकल्या आहेत. मोदी हे २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा एकवार देशाचे पंतप्रधान होतील असे सांगताना आज देशात त्यांच्या तोडीचा दुसरा नेता नाही असेही ते म्हणाले आहेत. शिवाय लालूप्रसाद आणि राहुल गांधी यांच्यावर त्याच पत्रपरिषदेत त्यांनी दुगाण्याही झाडल्या आहेत. देश नितीशकुमारांकडे एक गंभीर प्रकृतीचे नेते म्हणून पाहत होता. त्यांच्या समाजवादी व सेक्युलर निष्ठांविषयी त्याला विश्वास होता आणि तशीच त्यांची धारणाही होती. आपल्याविषयीचे हे समज स्वत: नितीशकुमारांनीच निर्माण केले होते. मोदींनी देश ‘काँग्रेसमुक्त’ करण्याची गर्जना केली तेव्हा तिला उत्तर देताना देश ‘संघमुक्त’ करण्याची घोषणा नितीशकुमारांनी केली होती. त्यांचे आजवरचे राजकारणही धर्मांधता व जात्यंधता यांना विरोध करणारे राहिले होते. (त्यांचा विरोध फक्त एका जातीला होता. या देशात ब्राह्मण जातीच्या लोकांना कोणतीही सवलत वा जागा मिळू नये असे ते एकेकाळी जाहीरपणे सांगत. आता भाजपशी केलेल्या जवळिकीमुळे त्यांना त्यांची ही जुनी भूमिका गिळावी लागेल एवढेच. फक्त त्यांच्या अपेक्षेनुसार भाजप व संघ यांना ती विसरता आली पाहिजे.) लालूप्रसाद आणि त्यांचे कुटुंब यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत आणि त्यासाठी ते सारे न्यायालयाच्या खेपा टाकत आहेत. आर्थिक अन्वेक्षण विभागाच्या तपासालाही ते सामोरे जात आहेत. मात्र त्यांचा कथित भ्रष्टाचार सांगून नितीशकुमारांनी त्यांच्यापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला असेल तर तो मात्र लबाडीचा आहे हे त्यांना सांगितले पाहिजे. त्यांनी लालूप्रसादांच्या राजद या पक्षाशी युती करून बिहार विधान परिषदेची निवडणूक लढविली तेव्हाही लालूप्रसाद या आरोपांच्या घेºयात होते. त्यांच्या कुटुंबातील माणसे या आरोपांना तेव्हाही उत्तरे देत होते. तो सारा प्रकार ठाऊक असताना नितीशकुमार यांनी त्यांच्याशी युती करून निवडणूक लढविली व जिंकली असेल तर आताचे त्यांचे शहाणपण वा नीतिमूल्यांची त्यांना झालेली आठवण या उशिरा सुचलेल्या गोष्टी आहेत, असे म्हटले पाहिजे. शिवाय २०१९ मध्ये मोदीच पुन्हा पंतप्रधान होतील असे त्यांना आताच कळले असेल असेही नाही. काही माणसांना सत्तेची चाहूल आणि अधिकाराचा वास इतरांच्या तुलनेत अगोदर येतो. नितीशकुमार हे असे तीक्ष्ण नाकाचे राजकारणी आहेत. लालूप्रसादांचे आमदार त्यांच्या आमदारांहून जास्तीच्या संख्येने निवडून आले तरी मुख्यमंत्रिपदी आपणच राहू अशी भूमिका त्यांनी घेतली आणि लालूप्रसादांनीही ती मान्य केली. आता लालूप्रसादांहून मोदी जास्तीचे बलदंड व उद्याचे सत्ताधारी आहेत हे लक्षात येताच त्यांनी जुनी साथ सोडली व नवी साथ घेतली आहे. असलेच तर यात सत्तेचे राजकारण आहे, मूल्याची चाड नाही आणि भ्रष्टाचारावरचा रोषही नाही. कथित संशयिताची साथ घेऊन सत्ता बळकवायची आणि मग शहाजोगपणे आपण त्यातले वा तिकडचे नसून इकडचे आहोत असे म्हणण्यात केवळ लबाडी नाही, जनतेची फसवणूक आहे. नितीशकुमारांना बिहारच्या जनतेने जो जनाधार दिला तो त्यांचा एकट्याचा नव्हता. जदयू, राजद व काँग्रेस या तीन पक्षांच्या महागठबंधनाला तो मिळाला होता. एकवेळ त्या आघाडीत मुलायमसिंग यांचा समाजवादी पक्ष व मायावतींचा बहुजन समाज पक्ष सहभागी करून घेण्याचेही प्रयत्न झाले. ते निष्फळ ठरले तरी जनतेने उर्वरित महागठबंधनाला मते दिली. तो व्यापक जनाधार एका क्षणात विसरून नितीशकुमारांना संघ परिवाराचे भरते आले असेल आणि त्यासाठी ते त्यांची धर्मनिरपेक्षतेवरील निष्ठा वाºयावर सोडायला सिद्ध झाले असतील तर त्याची कारणे राजदच्या कथित भ्रष्टाचारात वा काँग्रेसच्या आजच्या दुबळ्या अवस्थेत शोधायची नसतात. ती नितीशकुमारांच्या सत्ताकांक्षेत पहायची असतात. जो माणूस वाजपेयी आणि मनमोहनसिंग या दोघांच्याही सरकारात राहतो, धर्मनिरपेक्षतेचे मूल्य सांगतो, लोहिया आणि जयप्रकाशांचे शिष्यत्व जाहीर करतो तो एकाएकी भाजप व संघासोबत जात असेल तर तो मुळातच कच्चा आणि निसरड्या निष्ठेचा माणूस आहे असे म्हटले पाहिजे. अशी माणसे त्यांच्या उत्तरकाळात जशी वागतात तसेच आता नितीशकुमार वागत आहेत. म्हणूनच त्यांचे बोलणे वा वागणे फारशा गंभीरपणे न घेता साशंक वृत्तीनेच आपण पाहिले पाहिजे. पक्षांतर ही देशाच्या राजकारणात आता फार जुनी व रुळलेली बाब झाली आहे. ती आताशा बातमीचाही विषय होत नाही. नितीशकुमारांचे पक्षांतर हे बातमीचा विषय झाले याचे कारण ते पक्षांतर नसून मूल्यांतर आहे, हे आहे.