अराजक नव्हे; ही तर अमानुषतेकडील वाटचाल!

By admin | Published: September 5, 2016 05:24 AM2016-09-05T05:24:12+5:302016-09-05T05:24:12+5:30

मनुष्यप्राणी असा बेभान, अमानुष, संवेदनाहीन आणि क्रूर का होत चालला आहे व त्याच्यात हे सारे अवगुण कसे, कुठून आणि कशातून येत आहेत हा प्रश्न सर्व विचारी लोकांना पडू लागला आहे.

Not chaotic; This is the path to inhumanism! | अराजक नव्हे; ही तर अमानुषतेकडील वाटचाल!

अराजक नव्हे; ही तर अमानुषतेकडील वाटचाल!

Next


‘नरेचि केला हीन किती नर’, असे वचनच आहे. पण आता हे कालातीत समजले जाणारे वचन मुळापासूनच तपासून पाहावे लागेल की काय, अशी परिस्थिती गेल्या काही दिवसांपासून देशात निर्माण होऊ लागली आहे. या परिस्थितीमुळे सर्व प्राणिमात्रात सर्वोत्कृष्ट समजला जाणारा मनुष्यप्राणी असा बेभान, अमानुष, संवेदनाहीन आणि क्रूर का होत चालला आहे व त्याच्यात हे सारे अवगुण कसे, कुठून आणि कशातून येत आहेत हा प्रश्न सर्व विचारी लोकांना पडू लागला आहे. पण असे असताना गेल्या काही महिन्यांपासून सतत असा प्रचार केला जातो आहे की ‘देश बदल रहा है’! कोणता हा बदल आहे व कोणासाठी तो आहे? उलट सामान्यांना जो बदल जाणवतो आहे तो आधीच्या तुलनेत खूपच भयानक आणि भयभीत करणारा आहे.
विलास शिंदे नावाचा मुंबईच्या पोलीस खात्यातील एक कर्मचारी त्याला नेमून दिलेली जबाबदारी पार पाडीत असताना जे कायद्याचे पालन करणे टाळतात, त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव आणि आठवण करून देत असतो. पण तेदेखील सहन न झालेला व कायदा धाब्यावर बसवू पाहणारा एक अल्पवयीन तरुण असा काही त्याच्या अंगावर धावून जातो की त्यात त्या बिचाऱ्या शिंदेला थेट रुग्णालयात दाखल करावे लागते व तिथेच त्याची प्राणज्योत मालवते. पण कायद्याचे रक्षण करणारा शिंदे जसा एकमेवाद्वितीय नसतो, तसाच त्याच्यावर हल्ला करणारा इसम वा त्याच्यातील प्रवृत्ती एकाकी नसते. शिंदेवर हल्ला करणारा कुणी अल्पवयीन तरुण असतो. मुंबईच्या समुद्रावरील पुलावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर डाफरणारा कुणी लोकप्रतिनिधी असतो. त्याच मुंबईत नाईलाजास्तव पदपथावर झोपलेल्यांना चिरडणारा कोणी नामांकित अभिनेता असतो तर राजधानी दिल्लीत अशाच पद्धतीने आपल्या आलिशान मोटारीखाली समाजातील नाहीरे वर्गातल्या काहींना चिरडणारा कुणी गर्भश्रीमंताचा कुलदीपक असतो. कायदा आपले काहीही वाकडे करू शकत नाही, ही अशा लोकांची प्राथमिक मानसिक अवस्था असते. आणि कायद्याने आपले वाकडे करण्याचा चुकून प्रयत्न केला तर आपण त्यालाही परून उरू शकू असा उदंड आत्मविश्वास त्यांच्या ठायी असतो. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे या देशात आता आपोआप न्याय मिळणे थांबले असून तो विकत घ्यावा लागतो आणि ज्याची ऐपत असेल त्याला तो सहजी मिळू शकतो असा आत्मविश्वास ही अशा वृत्तीच्या लोकांच्या मानसिकतेची अंतिम अवस्था असते. जेव्हा लोक कायदा पाळीत नाहीत व तो तोडण्यात धन्यता आणि पुरुषार्थ मानतात आणि चुकून त्यांना कोणी कायदा पाळण्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला तर तोच कायदा स्वत:च्या हाती घेऊन दंडेली करतात तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या अवस्थेला अराजकाची स्थिती म्हणतात. देशात आज अशीच काहीशी अवस्था निर्माण झाल्याचे दिसून येत असताना आता देशाचा प्रवास या अराजकतेकडून अमानुषतेकडे सुरू झाल्याचे जेव्हा आढळून येते, तेव्हा मन विषण्ण झाल्याशिवाय राहत नाही.
ओडिसा राज्यातील कालाहांडी जिल्ह्यातील दाना माझी या अत्यल्पभूधारक शेतकऱ्याची अमानगेई ही पत्नी क्षयरोगाने जर्जर असते. अशा जर्जर रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी तेथील राज्य सरकारने रुग्णवाहिकेची केलेली मोफत सोय त्याला उपलब्ध होत नाही, म्हणून तो एका बचत गटाकडून तीन हजारांचे कर्ज काढून पत्नीला स्वखर्चाने रुग्णालयात घेऊन जातो. पण ती जगत नाही. तब्बल पन्नास किलोमीटरवरील घराकडे तिचे प्रेत घेऊन जाण्यासाठी पुन्हा त्याला कोणीही कोणतेही वाहन उपलब्ध करून देत नाही. अखेर पत्नीचे शव खांद्यावर घेऊन माझी पायी निघतो. त्याच्या बाजूने त्याची बारा वर्षांची मुलगी मातृवियोगाने सतत धाय मोकलून रडत रडत चालत असते. एव्हाना माध्यमांना या अमानुषतेची कुणकुण लागते तेव्हा कुठे सरकारी यंत्रणा हलते. तोवर त्यांचे दहा किलोमीटर पायी चालून झालेले असते. दुर्दैवाचा पुढील फेरा म्हणजे यंत्रणेच्या दगडीपणाचा अनुभव त्याच राज्यात लगेचच येतो. मलकनिगरी जिल्हा रुग्णालयात वर्षा खेमुडू या बालिकेला तिचे पालक सरकारी रुग्णवाहिकेतून घेऊन जात असतात. पण वाटेतच वर्षा मरण पावते, तेव्हा रुग्णवाहिकेचा चालक रस्त्यातच थांबून मृत वर्षा आणि तिच्या पालकांना उतरवून देतो. जी वेळ माझीवर आलेली असते तीच आणि तशीच वेळ वर्षाचे पिता दीनबंधू यांच्यावर येते आणि प्रेतासकट त्यांना पायी रस्ता धरणे भाग पडते. आता या उभय प्रकरणांची तथाकथित चौकशी होईल. त्यातून काही निघेल न निघेल पण माझीच्या मृत पत्नीची व मृत वर्षाची जी अवहेलना आणि विटंबना झाली व त्यांच्या कुटुंबीयांना ज्या क्रूर अनुभवाचा सामना करावा लागला त्याची भरपाई कोण करील व ती कशी होईल? केंद्र आणि सारी राज्ये वंचितांसाठी आपण खूप काही करीत असल्याचा दावा करीत असतात पण हे सारे दावे पोकळ ठरतात आणि शिल्लक उरते ते यंत्रणांमधील क्रूर, भीषण आणि अमानवी वास्तव. हाच तो देश बदल रहा है नव्हे? आज भारतात लोकांना अध्यात्म मार्गाकडे घेऊन जाणाऱ्या, त्यांना जीवन जगण्याची कला शिकविणाऱ्या आणि मानवतेचा धर्म आचरणात आणण्याचा उपदेश करणाऱ्या बुवा-बाबा आणि महाराजांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांच्याकडे भक्तांची सतत रीघ लागलेली आढळून येते. ही रीघ प्रवचने ऐकून कृतकृत्यतेचा भावही धारण करीत असते. तरीही लहानग्या मुली बलात्कार व अत्याचाराच्या बळी ठरतात. कोपर्डीसारखा क्रूर आणि भीषण प्रकार घडतो. पुन्हा कोपर्डीची घटनादेखील एकाकी नसते. वारंवार असे घडत जाते तेव्हा भारताची वाटचाल केवळ असहिष्णुतेच्याच नव्हे; तर अमानुषतेच्या दिशेने होत चालल्याचे दिसून येते. यंत्रणा मात्र स्थितप्रज्ञ असते.
जाता जाता : सर्वोच्च न्यायालयातील विद्यमान न्यायाधीश जे. चेलमेश्वर यांनी सरन्यायाधीशांना लेखी पत्र देऊन न्यायसंस्था आणि सरकार यांच्यातील संघर्षाला एक नवे परिमाण प्राप्त करून दिले आहे. कॉलेजियमच्या प्रत्येक बैठकीचे इतिवृत्त तयार केले पाहिजे आणि नवे न्यायाधीश निवडण्याच्या प्रक्रियेत सर्व पाच सदस्यांनी त्यांचे लेखी मत नोंदविले पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला आहे. गेल्या गुरुवारची बैठकदेखील त्यांनी याच कारणास्तव टाळली होती. न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये सरकारच्या अभिप्रायास महत्त्व दिले पाहिजे असाही त्यांचा आग्रह आहे. विशेष म्हणजे त्यांच्या या भूमिकेस दोन माजी सरन्यायाधीशांनी दुजोरा दिला आहे. संसदेने ज्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाची निर्मिती केली होती, ती घटना दुरुस्ती फेटाळणाऱ्या खंडपीठाचे न्या. चेलमेश्वर हेही एक सदस्य होते. त्यांनी सदर दुरुस्ती फेटाळण्यास असलेला त्यांचा लेखी विरोध नोंदविला होता.
-विजय दर्डा
(लोकमत पत्र समूहाचे चेअरमन)

Web Title: Not chaotic; This is the path to inhumanism!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.