गर्दीचे नव्हे, दर्दींचे जागतिक संमेलन : शोध मराठी मनाचा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 12:08 AM2018-01-05T00:08:57+5:302018-01-05T00:09:15+5:30

पुण्यात १ ते ३ जानेवारीदरम्यान जागतिक मराठी परिषदेतर्फे आयोजित ‘शोध मराठी मनाचा’ हे १५ वे जागतिक संमेलन उत्साहात पार पडले. त्याला राज्यभरातून रसिक उपस्थित होते. परदेशस्थ यशस्वी मराठी बांधवांच्या मार्गदर्शनातून मराठी तरुणांना निश्चितच प्रेरणा मिळाली.

 Not a crowded, world-congratulatory meeting: | गर्दीचे नव्हे, दर्दींचे जागतिक संमेलन : शोध मराठी मनाचा!

गर्दीचे नव्हे, दर्दींचे जागतिक संमेलन : शोध मराठी मनाचा!

Next

- प्रज्ञा केळकर-सिंग

उद्योग-व्यवसायासह कला, साहित्य आणि संस्कृती अशा विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कामगिरी करून जगभरात मराठीचा झेंडा फडकविणाºया कर्तृत्ववान मराठी बांधवांच्या उपस्थितीने ‘शोध मराठी मनाचा’ हे १५ वे जागतिक संमेलन गर्दीचे संमेलन न ठरता सर्वार्थाने ‘दर्दींचे’ संमेलन ठरले. जागतिक मराठी अकादमीतर्फे पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात आयोेजित हे संमेलन पुणेकरांसह राज्यभरातून आलेल्या रसिकांसाठी मार्गदर्शक ठरले. रंगतदार मुलाखती, प्रदर्शन आणि कविसंमेलनाने रसिकांसाठी नववर्षाची सुरेख सुरुवात झाली. जागतिक मराठी परिषदेतर्फे १९९४ मध्ये जागतिक मराठी अकादमीची स्थापना झाली. २००२ मध्ये माधव गडकरी यांनी या अकादमीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी ज्येष्ठ कवी आणि वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्याकडे सोपवली. २००४ साली ‘शोध मराठी मनाचा’ या नावाने पहिले जागतिक संमेलन नागपूर येथे पार पडले. त्यानंतर अहमदनगर, पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर, गोवा, रत्नागिरी, सातारा अशा विविध ठिकाणी रसिकांचा संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. १५ वे संमेलन पुण्यात आयोजित करण्यात आले.
परदेशातील यशस्वी मराठी बांधवांना महाराष्ट्रात आणून त्यांचे मार्गदर्शन उपस्थितांना तरुणांना प्रेरणा देण्यात यशस्वी ठरले. मराठी तरुणांमध्ये हिंमत जागृत करून त्यांना जगाच्या पाठीवर सिद्ध करण्यासाठी हे संमेलन आयोजित केले जाते.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन झाले. रामदास फुटाणे आणि रेणुका देशकर यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीतून गडकरी यांच्या आयुष्यातील जगण्याच्या दिशा, परखड राजकीय विचार आणि वाटचाल, सामाजिक बांधिलकी, कौटुंबिक संवेदनशीलता असे नानाविध कंगोरे रसिकांना अनुभवता आले. ‘समुद्रापलीकडे’ या परिसंवादांतर्गत अमेरिका, दुबई, लंडन, कतार, आॅस्ट्रेलिया, थायलंड, फ्लोरिडा अशा विविध देशांमध्ये कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवलेल्या मराठी बांधवांनी आपल्या जडणघडणीचे अनुभव कथन करत तरुणांना मार्गदर्शन केले.
‘लक्ष्मीची पाऊले’ याद्वारे उद्योगपतींची जडणघडण ऐकायला मिळाली. दिवसेंदिवस समस्यांच्या गर्तेत अडकत चाललेल्या शेतकºयाला उभारी देण्याच्या दृष्टीने ‘बळीराजा... काल, आज आणि उद्या’ या परिसंवादाने मोलाची भूमिका बजावली. ‘वेगळ्या वाटा’ या कार्यक्रमात
तृतीयपंथी कवयित्री-कार्यकर्त्या दिशा शेख यांनी स्त्री-पुरुष संबंध, समाजाची बुरसटलेली मानसिकता, पुरुषप्रधान समाजव्यवस्था, तृतीयपंथींना मिळणारी वागणूक या मुद्यांवर परखड भाष्य करत सर्वांनाच अंतर्मुख केले. चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी मुलाखतीतून कलाकृतींमधील कलात्मकता, त्यातील वास्तव, संस्कृतिरक्षणाच्या नावाखाली निर्माण केलेले प्रतिसेन्सॉर बोर्ड अशा विविध पैलूंमधून दिग्दर्शकाची भूमिका उलगडली. चित्र, शिल्प, काव्य या अनोख्या कार्यक्रमातून कला आणि साहित्याची दुहेरी अनुभूती कलाप्रेमींना अनुभवता आली. याच काळात दुर्दैवाने कोरेगाव भीमा येथील वादामुळे राज्यात तणाव होता. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची राज ठाकरे घेणार असणारी मुलाखत स्थगित केली आहे. या संमेलनामध्ये आपल्या कार्यक्षेत्रात न येणारे कोणतेही ठराव केले जात नाहीत, हे विशेष. कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या संमेलनांच्या तुलनेत हे संमेलन आशयाच्या दृष्टीने लाखमोलाचे ठरले.

Web Title:  Not a crowded, world-congratulatory meeting:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.