गांधीवध नव्हे; हत्त्याच
By admin | Published: March 13, 2016 10:01 PM2016-03-13T22:01:12+5:302016-03-13T22:01:12+5:30
शब्द ही जपून वापरण्याची बाब आहे. खरेतर प्रत्येकानेच आपण काय बोलत आहोत आणि त्या बोलण्याचा समोरच्या व्यक्ती अथवा समाजमनावर काय परिणाम होईल याचा विचार करणे गरजेचे असते
शब्द ही जपून वापरण्याची बाब आहे. खरेतर प्रत्येकानेच आपण काय बोलत आहोत आणि त्या बोलण्याचा समोरच्या व्यक्ती अथवा समाजमनावर काय परिणाम होईल याचा विचार करणे गरजेचे असते. काहीजण आधी बोलतात मग विचार करतात तर काहीजण आधी विचार करूनच शब्दोच्चार करीत असतात. जर बोलणारा एखादा सामान्य जीव असेल आणि त्याच्या बोलण्याला फारशी किंमतही नसेल तर एकवेळ त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जाऊ शकते. पण उच्चपदस्थ मनुष्य कोणताही आगापिछा न बघता आणि आपल्या पदाचे भान न ठेवता एखाद्या ऋषितुल्य व्यक्तीसंबंधी अवमानकारक शब्दप्रयोग करीत असेल तर ती बाब निश्चितच लांच्छनास्पदच म्हणावी लागेल. असाच प्रकार शनिवारी नाशकात घडला. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित एका राष्ट्रीय चर्चासत्रात कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी आपल्या भाषणात ‘गांधीवध’ असा उल्लेख केला. वास्तविक वध हा असुरी प्रवृत्तीचा होत असतो, चांगल्या विचारांची आणि महात्म्यांची केली जाते ती हत्त्याच असते हे कुलगुरूंसारख्या जबाबदार आणि उच्चशिक्षित माणसाला दुसऱ्या कोणी सांगण्याची वेळ यावी हे आश्चर्याचे आहे. देशाच्या राष्ट्रपित्याबद्दल आपल्या उपस्थितीत चुकीचा उल्लेख होत असताना गप्प बसतील तर ते शरद पवारच कसले? कुलगुरूंना त्याचक्षणी अडवून त्यांनी ‘गांधीवध नव्हे; गांधीहत्त्या म्हणा’ असे तर बजावलेच शिवाय आपल्या भाषणात वध या शब्दावरही आक्षेप नोंदवताना हा शब्द प्रचलित करणाऱ्या मानसिकतेवरदेखील प्रश्नचिन्ह उभे केले. प्रसंगावधान राखत शरद पवार यांनी जे जाणतेपण दाखविले ते खरोखरच स्तुत्य आहे. पवारांनी कुलगुरूंना वेळीच रोखले नसते आणि त्यावर आपले मतदेखील नोंदवले नसते तर एक चुकीचा संदेश समाजापुढे गेला असता.