हे अपेक्षित नव्हे?

By admin | Published: August 7, 2015 09:43 PM2015-08-07T21:43:29+5:302015-08-07T21:43:29+5:30

उधमपूर घातपाती हल्ला प्रकरणी जिवंतपणी सुरक्षा यंत्रणांच्या हाती सापडलेला वा सापडवून दिलेला मूळचा पाकिस्तानी अतिरेकी नावेद ऊर्फ मुहम्मद उस्मान कासीम खान

Is not it expected? | हे अपेक्षित नव्हे?

हे अपेक्षित नव्हे?

Next

उधमपूर घातपाती हल्ला प्रकरणी जिवंतपणी सुरक्षा यंत्रणांच्या हाती सापडलेला वा सापडवून दिलेला मूळचा पाकिस्तानी अतिरेकी नावेद ऊर्फ मुहम्मद उस्मान कासीम खान, आमचा नागरिक नाहीच असा सपशेल इन्कार पाकिस्तानने करावा यात अनपेक्षित असे काहीही नाही. याआधी याच पद्धतीने जिवंतपणी पकडला गेलेला व नंतर फासावर लटकवला गेलेला अजमल कसाब याच्या बाबतीतही पाकिस्तानी सरकारने अशीच भूमिका घेतली होती. जेव्हां केव्हां सीमेवर अथवा देशात अन्यत्र घातपाती कारवाया होतात आणि त्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे सापडतात, त्या प्रत्येक वेळी पाकी सरकार त्याचा इन्कार करीत असते व ठोस पुरावे देण्याची मागणी करीत असते. यात विशेष म्हणजे भारताने पुढे केलेले पुरावे ठोस आहेत अथवा नाहीत, याचा निवाडाही पुन्हा तेच करणार. कसाब आणि नावेद यांच्या दरम्यान किमान दहा पाकी अतिरेक्यांना जिवंतपणी ताब्यात घेतले गेले होते. पण प्रत्येकाच्याच बाबतीत पाकने इन्काराची भूमिका सोडली नव्हती. कसाबच्या बाबतीत कालांतराने पाकला त्याचे पितृत्व स्वीकारावेच लागले होते. तसेच या नावेदच्या बाबतीतही आता होऊ शकेल. कारण त्याला अटक झाल्यानंतर त्याच्यापाशी सापडलेल्या एका मोबाईल नंबरवर जेव्हां संपर्क साधला गेला, तेव्हां तो मोबाईल नावेदच्या पित्यानेच स्वीकारला. नावेद आपलाच मुलगा असल्याची कबुली देताना, तो जिवंतपणी भारतीय सुरक्षा दलाच्या हाती सापडल्याने आता पाकी सरकार आणि लष्कर-ए-तोयबाचे लोक आपला जीव घेण्यास टपले असल्याचे या पित्याने सांगितले. अर्थात पाकी सरकार या पित्याचे कथनही स्वीकारणार नाही आणि कदाचित त्याची विल्हेवाट लावून मोकळेही होईल. पण यात दोन बाबी महत्वाच्या आहेत. नावेदने सुरक्षा यंत्रणांशी व माध्यमांशीही बोलताना काढलेले उद्गार अंगावर काटा उभा करणारे आहेत. लोकाना (हिन्दू) ठार मारण्यात आपल्याला मजा वाटते, हेच ते उद्गार. यातून किती भयानक पद्धतीने अतिरेकी संघटना तरुणांचे ‘ब्रेन वॉशींग’ करीत असतात याचा अंदाज बांधता येतो. दुसरी बाब म्हणजे काही तासांच्या आता पाकी सरकारला एखादी व्यक्ती त्या देशाची नागरिक आहे अथवा नाही याचा तपास लागत असेल तर त्या सरकारची कार्यक्षमता (?) अचाटच म्हणावी लागेल.

Web Title: Is not it expected?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.