शहर का सिर्फ नाम नही, सुरत बदलनी चाहिए !

By नंदकिशोर पाटील | Published: February 26, 2023 07:09 AM2023-02-26T07:09:23+5:302023-02-26T07:10:02+5:30

जी-२० परिषदेसाठी आंतरराष्ट्रीय पाहुणे ‘आम्ही औरंगाबादला जातोय,’ म्हणून निघाले असतील. आता जाताना ते छत्रपती संभाजीनगरातून जातील! हेही एक नवलच!!

Not just the name of the city, face should be changed! | शहर का सिर्फ नाम नही, सुरत बदलनी चाहिए !

शहर का सिर्फ नाम नही, सुरत बदलनी चाहिए !

googlenewsNext

- नंदकिशोर पाटील, संपादक, छत्रपती संभाजीनगर

इतिहास बदलता येत नसेल तर इतिहासाच्या पाऊलखुणा मिटवून टाका, असे म्हटले जाते. सांस्कृतिक राष्ट्रवादाने प्रेरित झालेली माणसं याबाबत अग्रेसर असतात. प्रतिकं, प्रतिमा आणि पुतळे या सांस्कृतिक बदलांचे लक्ष्य असते. यात आता शहरांच्या नावांचा समावेश झाला आहे. शहरांची नावे बदलण्याचा इतिहास मोठा आहे. त्याचे मूळ ग्रीक संस्कृतीत आढळते. अथेन्स हे ग्रीकच्या राजधानीचे शहर. सुमारे साडेतीन हजार वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेले अथेन्स हे जगातील अतिप्राचीन शहर आहे. राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिकतेचा प्रदीर्घ असा वारसा लाभलेल्या या शहराच्या अथेन्स नावामागे एक रोचक दंतकथा आहे. अथेन्सचे नाव अथेना नावाच्या देवीवरून पडले, असे मानले जाते. अथेना व पोसायडन या दोघांनी या शहराला आपले नाव देण्यात यावे, अशी विनंती केली. त्यासाठी स्पर्धा झाली. पोसायडनने आपल्या त्रिशूलाने जमिनीवर आघात करून एक खाऱ्या पाण्याचा झरा निर्माण केला तर अथेनाने शांती व समृद्धीचे प्रतीक असलेले ऑलिव्हचे झाड निर्माण केले. अथेन्सच्या नागरिकांनी ऑलिव्हचे झाड स्वीकारले व शहराला अथेनाचे नाव दिले. तेच हे अथेन्स! परंतु आज हे शहर देवीच्या नव्हे तर सॉक्रेटिस, प्लेटो, ॲरिस्टॉॅटल अशा सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञ आणि गणित तज्ज्ञांमुळे जगभर ओळखले जाते. या तत्त्वज्ञांनी आधुनिक काळातील संपूर्ण मानवजातीचे विचारविश्व समृद्ध केले. नंतरच्या काळात अनेक विचारवंत, शास्त्रज्ञ, कलावंत आणि खेळाडूंनी आपल्या कर्तृत्वाच्या अमीट अशा पाऊलखुणा उमटवल्या आहेत. सोळाव्या शतकापासून वसाहतवादास प्रारंभ झाल्यानंतर नव्या राज्यकर्त्यांनी इतिहासावर आपली मोहोर उमटावी, आपल्या नावाची स्मृतिशेष राहावी म्हणून शहरांची, गावांची नावे बदलली. या बदलामागे धार्मिक आणि सांस्कृतिक अजेंडा होताच. यास ब्रिटिशही अपवाद नव्हते. वसाहतवादी ब्रिटिशांनी आपल्या राज्यकारभारातील, सैन्यातील आणि राजघराण्यातील व्यक्तींची नावे दिलीच. शिवाय, चर्चेस आणि धर्मगुरूंची नावे देण्यातही धन्यता मानली. तेव्हा शहराच्या नामांतरामागे हेतू असतोच.

आपल्याकडेही नामांतराचा इतिहास मोठा आहे; पण गेल्या पाच-सहा वर्षांत शहरांची नावे बदलण्याची गती वाढली आहे. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यात आघाडीवर आहेत. नुकतेच त्यांनी अलाहाबादचे नाव प्रयागराज आणि फैजाबादचे नाव अयोध्या करून घेतले आहे. यूपीतील आणखी २५ शहरं नामांतराच्या प्रतीक्षेत आहेत म्हणतात !

नुकतेच महाराष्ट्रातील औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामांतर करण्यात आले. विशेष म्हणजे, महाविकास आघाडी आणि विद्यमान शिवसेना-भाजप अशा दोन्ही सरकारांची यास मान्यता होती. महाविकास आघाडी सरकार पायउतार होताना झालेल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत या दोन्ही शहरांच्या नामांतराचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अशाप्रकारची सर्वसहमती हाही एक दुर्मीळ योग! प्रश्न एवढाच आहे की, केवळ शहरांची नावे बदलून भागणार नाही. त्या शहरांची सुरत बदलली पाहिजे. शिवाय, आंतरराष्ट्रीय जी-२० परिषदेत दोन दिवसांवर असताना औरंगाबादचे नामांतर करण्याची घाई का केली? या परिषदेच्या निमित्ताने शहरात येणारे आंतरराष्ट्रीय पाहुणे ‘आम्ही औरंगाबादला जातोय,’ म्हणून निघाले असतील. आता जाताना ते छत्रपती संभाजीनगरातून जातील! हेही एक नवलच!!

यांनीही केले नामांतर
केवळ भाजपशासित राज्यांतच शहरांचे नामांतर होते असे नाही. कलकत्ताचे कोलकाता, आंध्र प्रदेशमधील राजामुंदरी जिल्ह्याचे राजामहेंद्रवरम, केरळच्या एरिक्कोडला एरिकोड, हरयाणातील गुरगांवचे गुरुग्राम, म्हैसूरचे म्हैसुरु, मंगलोरचे मंगळुरू, बंगलोरचे बेंगळुरू, मद्रासचे चेन्नई, पाँडिचेरीचे पुडुचेरी, ओरिसाचे ओडिशा अशा बिगरभाजपशासित राज्यांची नावेही याआधी बदलण्यात आली आहेत.

Web Title: Not just the name of the city, face should be changed!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.