मन की नही, जन की बात करो
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2018 04:40 AM2018-08-15T04:40:09+5:302018-08-15T04:40:22+5:30
स्वातंत्र्याचा आज साजरा होणारा ७२ वा वाढदिवस हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कारकिर्दीतील अखेरचा स्वातंत्र्यदिन असेल. त्यातील भाषणासाठी त्यांनी जनतेकडून सूचना मागविल्या आहेत. हे भाषण येती निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच होईल यात शंका नाही.
स्वातंत्र्याचा आज साजरा होणारा ७२ वा वाढदिवस हा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या कारकिर्दीतील अखेरचा स्वातंत्र्यदिन असेल. त्यातील भाषणासाठी त्यांनी जनतेकडून सूचना मागविल्या आहेत. हे भाषण येती निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच होईल यात शंका नाही. त्यात नव्या आश्वासनांची खैरात राहील आणि जुन्या आश्वासनांच्या पूर्ततेची हमी असेल. भाषण व आश्वासन ही मोदींची नित्याची बलस्थाने व कमजोरी राहिली आहे. परिणामांची काळजी न करता आश्वासने देण्याची त्यांची खासियत आता सर्वज्ञात झाली आहे. गेल्या निवडणुकीत प्रत्येक नागरिकाला १५ लक्ष रुपये देण्याचे त्यांचे आश्वासन अजून हवेत आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा बाहेर येईल हा त्यांचा विश्वास अजून खरा व्हायचा आहे. देशाची शेजारी राष्ट्रांशी आता मैत्री राहिली नाही. नेपाळ, म्यानमार, श्रीलंका व मॉरिशस हे देशही पाकिस्तानसोबत चीनच्या गोटात गेले आणि चीनने लद्दाखमध्ये ताजे आक्रमण केले आहे. चीनशी बोलणी होतात, हास्यविनोदांची देवाणघेवाण होते मात्र प्रत्यक्षात त्या स्नेहबोलीचा परिणाम कुठे दिसत नाही. देशाची अर्थव्यवस्था मजबूत झाल्याचे सांगितले जात असतानाच रुपयाची किंमत कमी होऊन एका डॉलरला आता ७० रुपये मोजावे लागत आहेत. महागाई वाढली आणि कमी उत्पन्न असणाऱ्यांचे जीवन असह्य झाले. बँका बुडाल्या आणि त्या बुडविणारे सरकारच्या मदतीने विदेशात स्थायिक झालेत. अंबानी व अदानी सारखे एक-दोन उद्योगपती सोडता इतरांचे उद्योगही गतिशील झाल्याचे दिसले नाही. किंगफिशर एअरलाईन आकाशात हरविली, एअर इंडिया जमीनदोस्त झाली तर जेट एअर जमिनीवर उतरण्याच्या तयारीला लागले. याहून गंभीर बाब ही की देशाची ७९ टक्के संपत्ती एक टक्का लोकांच्या हाती तर उरलेल्यांना २१ टक्क्यात समाधान मानावे लागते. सरकार स्थिर राहिले, त्याची भीतीही माध्यमांसकट सर्वत्र राहिली, टीका करणाºया माध्यमांची गळचेपी झाली व ती करणाºयांना घरी बसविण्याचे राजकारण झाले. विचारवंतांच्या हत्या झाल्या आणि अल्पसंख्य व दलितांच्या वाट्याला ‘लिंचिंग’ हे नवेच प्रकरण आले. मुली व स्त्रियांची असुरक्षितता वाढली आणि त्यांची सुरक्षा केंद्रे त्यांच्या शोषणाची केंद्रे बनली. मात्र या साºया अपयशांची चिंता मोदींनी करण्याचे कारण नाही. त्यांचा पक्ष वारकºयांच्या श्रद्धेने त्यांच्या पाठीशी आहे आणि त्यांना संघाचे भगवे वरदान आहे. त्याला बळकटी द्यायला पुन्हा राम मंदिराच्या उभारणीचे राजकारण आहे. त्यांचे प्रचारतंत्र परिणामकारक तर विरोधक एकत्र येण्याची भाषा बोलत असले तरी एकमेकांजवळ येताना न दिसणारे आहेत. काँग्रेसखेरीज बाकीचे विरोधक प्रादेशिक पातळीवरचे आहेत आणि त्यांनी कधीकाळी काँग्रेसशी वैरही केले आहे. राहुल गांधींचा अपवाद वगळता मोदींना थेट आव्हान देणारा दुसरा नेता देशात नाही आणि राहुल गांधींवर सोडायला मोदींजवळ प्रचारकांची मोठी फौज तयार आहे. शिवाय धनवंत सोबत आहेत आणि माध्यमे वळचणीला आली आहेत. उद्योग, अर्थ, परराष्ट्र व्यवहार आणि सामाजिक सुरक्षा या साºया क्षेत्रातील माघारीवर पांघरूण घालता यावे एवढा मोठा धर्मग्रस्तांचा जमावही त्यांच्या सोबत आहे. सबब चिंतेचे कारण नाही. ते जे बोलतील त्यातील खºया खोट्याचा विचार करण्याचे तारतम्य आतासारखे शिल्लक राहिले नाही. म्हणून बोला, नवी आश्वासने द्या, त्यात मेट्रो आणा, बुलेट ट्रेन्स आणा, अगदी त्यात अवकाशयाने आणायलाही हरकत नाही. झालेच तर जगाचे राजकीय नसले तरी यौगिक व आध्यात्मिक नेतृत्व करण्याची भाषा आणा. रुपया डॉलरच्या पातळीवर नेण्याची भाषाही त्यात येणे अडचणीचे नाही. कारण तशीही सरकारी बोली फारशा गांभीर्याने घेणे हे लोकांनीही आता सोडले आहे. तरीही जाता जाता एक सूचना येथे केली पाहिजे. ‘मोदीजी, यापुढे मन की बात सोडा व जन की बात करा’.