धावायची वेळ आली आहे, आता रांगणे पुरेसे नाही !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 06:47 AM2022-04-11T06:47:15+5:302022-04-11T06:47:37+5:30
एक संपले की, दुसरेच अशी संकटांची मालिका सध्या सुरूच आहे. फक्त कोरोनाच नव्हे, तर उद्योग, शिक्षण, पर्यावरण, राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रांत आजारपण आले आहे.
गेल्या दोन वर्षांत आपण शिकलो, की काही प्रश्नांना उत्तरे नसतात! आहे ते, जैसे थे स्वीकारावे लागते. ही नवी शिकवणच आपल्याला तारून नेणार आहे.
एक संपले की, दुसरेच अशी संकटांची मालिका सध्या सुरूच आहे. फक्त कोरोनाच नव्हे, तर उद्योग, शिक्षण, पर्यावरण, राजकारण, समाजकारण अशा सर्वच क्षेत्रांत आजारपण आले आहे. इथे तक्रारीला अर्थ नाही. एकमेकांना दोष देण्यातही अर्थ नाही. प्रश्न पुढे जाण्याचा, आहे त्या परिस्थतीत मार्ग शोधण्याचा आहे !
जग थांबलेले नाही. ते थांबणारही नाही. माणसाने बुद्धीच्या, आध्यात्मिक शक्तीच्या जोरावर यापूर्वीदेखील अनेक संकटांवर मात केली आहे. पूर्वीच्या तुलनेत नवनवे तंत्रज्ञान आपल्या मदतीला आहे, ही केवढी जमेची बाजू! कल्पना करा, इंटरनेट कम्युनिकेशन, वाय फाय, स्मार्ट फोन नसते तर काय झाले असते? ऑनलाइन प्रक्रियेत पूर्णत्व नसेल. कमतरता असेल; पण तरीही या गेल्या दोन वर्षांत बरेचसे उद्योग, शिक्षण यंत्रणा, दळणवळण, संवाद हे सारे या यंत्रणेच्या बळावरच सुरू आहे. कसे तरी का होईना; पण शिक्षण सुरू राहिले.
शिक्षणाच्या संकल्पना आता बदलाव्या लागतील. मूल्यमापनाच्या नव्या पद्धती शोधाव्या, स्वीकाराव्या लागतील. शिकविण्यापेक्षा, शिकणे शिकवावे लागेल. स्वयंअध्ययनासाठी विद्यार्थ्यांची मनोवृत्ती घडवावी लागेल. त्यासाठी शिक्षकाची भूमिकाच बदलावी लागेल.
नीती अनीतीच्या संकल्पना, जीवनमूल्ये, विवाहसंस्था, कुटुंब पद्धती, सामाजिक, राजकीय व्यवस्था यात सातत्याने होणारे बदल स्वीकारावे लागतील. सध्या एकमेकांना दोष देणे, दुसऱ्याच्या चुका शोधणे, परस्परांचे पाय खेचणे, जाती धर्माच्या आधारावर द्वेष पसरविणे यातच आपली शक्ती खर्च होतेय.
जगभरातली सत्ताधारी मंडळी जास्तच भरकटलेली दिसतात. अनिर्बंध, असामाजिक, अविचारी वर्तन खपवून घेतले जाणार नाही असे दंडक निर्माण करावे लागतील. हा बदल एकाएकी होणार नाही; पण तो मंद गतीनेही होता कामा नये. जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे तर रांगून चालणार नाही. अक्षरशः धावावे लागेल. एकट्याने नव्हे, सर्वांनी मिळून. हातात हात घालून.
प्रत्येक क्षेत्रात नीती नियम आहेत. ते इतरांनी पाळावे, आम्ही पाळणार नाही, अशी मग्रुरी, बेशिस्त चालणार नाही. बेशिस्तीतूनच बेदीली निर्माण होते. अतिरेकी, समाजकंटक निर्माण होतात. शिस्त, शांतता ही सर्वांनी समान पद्धतीने समान पातळीवर अंगीकारायला हवी.
गेल्या दोन वर्षांत आपण सारे नवीन गोष्ट शिकलो. ती ही की काही प्रश्नांना उत्तरे नसतात! आपल्याला आहे ते, जैसे थे स्वीकारावे लागते. ही नवी शिकवण आता आपण अंगीकारली पाहिजे. गेल्या दोन वर्षांच्या परिणाम स्वरूप अन् येत्या दशकातील तांत्रिक बदलामुळे आपल्याला मानसिक आरोग्याकडे, शारीरिक आरोग्यापेक्षाही जास्त लक्ष द्यावे लागेल. शिक्षणव्यवस्थेतील मरगळ, परिणामस्वरूप भविष्यातील करिअरविषयीची चिंता, सारखे घरात कोंडून राहिल्यामुळे आलेले नैराश्य, ज्याचे पोटपाणीच घराबाहेर निघण्यावर अवलंबून आहे अशा कामगार, कलाकार, अत्यावश्यक सेवार्थी यांची झालेली होरपळ याचा एकत्रित परिणाम आपल्या सर्वांच्या मानसिक आरोग्यावर होणार आहे. याचे उत्तर डॉक्टरजवळ नसणार. ‘ते तुझे आहे तुजपाशी’ या न्यायाने आपल्याजवळच आहे.
- डॉ. विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरु,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
vijaympande@yahoo.com