नवरात्रीतच नव्हे, नेहमीच व्हावा "ती"चा उदो!
By किरण अग्रवाल | Published: October 15, 2023 11:45 AM2023-10-15T11:45:03+5:302023-10-15T11:45:36+5:30
Navratri : यंदाच्या नवरात्रोत्सवाला आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी लाभलेली असल्याने जागोजागी मोठ्या धूम धडाक्यात हा उत्सव साजरा होणार आहे.
- किरण अग्रवाल
महिला भगिनींवरील अत्याचाराची प्रकरणे कमी होताना दिसत नाहीत. नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीची पूजा बांधताना स्त्री सन्मान व ''ति''च्या सबलीकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान कशी करता येईल याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे
नवरात्रोत्सव हा स्त्री शक्तीचा उत्सव असल्याने या काळात ''ती''च्या कार्य कुशलतेचा व क्षमतेचा गौरव प्रतिवर्षाप्रमाणे होईलच, परंतु तो केवळ या नवरात्रोत्सवापुरता मर्यादित न राहता सर्वकालिक कसा होत राहील यादृष्टीने प्रयत्न करणे व तशी समाजाची मानसिकता तयार करणे गरजेचे आहे.
यंदाच्या नवरात्रोत्सवाला आगामी निवडणुकांची पार्श्वभूमी लाभलेली असल्याने जागोजागी मोठ्या धूम धडाक्यात हा उत्सव साजरा होणार आहे. शक्ती स्वरूपा आदी मायेचा हा उत्सव असतो. सृजनाची ही मातृ शक्ती आहे. सर्वच क्षेत्रात या शक्तीचा परिचय येतो. आता केवळ पाळण्याचीच दोरी तिच्या हाती राहिली नसून, शिक्षणापासून संस्कारापर्यंत व उद्योगापासून अंतरिक्षापर्यंतच्या दोऱ्या तिच्या हाती आल्या आहेत. इतकेच काय, राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50 टक्के आरक्षण आहे, त्याप्रमाणे केंद्र सरकारने अलीकडेच विधानसभा व लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे; त्यामुळे यापुढच्या काळात राजकारणामध्ये महिला भगिनींचा वावर मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येईल. त्यातून खऱ्या अर्थाने भगिनींच्या सबलीकरणाला बळ मिळण्याची अपेक्षा आहे.
आपण सारे उत्सव प्रिय आहोत. त्यामुळे उत्सव म्हटला की त्या काळात आपल्या विचारांना पंख फुटतात. लहान मोठ्या समारंभाचे आयोजन करून आपण संबंधितांच्या गौरवादी कार्यक्रमांचे आयोजन करतो, पण ते करताना जी सन्मानाची वा कृतज्ञतेची भावना प्रदर्शित होते ती बारमाही अक्षुन्न राहते का असा प्रश्न केला तर समाधानकारक उत्तर लाभत नाही. नवरात्रोत्सवातही स्त्री शक्तीच्या सन्मानाचे सोहळे भरविले जातात, कन्यांचे पाद्यपूजन केले जाते; ''ती''च्या गौरव गाथा गायल्या जातात, परंतु सदा सर्वकाळ हा सन्मान तिच्या वाट्याला येतोच असे नाही.
व्यक्तिगत गुन्हेगारीत महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची प्रकरणे वाढलेली आहेत. एकट्या अकोला जिल्ह्याची आकडेवारी बघा, जानेवारीपासून आतापर्यंत गेल्या नऊ महिन्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या 56, विनयभंगाच्या 218 तर विवाहितेच्या छळाच्या 152 घटना पोलीस ठाण्यात नोंदविल्या गेल्या आहेत. महिला आज अबला राहिलेली नाही, ती सबला झाली आहे हे खरेच; पण तिची कुंठीत अवस्था थांबलेली नाही हेदेखील खरे. आजही अनेक महिलांना पती, सासू-सासरे व नणंदेच्या छळास सामोरे जावे लागते. काहींना तर त्यात जीव गमावण्याची वेळदेखील येते. संधीच्या शोधात डुख धरून बसलेली श्वापदे कमी नाहीत. शाळेतून अगर नोकरी धंद्याच्या ठिकाणावरून परतणाऱ्या लेकीबाळींना अशांची नजर चुकवतच घर गाठावे लागते. स्त्री पुरुष समानतेच्या नावाने आपण मारे गळे काढतो पण इतरांचे सोडा, मुलगी झाली म्हणून आसवे गाळणाऱ्या व नकोशीला कचराकुंडीत टाकून दिले जात असल्याच्या घटना काही थांबलेल्या नाहीत. उदाहरणे अनेक देता येतील, घटनांची यादी समोर ठेवता येईल; ज्यातून महिलांची कुंठीत अवस्था थांबलेली नसल्याचे स्पष्ट व्हावे.
महिलांच्या सबलीकरणासाठी राज्य व केंद्र शासनातर्फे अनेक योजना राबविल्या जातात. त्यासाठी लाखो नव्हे तर कोट्यवधीचा खर्च केला जातो. अनेक महिला भगिनींना या योजनांचा मोठा आधार लाभुन गेला असून त्यांनी स्वतःचे अस्तित्व त्यातून निर्मिले आहे. तेव्हा ही चळवळ अधिक गतिमान करायची तर स्त्री शक्तीचा सन्मान हा केवळ नवरात्रोत्सवापुरता मर्यादित न राहता सर्वकालिक कसा होईल याकडे लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. ''लोकमत''नेही सखी मंचच्या माध्यमातून महिलांना त्यांच्या हक्काचे मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. दहा वर्षांपूर्वी पुण्यात लोकमत सखी मंच तर्फे ''ति''चा गणपतीची चळवळ सुरू केली गेली, यंदा संपूर्ण राज्यात ''ति''च्या हाती पूजेचे ताट देऊन ही चळवळ पुढे नेली गेली. आता आजपासून सुरू होत असलेल्या नवरात्रोत्सवानिमित्त हा जागर अधिक गहिरेपणाने करूया.
सारांशात, स्त्रीशक्तीच्या मंतरलेल्या उत्सवात आदिमायेची पूजा बांधताना महिला भगिनींना सुरक्षितता प्रदान करून त्यांना अधिकाधिक स्वायत्ततेने आकाश कसे कवेत घेता येईल यासाठी सारे मिळून प्रयत्न करूया इतकेच यानिमित्ताने.