लेखः फक्त मुंबई नव्हे; भाजपचे 'मिशन महाराष्ट्र'; अमित शाह यांच्या दौऱ्यामागे बराच पुढचा विचार

By संदीप प्रधान | Published: September 6, 2022 05:11 PM2022-09-06T17:11:35+5:302022-09-06T17:16:45+5:30

राज ठाकरे यांना उद्धव यांच्या विरोधात उभे करून हिंदुत्वाच्या भूमिकेवरून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत एखादी समारोपाची सभा वगळता मोदी प्रचारात उतरणार नाहीत.

Not only Mumbai BMC Election, mission behind Amit Shah's Mumbai visit is bigger | लेखः फक्त मुंबई नव्हे; भाजपचे 'मिशन महाराष्ट्र'; अमित शाह यांच्या दौऱ्यामागे बराच पुढचा विचार

लेखः फक्त मुंबई नव्हे; भाजपचे 'मिशन महाराष्ट्र'; अमित शाह यांच्या दौऱ्यामागे बराच पुढचा विचार

googlenewsNext

>> संदीप प्रधान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी मुंबई भेटीत, लवकरच येऊ घातलेल्या मुंबई महापालिका व अन्य महापालिका निवडणुकांकरिता भाजपच्या नेत्यांसोबत चर्चा केली. शिवसेनेने मागील विधानसभा निवडणुकीत भाजपसोबत युती केली होती. त्यानंतर भाजपची साथ सोडून महाविकास आघाडी सरकार स्थापन केले. त्या पक्षाला या 'गद्दारी'ची शिक्षा देण्याकरिता येणारी निवडणूक प्राणपणाने लढवण्याचा आदेश शाह यांनी दिला. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेविरुद्ध शाह मैदानात उतरणार हे स्पष्ट झाले. यापूर्वी काही छोट्या निवडणुका, पोटनिवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचार केला व फारसे यश न मिळाल्याने यापुढे मोदी अशा निवडणुकीत प्रचार करणार नाही, असे भाजपने जाहीर केले होते. त्यामुळे कदाचित मुंबई महापालिका निवडणुकीत एखादी समारोपाची सभा वगळता मोदी प्रचारात उतरणार नाहीत. महाविकास आघाडी स्थापन केल्यापासून आतापर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदींवर थेट जहरी टीका केलेली नाही. त्यामुळे मोदींना निवडणुकीपासून चार हात दूर ठेवून भविष्यात यदा-कदाचित शिवसेनेसोबत लोकांची सहानुभूती असल्याचे महापालिका निवडणुकीत मतपेटीतून दिसले तसेच संघटनात्मकदृष्ट्या शिवसेना अजून पूर्णपणे संपुष्टात आलेली नाही, असे जाणवले तर ठाकरे यांच्यासोबत संवादाचा दुवा मोदी हेच असतील. त्यामुळे शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच शिवसेनेच्या विरोधात मैदानात उतरतील, अशी तूर्त दाट शक्यता आहे.

भाजपच्या जागा शिवसेनेने पाडल्या; मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिलाच नव्हता, अमित शहांनी सांगितला घटनाक्रम

अमित शाह यांनी शिवसेनेवर विश्वासघात केल्याचा आरोप केला. मुख्यमंत्रीपदाचे कोणतेही आश्वासन आपण दिले नव्हते, असे ते म्हणाले. मोदी व फडणवीस यांच्या कामावर शिवसेनेने मते घेतली व नंतर दगा दिला, असा शहा यांचा युक्तिवाद आहे. भाजपने मागील निवडणुकीत गाठलेले १०६ हे संख्याबळ जर फडणवीस यांच्या कामाची पोचपावती असेल, तर शिवसेना फोडून सत्ता स्थापन करताना फडणवीस यांनाच भाजपने मुख्यमंत्रीपद द्यायला हवे होते. शिवसेनेला वाकुल्या दाखवण्याकरिता एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे, याचा अर्थ उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच भाजप पक्षश्रेष्ठींनीही महाराष्ट्रातील जनादेशाचा अनादर करणे आहे. मुख्यमंत्रिपदी शिंदे यांची निवड करण्याचा आदेश मिळाल्यावर फडणवीस यांच्या डोळ्यात उभे राहिलेले अश्रू, त्यांनी सत्तेबाहेर राहण्याचा घेतलेला निर्णय, भाजपच्या कार्यकर्त्यांची झालेली निराशा या सर्व बाबी पक्षश्रेष्ठींचा उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा निर्णय मनावर दगड ठेवून स्वीकारल्याचेच द्योतक आहे. त्यामुळे शाहा यांचा जनादेशाचा मुद्दा हा त्यांच्या कृतीमुळे गैरलागू ठरला आहे.

भाजपला दुसऱ्यांदा घसघशीत संख्याबळ मिळाल्यानंतर या पक्षाने आपल्या मित्रपक्षांसोबत केलेला व्यवहार राजकीय मित्रत्वाच्या व्याख्येत बसणारा नाही. उद्धव ठाकरे आणि शिवसेना हे दीर्घकाळ भाजपचे मित्र राहिले. शिवसेनाप्रमुखांच्या अखेरच्या काळात उद्धव यांनी त्यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवण्याचा शब्द दिला होता. भाजपची वाढती ताकद लक्षात घेता बाळासाहेबांना दिलेला हा शब्द आपल्याला पूर्ण करता येणार नाही, याची जाणीव झाल्याने त्यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केलेला असू शकतो. नरेंद्र मोदी हे हिंदुत्वाचे देशातील एकमेव नेते आहेत. गेल्या आठ वर्षांत त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांची ही प्रतिमा निर्माण झाली असून त्याच्या जवळपासही कुणी जाऊ शकत नाही. त्यामुळे बाळासाहेबांमुळे शिवसेनेकडे असलेली हिंदुत्वाची 'व्होट बँक' भाजप हळूहळू काबीज करणार, याची उद्धव यांना जाणीव झाल्याने कदाचित त्यांनी शिवसेनेला जहाल हिंदुत्ववादी भूमिकेपासून दूर काढून व्यापक भूमिका घेण्यास भाग पाडले असावे. यापूर्वी २००० च्या दशकात जेव्हा मुंबईतील मराठी माणसाची संख्या झपाट्याने कमी होत होती, तेव्हा उद्धव यांनी 'मी मुंबईकर' अभियान सुरू केले होते. जी अमराठी व्यक्ती १५ वर्षांपेक्षा जास्त काळ मुंबईत वास्तव्य करीत आहे तिला मुंबईकर मानून तिच्यासोबत राजकीय सलोखा निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. अर्थात तो निर्णय तेव्हा शिवसेनेत असलेल्या राज ठाकरे यांना रुचला नव्हता व त्यांनी कल्याणमध्ये आलेल्या परीक्षार्थींना मारहाण करून उधळून लावला होता. आताही राज ठाकरे यांना उद्धव यांच्या विरोधात उभे करुन हिंदुत्वाच्या भूमिकेवरुन त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे. राज हे त्यांच्या परस्परविरोधी भूमिकांमुळे मतदारांच्या नजरेतून उतरतील व राजकीय यशापासून दूर जातील, अशीच या मागील व्यूहरचना आहे.

अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर उद्धव ठाकरेही ॲक्टिव्ह; लगेचच बोलावली बैठक

उद्धव यांनी मोदी व भाजपचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व व नवी व्होट बँक निर्माण करण्याकरिता पक्षाच्या धोरणात काही बदल केले. मात्र आपण घेतलेल्या राजकीय निर्णयांमागील भूमिका लोकांना समजावून न सांगणं, हे उद्धव यांच्या अंगाशी आले आहे. महाविकास आघाडी स्थापन करून मुख्यमंत्रीपद प्राप्त केले, ही उद्धव यांची कृती शाह यांना भाजपसाठी आव्हान वाटते आहे. नितीशकुमार हे जेव्हा विरोधी पक्षातील मंडळींना २०१९ च्या निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार भासत होते तेव्हा ते भाजपला शरण गेले. त्यांनी भाजपच्या पोटाशी जात बिहारमध्ये सरकार स्थापन केले. मागील विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांना हाताशी धरून ६२ ते ६४ आमदार असलेल्या नितीशकुमार यांच्या जदयूला ४० जागांपर्यंत खाली खेचण्याची खेळी भाजपने केली. त्याचवेळी ४० ते ४२ जागांवर असलेला भाजप ६२ ते ६५ जागांवर पोहोचला. उद्धव यांनी शरद पवार यांचा हात पकडून मुख्यमंत्रीपद मिळवले तर ती गद्दारी, पाठीत खंजीर खुपसणे ठरते. मात्र चिराग पासवान यांच्याशी छुपा समझोता करून नितीशकुमार यांचे पंख भाजपने कापले तर ती शहा यांची चाणक्यनीती ठरते. ही नवी राजकीय परिभाषा थक्क करणारी आहे.

ठाकरे-पवारांना शह देण्याचा भाजपाचा डाव; मुंबई, बारामतीचा गड काबीज करण्याची योजना

शाह यांनी भाजपच्या मोजक्या नेत्यांसोबत घेतलेल्या बैठकीत केवळ सरकार चालवण्यात रममाण होऊ नका, असा दम भरला आहे. २०१४ व २०१९ मध्ये देशभरात भाजपला नेत्रदीपक यश प्राप्त होत असताना महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता स्थापन करणे शक्य झाले नाही व पर्यायाने लोकसभेच्या ४८ जागा असलेल्या या राज्यावर पूर्ण कब्जा मिळत नाही, हे मोदी-शहा यांना रुचलेले नाही. सत्तेत रममाण न होता महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता काबीज करण्याइतके संघटनात्मकदृष्ट्या मजबूत व्हा, हाच कानमंत्री शहा यांनी स्वपक्षीयांना दिला. याचा अर्थ एकनाथ शिंदे व त्यांच्यासोबत गेलेले ४० आमदार या भाजपला स्वबळावर सत्ता प्राप्त करण्याइतपत बळ प्राप्त होत नाही तोपर्यंत वापरायच्या कुबड्या आहेत. ज्या दिवशी १०६ जागांवरून भाजप १४५ जागांच्या पुढे उडी घेईल त्या दिवशी त्यांना कुणाचीच गरज लागणार नाही. त्यापूर्वी महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे हे प्रादेशिक पक्ष कमकुवत करणे हीच भाजपची रणनीती आहे. ज्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा भाजपला लाभ झाला त्याच आंदोलनाचे अर्ध्वयू अरविंद केजरीवाल हेही राजकीयदृष्ट्या प्रबळ होताना दिसताच त्यांचे पंख कापण्याचे प्रयत्न भाजपने सुरू केले. देशातील सर्वच प्रादेशिक पक्षांसमोर भाजपच्या स्वबळाच्या ईर्षेच्या अश्वमेध यज्ञामुळे आव्हान निर्माण झाले आहे. जो कुणी भाजपचा हा अश्व रोखण्याचा प्रयत्न करील त्याला युद्ध करणे अटळ आहे.

Web Title: Not only Mumbai BMC Election, mission behind Amit Shah's Mumbai visit is bigger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.