ही पर्यावरण रक्षणासाठी दिलेली आहुती नव्हे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 12:16 AM2018-01-08T00:16:30+5:302018-01-08T00:17:37+5:30

१५ फेब्रुवारी १९३५ रोजी अमरावतीमधील मेळघाट वनविभागात वनांचे आगीपासून संरक्षण करीत असताना हरिसालचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी मोहम्मद नाझीर यांनी मरण पत्करले होते. पुढे हरिसाल येथे नाझीर यांचे एक स्मारकही बांधण्यात आले.

Is this not a sacrifice for environmental protection? | ही पर्यावरण रक्षणासाठी दिलेली आहुती नव्हे काय?

ही पर्यावरण रक्षणासाठी दिलेली आहुती नव्हे काय?

Next

१५ फेब्रुवारी १९३५ रोजी अमरावतीमधील मेळघाट वनविभागात वनांचे आगीपासून संरक्षण करीत असताना हरिसालचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी मोहम्मद नाझीर यांनी मरण पत्करले होते. पुढे हरिसाल येथे नाझीर यांचे एक स्मारकही बांधण्यात आले. ब्रिटिशकाळात असे घडू शकते मग स्वतंत्र भारतात का नाही?
पुण्याच्या भोर वनपरिक्षेत्रातील काही भागात गेल्या आठवड्यात वणवा पेटला होता. वन विभागाचे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता ही आग आटोक्यात आणण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत होते. आग विझविण्यासाठी कुठलीही आधुनिक साधनसामुग्री त्यांच्याकडे नव्हती. यापैकी काही जण झुडपांच्या पानांच्या साहाय्याने ही आग विझवित होते. पण येथील उंच वाढलेल्या गवतात आगीचा भडका रौद्ररूप धारण करीत होता. अशा या भीषण परिस्थितीत जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य बजावत असलेले वनरक्षक सदाशिव नागठाणे ७० टक्के जळाले अन् बुधवारी त्यांची मृत्यूशी झुंज संपली. गेल्या एप्रिल महिन्यात भंडारा जिल्ह्यातील नागझिरा अभयारण्यात जंगलातील आग विझवितानाच एका वनमजुरास मरण आले होते. भोर येथील या आगीत आणखी काही वनकर्मचा-यांचे जीव थोडक्यात बचावले. नागठाणे यांनी पर्यावरण रक्षणासाठी दिलेली ही आहुतीच म्हणायला हवी. पण आपल्या व्यवस्थेचे दुर्दैव असे की नागठाणे असोत वा अन्य वनकर्मचारी त्यांच्या या अशा बलिदानाची पर्वा समाज तर सोडा सरकारही करताना दिसत नाही. त्यांच्या सेवाकाळापर्यंतचा पगार देण्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही प्रकारची आर्थिक मदत त्यांना मिळत नाही. एरवी सीमेवर लढताना शहीद होणारे जवान अथवा पोलिसांच्या कुटुंबीयांच्या मदतीला सारा देश धावून जातो. मग वनांचे संरक्षण करताना मरण पत्करणाºयांसोबत असा दुजाभाव का?
यासंदर्भात ब्रिटिश काळातील एका घटनेचा येथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. १५ फेब्रुवारी १९३५ रोजी अमरावतीमधील मेळघाट वनविभागात वनांचे आगीपासून संरक्षण करीत असताना हरिसालचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी मोहम्मद नाझीर यांनी मरण पत्करले होते.
मेळघाटसाठी जीवाची बाजी लावून बलिदान देणारे ते पहिले व्यक्ती होते, अशी माहिती आहे. पुढे हरिसाल येथे नाझीर यांचे एक स्मारकही बांधण्यात आले. ब्रिटिशकाळात असे घडू शकते मग स्वतंत्र भारतात का नाही? भोर येथील घटना तर फारच गंभीर आहे. आगीत होरपळलेल्या नागठाणे यांना त्यांच्या सहकाºयांनी अक्षरश: स्वत:च्या शर्टाचा स्ट्रेचर बनवून बाहेर काढले. आग विझविण्यासाठी गेलेल्या या वनकर्मचा-यांकडे ब्लोअर्स नव्हते का? वनकर्मचारी एवढ्या भीषण आगीत अडकले असताना आपत्कालीन स्थितीत त्यांच्यासाठी अत्याधुनिक सुविधा तसेच रुग्णवाहिकेची सोय का करण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. देशातील वनक्षेत्र ही एक खुली संपत्ती आहे. सागवान माफिया, शिकारी, अतिक्रमणधारक याशिवाय वेळोवेळी लागणाºया आगी अशा प्रचंड दबावात वनकर्मचारी या संपत्तीचे रक्षण करीत असतात. कर्तव्य बजावत असताना त्यांच्यावर जीवघेणे हल्लेसुद्धा होतात. धुळ्यात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या एका आरएफओला जिवंत जाळण्यात आले होते. इतरही भागात अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत. पण त्यांची फारशी दखल घेतली जात नाही, हे वास्तव आहे. मागील काही वर्षात जंगलांवरील दबाव वाढला असताना ते सांभाळणाºया कर्मचाºयांनी संख्या मात्र तोकडीच आहे. या वनरक्षकांना मिळणारे वेतनही त्यांच्या कामाच्या तुलनेत अत्यल्प आहे. हा त्यांच्यावरील अन्याय नाही का? देशाची ही अमूल्य संपत्ती सांभाळणा-यांनाही संरक्षण मिळायला नको का?
- सविता देव हरकरे savita.harkare@lokmat.com

Web Title: Is this not a sacrifice for environmental protection?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग