खलनायक नहीं..!

By admin | Published: February 28, 2016 02:23 AM2016-02-28T02:23:56+5:302016-02-28T02:23:56+5:30

तुरुंगातून शिक्षा भोगून सुटलेल्या कैद्याकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी आहे, हे आता तपासण्याची वेळ आली आहे. त्याला त्याची प्रतिष्ठा उभी करण्याची संधी द्यायची,

Not a villain ..! | खलनायक नहीं..!

खलनायक नहीं..!

Next

(सोळा आणे सच)
- विनायक पात्रुडकर

तुरुंगातून शिक्षा भोगून सुटलेल्या कैद्याकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी आहे, हे आता तपासण्याची वेळ आली आहे. त्याला त्याची प्रतिष्ठा उभी करण्याची संधी द्यायची, की कायम बहिष्कृत नजरेने त्याच्याकडे पाहायचे, हेही समजावून घेण्याची गरज आहे.

अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि मोनिका लेव्हीन्सीचे प्रकरणही गाजले होते. पण माफीनंतर अमेरिकन जनतेने जाहीरपणे कुठेही बिल क्लिंटन यांच्यावर ठपका ठेवला नाही. याचा अर्थ स्वैराचाराला किंवा गुन्हेगारी वृत्तीला बळकटी द्यायची का, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. परंतु माणसाच्या हातून चुका होतात आणि तो माणूस जर वलयांकित असेल तर त्या चुकांच्या वाट्याला प्रसिद्धीचे भोग येतात.

एखाद्या महिलेवरच्या अत्याचाराच्या घटनेत त्या महिलेची अब्रू टिकविण्यासाठी तिचे नाव न प्रसिद्ध करण्याचा संकेत बरीच प्रसारमाध्यमे पाळतात. अगदी वाहिन्यांवरही एखाद्या अत्याचारग्रस्त महिलेचा फोटो दाखविताना चेहरा दिसणार नाही याची काळजी घेतली जाते. हे करताना आम्ही मोठी सामाजिक जबाबदारी पार पाडीत आहोत असा आवही आणला जातो.
महिला किंवा अल्पवयीन मुलांच्या बाबतीत सजग असलेला आपला समाज आहे. आपल्यापैकी अनेकांनी शाळेतही शिक्षा भोगलेली असते. चुका, खोडकरपणाबद्दल शिक्षकांचे फटकेही खाल्ले आहेत. वर्गात बाकावर उभे राहण्याची शिक्षा, वर्गाबाहेर अंगठे धरण्याची शिक्षा वगैरे.. या शिक्षेनंतर पाप धुऊन निघाल्याचे समाधान विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसायचे. काही जण दिवसभर खाली मान घालून घालवितात. पण हे सगळे तेवढ्यापुरते असते. दुसरा दिवस पुन्हा ताजातवाना. लहानपणापासून या मानसिकतेतच आपली वाढ झालेली असते.
चूक झाली की शिक्षा या धारणेतून हळूहळू सर्वसमावेशक अशा न्यायव्यवस्थेचा जन्म झाला. न्यायव्यवस्थेतही प्रतिमा जपत आज समाजव्यवस्थेत सर्वोच्च असे बळकट स्थानही मिळविले आहे. लोकांनीही न्यायाला देवतेचे महत्त्व दिले आहे. त्यामुळे न्यायव्यवस्थेने शिक्षा दिलेला मनुष्य पुन्हा नव्याने जीवन जगण्यास उत्सुकही असतो आणि तयारही.
अभिनेता संजय दत्त जेव्हा शिक्षा भोगून तुरुंगातून बाहेर आला तेव्हा तो ‘सेलीब्रिटी’ असल्याने कॅमेऱ्याच्या विळख्यात अडकला गेला. आपल्याकडे आज शेकडो नव्हे, हजारो कैदी तुरुंगातून शिक्षा भोगून बाहेर येतात. त्यांच्या गुन्ह्याच्या प्रमाणात शिक्षा भोगल्यानंतर ते नव्याने आयुष्यही उभे करतात. पण ते सेलीब्रिटी नसल्याने त्यांच्याकडे कॅमेरे वळत नाहीत. संजय दत्तची पडद्यावरची प्रतिमा लोकांच्या मनात असल्याने त्याच्या गुन्ह्याच्या प्रमाणालाही प्रतिमेचे वलय चिकटले. त्यामुळे बेकायदा शस्त्र बाळगणारा संजय दत्त थेट दहशतवाद्यांच्या रांगेत जाऊन बसला. मुळात वडील सुनील दत्तकडे पाहून अनेकांनी संजय दत्त म्हणजे ‘चांगल्या घरचा बिघडलेला मुलगा’ अशी प्रतिमा घट्ट करून ठेवली होती. ती काहीशी खरीही होती. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्तच्या वलयामुळे इतर अनेक गंभीर आरोपींकडे, त्यांच्या गुन्ह्यांना तितकी प्रसिद्धी मिळाली नाही हेही खरे आहे. संजय दत्तने २० वर्षे न्यायालयीन लढा दिला. त्यात त्याला शिक्षा ही झालीच. ती त्याने स्वीकारली आणि नव्याने पुन्हा आयुष्य जगण्यास सुरुवातही केली. त्याला प्रसिद्धीचे वलय असल्याने अनेकांनी इतक्या प्रसिद्धीची गरज आहे का? तो काही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातून परत आला नाही वगैरे टोमणेवजा शेरेबाजी केली. यात त्याच्याकडे सातत्याने गुन्हेगार म्हणून पाहण्याचा आपला दृष्टिकोन स्पष्ट होतो. मुळात आपली मानसिकता दांभिक आणि दुटप्पी असल्याने आपण कोणत्याही घटनेकडे निखळ नजरेने पाहात नाही. एकीकडे पोर्नस्टार सनी लिओनचे हिंदी सिनेमे कोणताही ‘किंतू’ मनात न ठेवता पाहतो आणि संजय दत्तला मात्र शिक्षा भोगून आल्यावरही माफ करण्यास तयार नसतो. त्याला कायम खलनायक ठरविण्यात आपल्याला विकृत आनंदही मिळत असतो. यात संजय दत्तच्या कृत्याचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही. त्याने जो गुन्हा केला त्याची शिक्षा त्याने आपल्या न्यायाच्या चौकटीत भोगली तेव्हा त्याच्या गुन्ह्याचा विषय तिथे मिटवायला हवा. संजय दत्तने जेव्हा प्रसारमाध्यमांना विनंती केली की, यापुढे माझा उल्लेख करताना दहशतवादी असा करू नका, मी केवळ बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी दोषी होतो आणि कायद्याने शिक्षा भोगलेली आहे. याचा अर्थ हाच होता, की मला सतत गुन्ह्याच्या नजरेतून पाहू नका. त्याची ही विनंती बदलत्या मानसिकतेमध्ये रास्तही म्हणायला हवी. संजयने न्यायालयीन लढाई तर दिली; पण सलमान खान अजूनही कायद्याच्या पळवाटा शोधतो आहे. दोन गंभीर खटले त्याच्यावर आहेत पण शिक्षेचा मागमूस अजून दिसत नाही. त्यालाही प्रसिद्धीचे मोठे वलय आहे. तोही अजून निर्दोष असल्याच्या भूमिकेत वावरताना दिसतो. अर्थात न्यायव्यवस्था त्याचाही जो असेल तो निकाल लावेल. प्रश्न आहे तो शिक्षा झालेल्या मनुष्याकडे आपला पाहण्याचा दृष्टिकोन कधी बदलणार याचा. बदलत्या सामाजिक धारणीत आणि वेगवान समाजरचनेत अनेक गोष्टी एकतर आपण विसरून जातो अथवा काळाच्या उदरात त्या गडप होतात. लोकांची सामाजिक घटनांमधील स्मृती तेवढी तीव्र नसते, जितकी वैयक्तिक घटनांमधील असते. तीच दृष्टी बाळगायला हवी. सातत्याने एकाच चष्म्यातून एखाद्याकडे पाहणे हा त्याचाही अपमान आणि आपल्या संकुचित दृष्टिकोनालाही बळकटी दिल्यासारखे आहे. आपल्या प्रत्येक माणसामध्ये कुणी नायक नसतो अथवा खलनायकही. प्रत्येक जण इतरांकडे पाहताना मात्र न्यायाधीश असतो, तो न्यायाधीश बऱ्याच वेळा पूर्वसंस्कारित अथवा पूर्वग्रहदूषित असतो. त्यामुळे अनेकदा समन्वयाची दृष्टी चुकते हे समजून घेतले तरी पुरे.


(लेखक मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत.)

Web Title: Not a villain ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.